Skip to main content

Posts

Showing posts from May 20, 2017

अनामिक कविता

एखाद्या रात्री कधीतरी  जमा होतात सावल्या, गरम होतात डोळे नि  तडतडतात बाहुल्या... मुक्यानेच सांगू लागतं  दुखलेलं पाणी,  "इतकं हळवं चुकूनसुद्धा  असू नये कोणी..." गाऊ नये कोणी कधी  उदास उदास गाणी, कळावीत सारी दुःखं  इतकं होऊ नये ज्ञानी... वाचूच नये मुळात कुठलं  जाडजूड पुस्तक, विचारांपासून शक्यतो  दूर ठेवावं मस्तक... जशी नजरेस दिसतात  तशीच पहावीत चित्रं, जसे आपल्याशी वागतात  तसेच समजावेत मित्र... उगाच फार खोल आत  नेऊ नये दृष्टी, खऱ्या समजाव्यात  साऱ्या सुखांताच्या गोष्टी... पेनाच्या जिभेवरच  सुकू द्यावी शाई,  फार त्रास होईल  असं लिहू नये काही... हळवं बिळवं करणारे  मुळात जपूच नयेत छंद, करून घ्यावीत काळोखाची  सगळी दारं बंद... सायंकाळी एकटं एकटं  फिरू नये दूर, समुद्रकिनारी लावू नये  आर्त, उत्कट सूर... चालू नये सहसा फार  ओळखीची वाट, भेटलंच अगदी कुणी  तर मिळवावेत हात... जमल्यास चारचौघात  बघावं थोडं मिसळून, लहान मुलासारखं कधीतरी  भांडावं उसळून... आवडणार नाही  पंचमीच्या चंद्राची कोर, एवढंसुद्धा कोणी कधी  होऊ नये थोर... घट्ट घट्ट बसलेल्याही  सुटतातच गाठी, कपाळावर म्हणून सारखी  आणू नये आठ