*नांदत्या घराची किंमत ....*
....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.
त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.
7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?"
अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात .
ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून .
शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".
एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.
निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही .
*त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "*
या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "
खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .
-- *अनामिक*
Comments
Post a Comment