ऍनिव्हिओला .......
ऍनिव्हिओला... हा शब्द जीए कुलकर्णींचा. त्यांच्या "इस्किलार" या दीर्घ कथेत या शब्दाची ओळख झाली. ही जीएंची खासियत. स्वत:च एखादा शब्द तयार करायाचा आणि तत्याला अर्थ द्यायचा. या कथेत असेच सेरीपी, इस्किलर असे शब्द त्यांनी निर्माण केले आणि त्यांना अर्थ दिले. ऍनिव्हिओला म्हणजे द्राक्षाचा रस ज्या क्षणी मद्य होतो तो जादूई क्षण. आपल्या आयुष्यात असे जादूई क्षण येतात. तो / किंवा ती... बरेच दिवस एकमेकांना पहात असतात. भेटत असतात. पण एक क्षण येतो, जेंव्हा दोघांनांही वाटतं आपण एकमेकासाठीच जन्मलोत. तो क्षण म्हणजे ऍनोव्हिओला ! आपण वर्गात बसलेलो असतो. रसायशास्त्राचं लेक्चर चालू असतं. व्याख्याता अगम्य भाषेत दोन रसायनांच मिश्रण केल्यावर तिसरंच रसायन कसं निर्माण होईल ते सांगत आसतो आणि वीजेचा लोळ अंगावर पडावा, तशी आपल्याला कविता सूचते. वहीतलं पान फाडून आपण एकटाकी ती कविता पूर्ण करतो. तो क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! वर्तमानपत्रात शब्दकोडं आलेलं असतं. सगळं सोडवून झालेलं असतं, फक्त ते १६ आडवं आणि ५ उभं नं पंचाईत केलेली असते. बाजूला बायको टीव्ही पहात असते. त्या सिरीअल मधली आजीबाई म्हणते: "तुझं हे असं. काखेत कळसा अन गावाला वळसा". क्षणभर तुमचा विश्वास बसत नाही, १६ आडवंच उत्तर मिलालेलं असतं, ५ उभं आपोआप पूर्ण होतं. हा क्षण म्हणहे ऍनिव्हिओला ! खिन्न अवस्थेत तुम्ही गच्चीवर विचार करत बसलेले असता. सहज तुमचं लक्ष समोर जातं. पश्चिमेच्या आकाशात इंद्रधनुष्य उगवलेलं असतं, तो क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! अस्वस्थ अवस्थेत तुम्हाला रात्री जाग येते. एकटेच असता तुम्ही घरी. आता झोप गेली म्हणून तुम्ही येरझाऱ्या घालायला लागता. सहज म्ह्णून, जपून ठेवलेल्या रेडीओचे कान पिळता आणि त्यातून लताच्या स्वरातलं तुमचं गाणं आवडतं लागतं... हा क्षण म्हणजे ऍनिव्हिओला ! तशी ती तुमच्या मित्राची कविता... तुम्ही अनेकदा वाचलेली. पण त्या दिवशी तुम्ही हार्मोनिअम घेऊन बसलेले असता... उगाच आपलं गंमत म्हणून... बाजूलाच ठेवलेल्या डायरीतलं त्या कवितेचं पान वाऱ्यानं फडफडून तुमच्या समोर येतं.... तुम्ही हार्मोनिअमच्या पट्ट्या फिरवायला लागता आणि नकळत ती कविता तुमच्या गळ्यातून गाणं बनून बाहेर पडते... हा क्षण म्हणजे ऍनिव्हिओला..... असतातच असे क्षण.. येतातच आपल्या आयुष्यात.... फक्त ते लक्षात येतातच असं नाही ! ते असं लक्षात येणं म्हणजे सुद्धा ऍनिव्हिओला !!
C/p
As received on whatsapp.
Comments
Post a Comment