*मराठी भाषेची सुंदरता*
*खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..! ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!*
*रंग पाण्याचे*
*'पाणी'* शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा..!
नयनामध्ये येता *'पाणी'*
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!
चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या *'पाणी'* सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग *'पाणी'* येते..!
धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते *'पाणी'*..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते *'पाणी'* ..!
"वळणाचे *'पाणी'* वळणावरती"
म्हण मराठी एक असे,
"बारा गांवचे *'पाणी'* प्यालाय"
चतुराई यातूनी दिसे..!
लाथ मारूनी *'पाणी'* काढणे, लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर *'पाणी'* पडणे
चीज न होणे कष्टाचे..!
उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
*'पाण्या'*त पाहणे गुण खोटा..
*'पाणी'*दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!
शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या *'पाणी'* पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे *'पाणी'*दाविले..!
टपोर मोती दवबिंदूचे
चमचम *'पाणी'* पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद *'पाणी'*..!
कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या *'पाणी'* होते..
ओंजळीतूनी *'पाणी'* सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!
मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते *'पाणी'* करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती *'पाणि'*
आभाळातून पडता *'पाणी'*
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे' *पाणी* *पाणी* करती..!
अंतीम समयी मुखात *'पाणी'*
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग *'पाणी'* देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!
मनामनांतील भावनांचे,
*'पाण्या'* मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!
Author Unknown.
Comments
Post a Comment