Skip to main content

अनामिक कविता

एखाद्या रात्री कधीतरी 
जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि 
तडतडतात बाहुल्या...

मुक्यानेच सांगू लागतं 
दुखलेलं पाणी, 
"इतकं हळवं चुकूनसुद्धा 
असू नये कोणी..."

गाऊ नये कोणी कधी 
उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं 
इतकं होऊ नये ज्ञानी...

वाचूच नये मुळात कुठलं 
जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो 
दूर ठेवावं मस्तक...

जशी नजरेस दिसतात 
तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात 
तसेच समजावेत मित्र...

उगाच फार खोल आत 
नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात 
साऱ्या सुखांताच्या गोष्टी...

पेनाच्या जिभेवरच 
सुकू द्यावी शाई, 
फार त्रास होईल 
असं लिहू नये काही...

हळवं बिळवं करणारे 
मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची 
सगळी दारं बंद...

सायंकाळी एकटं एकटं 
फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये 
आर्त, उत्कट सूर...

चालू नये सहसा फार 
ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी 
तर मिळवावेत हात...

जमल्यास चारचौघात 
बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी 
भांडावं उसळून...

आवडणार नाही 
पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी 
होऊ नये थोर...

घट्ट घट्ट बसलेल्याही 
सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी 
आणू नये आठी...

साकळू देऊ नये फार 
खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित 
होत जावं व्यक्त...

माणसांचं मनास 
लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका 
त्यांचासुद्धा भार...

तुटून जावीत माणसं 
एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा 
प्रत्येकालाच फोन...

ठेऊ नये जपून 
वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत 
असा गुंतवू नये प्राण...

जमा होत राहील 
सारखा पापणीआड थेंब, 
इतकंसुद्धा मन लावून 
करू नये प्रेम...

श्वास घेणंसुद्धा अगदीच 
वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून 
जगण्याचा अर्थ...

वाटलं जर केव्हा 
सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे 
हे करून घ्यावं मान्य.." 

इतकं समजावूनसुद्धा 
जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, 
थरथरतात बाहुल्या.......

Author unknown.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...