खाद्यजत्रा
वऱ्हाडी ठसका
गरमागरम झणझणीत चना पोहे, पाटोडी, पाटोडीची रस्सा भाजी, गोळा भात, वडा भात हे खमंग वऱ्हाडी पदार्थ आपल्याला माहीत असले तरी नागपूरची खरी ओळख आहे ती सावजीच्या झणझणीत, मसालेदार पदार्थासाठीच..
असे म्हणतात की माणूस जसा खातो तसा बनतो.. त्याबरोबरच लहानपणच्या खाण्या-पिण्याच्या सवयी माणसाला आयुष्यभर साथ देतात आणि घडवतात. तसेच भौगोलिकतेचापण माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नक्कीच परिणाम होतो.
नागपूर असं शहर जिथे तिन्ही ऋतू अतिशय विषम. पावसाळ्यात इथे पाऊस मुसळधार नाहीतर कोसळधार असतो. थंडी बोचरी आणि हाडं गोठवणारी. उन्हाळा दरवर्षी उष्माघाताच्या बळींची संख्या नोंदवणारा खतरनाक. या सर्व गोष्टींचा इथे राहणाऱ्या माणसांवर व त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर परिणाम झाला नाही तरच नवल. चला एक फेरफटका मारूया या विलक्षण शहराच्या खाद्यसंस्कृतीचा...
नागपूरची खाद्यसंस्कृती पहाटे पाचपासूनच सुरू होते. ती चना-पोहे या डिशपासून. नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी पायी जाण्याच्या अंतरावर आहे कस्तुरचंद पार्क. याच पार्कने मागील एक शतकापासून भारतातील सर्व थोर पुढाऱ्यांच्या सभा अनुभवल्या ओहत. कस्तुरचंद पार्क त्रिकोणी आकाराचे प्रचंड मोठे मदान आहे. ज्याच्या एका टोकाला रिझर्व बँक ऑफ इंडिया, दुसऱ्या बाजूला सीताबर्डीचा किल्ला व कोपऱ्यात प्रसिद्ध चना-पोहावाला आहे. कांदे-पोहे, त्यावर गावरान चण्याची झणझणीत उसळ, बारीक शेव, चिरलेला कांदा आणि टोमॅटो हा नागपूरकरांचा पहाटेचा नाश्ता. नागपूरबाहेरचे लोक हाश हुश करत हे चना-पोहे खात असतात तेव्हा नागपुरी माणूस म्हणतो, ''भय्या, थोरी र्ती और मारना!'' नागपूरमध्ये चना-पोहे हा प्रकार आता गल्लोगल्ली मिळत असला तरी कस्तुरचंद पार्क व देवनगर इथली लज्जतच न्यारी.
नाश्त्याचा थोडा माइल्ड प्रकार खायचा असेल त्यांनी लोखंडी पुलाकडून बर्डी मेन रोडकडे वळावे. बर्डी मेन रोडवर पकोडेवाल्याची गल्ली कोणीही सांगेल. येथे उडदाचे पकोडे व कांदा, लसूण घातलेले आलुबोंडे (बटाटेवडे) मिळतील. या ठिकाणी कुठलाही खारा माल तुम्हाला कधी थंड मिळणार नाही. सतत गरम. कारण ते इतकं पटापट संपतं की सतत ताजं बनवावं लागतं. तिथे सतत वेटिंग असतं. असं म्हणतात ना, गुड िथग्ज कम्स टू दोज हू वेट..
नाश्त्यासाठी किंवा थोडं चटपटीत खायचं असेल तर इथले लोक समोसा खाणं जास्त प्रिफर करतात. वर्धा रोडवरील साई मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या देवनगरचा राजेश हॉट समोसा प्रसिद्ध. इथेदेखील समोसा कधीच थंड मिळणार नाही. त्याची चवही अशी की माणूस दिवानाच होतो.
नागपूरच्या खाद्यसंस्कृतीवर आणखी एका गोष्टीचा पगडा आहे तो म्हणजे नागपूर भारताच्या अगदी मध्यभागी आहे. भारताचं झिरो माइल नागपूरला आहे. त्यामुळे इथला झिरो माइल चौक ही अतिशय वैशिष्टय़पूर्ण जागा आहे. इथे एक स्तंभ असून तो मलाचा दगड असं गृहीत धरून चार दिशांचं प्रतीक म्हणून चार घोडे चौखूर उधळलेले दाखवलेलं एक स्मारक आहे. याच्या जवळच्या मलाच्या दगडावर नागपूरपासून असलेल्या भारतातील विविध शहरांचं अंतर किलोमीटर्समध्ये दर्शविलेलं आहे.
झिरो माईल चौकातच एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या ११३ गोवारी बांधवांचं 'शहीद गोवारी स्मारक' असून त्याच्याच थोडय़ा अंतरावर नुकतंच अनावरण झालेलं ऑगस्ट क्रांतीमध्ये शहीद झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सनिकांचं शहीद स्मारक आहे.
नागपूरमध्ये आल्यावर टिपिकल साऊथ इंडियन खायचं असेल तर सदर भागातील 'तिरास्वामी' किंवा इंडियन कॉफी हाऊस. पण त्यांची धरमपेठ येथील शाखा बंद झाली असून सध्या स्मृती टॉकीजशेजारची शाखा चालू आहे.
झिरो माइलच्या स्मारकाच्या बाजूच्या गल्लीतनं खाली भवन्स शाळेच्या जवळ आहे, अजब बंगला मध्यवर्ती पुरातन वस्तुसंग्रहालय. हे मध्ये बरीच र्वष बंद होतं, पण आता परत सुरू झालं आहे. येथून चालत थोडं पुढं आलं की येथ जिल्हा कचेरी आणि न्यायालय. जिल्हा कचेरीच्या आवारात आपली भेट होते 'पाटोडीवाल्याशी'. कोिथबीर व खोबऱ्याच्या किसाचं सारण असलेली पाटोडी आणि सोबत दह्यची कढी. जिल्हा कचेरीतून काम संपवून पाहोडी न खाता जाणं म्हणजे मूर्खपणाच.
जिल्हा कचेरी आणि सिव्हिल लाइन्स भागातच आहे मुंबई हायकोर्टचं नागपूर खंडपीठ. म्हणजे नागपूर हायकोर्ट.
हा नागपूरचा सगळ्यात जास्त हिरवाई असलेला भाग. पुढे गेलं की लागतं जपानी गार्डन आणि राजभवन. जपानी गार्डन सेमिनरी हिलचाच एक भाग आहे. सेमिनरी हिल हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण जवळपास सहा किलोमीटर परिघाची ही टेकडी असून अतिशय गर्द वृक्षराई फुरसतीचे काही क्षण घालवायला उत्तम जागा. इथे एक छोटंसं प्राणिसंग्रहालयदेखील आहे. सेमिनरी हिलवरनं वायुसेनानगरकडे जाऊन खाली उतरताना लागतं बोटॅनिकल गार्डन.
बोटॅनिकल गार्डन अतिशय मोठी जागा असून विविध प्रकारच्या वनस्पती व फुलझाडं येथे बघायला, अभ्यासायला मिळू शकतात. बोटॅनिकल गार्डनची भ्रमंती झाली की त्याच रस्त्याने खाली गेल्यावर येतो फुटाळा तलाव व त्याची चौपाटी.
नागपूरच्या तरुणाईचं सगळ्यात आवडतं ठिकाण. फुटाळ्याच्या िभतीवर बसून उकडलेली बोरं, िलबू, मीठ, मसाला लावलेलं मक्याचं कणीस खाण्याची मजाच वेगळी. फुटाळ्याची चौपाटी अनुभवून निघायचं ते अंबाझरी गार्डनला. नागपूरकरांचा आवडता पिकनिक पॉइंट. इथे मात्र आपलं खाणं आपल्या बरोबर नेलेलंच बरं. अंबाझरी तलावाच्या बेटावरील बगीचा उत्तमच आहे. पण अंबाझरीला यायचं ते संध्याकाळी सूर्यास्त बघायला. अंबाझरी तलावाच्या पालीवरनं सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. त्याचबरोबर आकाशात दिसणाऱ्या रंगछटा डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या, अप्रतिम.
इतकी भटकंती झाल्यावर दुपारची भूक लागलीच असेल. सात्त्विक शाकाहारी जेवणासाठी गायत्री हॉटेलची शाळा अगदी उत्तम. गायत्रीच्या प्रतापनगर व धरमपेठ येथे दोन शाखा आहेत. शाकाहारीच पण थोडं हेवी जेवायचं असेल तर बर्डीवरचं नवेद्यम किंवा हल्दीरामचं ठाठ-बाट हेही चांगले पर्याय आहेत.
आता वळूया अस्सल नागपुरी किंवा वऱ्हाडी शाकाहारी जेवण मिळण्याच्या ठिकाणांकडे. नागपूरकर जसे वागण्या-बोलण्याच्या बाबतीत दणदणीत तसेच चवीच्या व खाण्याच्या बाबतीतही. याचंच प्रतिबिंब इथल्या पदार्थामध्येही दिसतं. तिखट, चमचमीत, झणझणीत व तेलाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ.
पाटोडीची रस्सा भाजी, झुणका-भाकरी, पातळ भाजी, वांग्याचे भरीत, गोळा भात, वडा भात या प्रकारचं अस्सल नागपुरी जेवण मिळण्याचं ठिकाणी म्हणजे आठ रस्ता चौकाकडून सावरकर नगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली हॉटेल्सची मालिका, यशवंत स्टेडियमजवळ असलेलं वऱ्हाडी थाट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं बजाजनगर येथील 'विष्णूजी की रसोई' या ठिकाणची पाटोडी रस्सा भाजी किंवा गोळा-भात खाल्ल्यावर तुम्ही नागपूरकरांच्या प्रेमातच पडाल.
नागपूरचे आणखी एक प्रेक्षणीय व लाखो करोडे बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले दीक्षाभूमी हे ठिकाण. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनाद्वारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
आता वळतो नागपुरी मांसाहारी खाद्यसंस्कृतीकडे. मध्य भारत व महाराष्ट्रात सावजी हा भोजन प्रकार खूपच प्रसिद्ध झाला आहे. सावजी रस्सा हा प्रकार तसा विदर्भातला. विदर्भात विणकर किंवा कोष्टी व्यवसाय असणाऱ्या जमातीला सावजी म्हणतात. हातमागावर कापड विणणारी ही जमात. त्या काळी मांसाहारी पदार्थ मोठय़ा चवीने खाल्ले व बनवले जात असत. त्या वेळी विदर्भात, विशेषत: नागपुरात सावजी रस्सा बनवण्याची पद्धत रूढ व लोकप्रिय झाली. हा रस्सा जहाल तिखट व मसालेदार असून काळपट रंगाचा असतो. सावजी खानावळीत मुख्यत्वे मटण, पाया, खूर, फेरगोधडी इत्यादी मांसाहारी पदार्थ मिळतात. हातमागाचा धंदा कमी झाल्यावर या जमातीतील बरेच लोक मांसाहारी भोजनालयाच्या व्यवसायात आले आहेत.
आज नागपुरात अशा जवळजवळ अडीचशे खानावळी आहेत. त्यातील शुक्रवारी तलाव येथील जगदीश सावजी, सुभाष नगर येथील हरिनाथ सावजी, टेलिफोन एक्स्चेंज चौकातील पिंटू सावजी, गोळीबार चौकातील ओम सावजी विशेष प्रसिद्ध असल्या तरी डाल कांदा, गवार तिखा आणि खसखसीची भाजी या शाकाहारी भाज्यादेखील सावजीची स्पेशालिटी आहे.
अशी आहे नागपूरची खाद्यसंस्कृती व नागपूरकर लोक. तिखट, झोंबणारे पण एकदा परिचय झाला, सवय झाली की हवेहवेसे वाटणारे.
सगळ्या जगात orange city म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुर शहराची हि खाद्ययात्रा...
कॉपी पेस्ट Source whatsapp
नागपूरकरांसाठी खास पोस्ट
Comments
Post a Comment