15/03/17, 10:29 AM - Shrirang B Soman:
कोण?
कोण फिरवतो कालचक्र हे?
दिवसामागून रात्र निरंतर
कोण मोजतो खेळ संपता?
आयुष्याचे अचूक अंतर
कोण निर्मितो श्वासांसाठी?
करूणेचा हा अमृतवारा
कोण फुलवतो आठवणींनी?
रंध्रारंध्रातुन पिसारा
कोण राखतो काळजावरी?
शरीराचा हा खडा पहारा
कोण शिकवतो कसा धरावा?
स्वप्नांमधला मुठीत पारा
कोण ठरवतो; पाऊस येथे
कधी दडावा, कधी पडावा?
कोण सांगतो कधी कसा अन,
कोणावरती जीव जडावा?
कोण पढवतो जगता जगता?
नावडता, तरी हात धरावा
कोण रोखतो अदम्य ईच्छा?
हृदयामधला श्वास सरावा
कोण बोलतो निमूट रात्री?
शरीराशी शरीराची भाषा
कोण रूजवतो गर्भामध्ये?
जगण्याची ही नाजूक आशा
कोण पंपतो श्वासांमधूनी?
रक्तामधल्या प्रेमळ लहरी
कोण साठवी गंध कळ्यांतून?
दवभरल्या या गुलाबप्रहरी
रात्रीच्या या रोज ललाटी
चंद्रटिळा हा कोण रेखितो?
वसुंधरेला न्हाता न्हाता
सूर्याआधी कोण देखितो?
आई नसता जगात जरीही
घास भरवतो कोण तरीही?
पहाट स्वर्णिल कोण दावितो?
कटू स्मृतींची रात्र जरीही
रचतो कैसा कोण नभातुन?
थेंबांमधली भिजली गाणी
मातीच्या या ओठांमधूनी
कोण बोलतो हिरवी वाणी?
कोहं कोहं कोण वदवितो?
प्रश्न चिरंतन, बाकी नश्वर
कोण लुब्ध जो या सृष्टीवर?
नतमस्तक हे उत्तर "ईश्वर" 🌼🌸
Messages circulated on WhatsApp.
Comments
Post a Comment