Skip to main content

‘श्यामची आई’ च्या मागचे आचार्य अत्रे

साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' च्या रूपाने संस्कारांचा अनमोल ठेवा लिहून ठेवला . काही पिढय़ा या पुस्तकाने संस्कारक्षम झाल्या. पुढे याच नावाने आचार्य अत्रे यांनी  चित्रपट काढला. अतिशय विलक्षणपणे त्यांनी चित्रपटासाठी प्रसंग निवडले. हसत्या खेळत्या अशा प्रसन्न वातावरणामधून त्यांनी हळुवारपणे प्रेक्षकांना शोकात्म वातावरणामध्ये नेले आणि तिथेच आपली पकड घट्ट करून मध्यंतरानंतरचा चित्रपट थेट मेलोड्रामाच्या दिशेने नेताना ते अजिबात कचरले नाहीत. ६ मार्च २०२० रोजी या चित्रपटास ६० वर्षे होतील. या निमित्ताने या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने जागवलेल्या आठवणी..
१९५३ मध्ये 'श्यामची आई'चे चित्रीकरण पूर्ण होऊन चित्रपट प्रकाशित झाला आणि त्या पाठोपाठ मला 'वहिनीच्या बांगडय़ा' या चित्रपटात भूमिका मिळाली. त्या चित्रपटाचेही चित्रीकरण मुंबईतच असायचे. 'श्यामची आई'ला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आचार्य अत्रे काळजीत पडले. कर्ज काढून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती! आता काय करायचे? आणि एक दिवस मुंबईतच मला निरोप आला, की 'श्यामची आईच्या निमित्ताने गिरगावात एका चाळीत सत्कार होणार आहे, तर तिथे ये.' 'वहिनीच्या बांगडय़ा'चे दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी सत्काराच्या ठिकाणी पोचविण्याची व्यवस्था केली. सत्कार होऊन हारतुरे, खाऊ घेऊन मी घरी खुशीत परतलो, तर चार दिवसांनी पुन्हा एका सत्काराचे बोलावणे आले. आणि त्यानंतर दर चार-सहा दिवसांनी सत्कार सुरूच राहिले. मी अगदी आनंदात असायचो. नंतर एक दिवस मला कळले की असे सत्कार स्वत: आचार्य अत्रेच घडवून आणायचे. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता आणि त्यांचे चाहतेही असंख्य होते. साहेब अगदी मोकळेपणाने म्हणायचे (मी त्यांना साहेब म्हणायचो) की, अरे, आम्ही साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या अजरामर साहित्य -कृतीला चित्रपटात आणले, तर आमचा सत्कार तरी कराल की नाही? मग काय? आज खेतवाडीत, उद्या गायवाडीत, परवा शिवाजी पार्कला, मग हिंदू कॉलनीत सत्कार होत राहिले. वातावरणनिर्मितीचा तो नाटय़पूर्ण प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. साहेब सभेतच बोलून दाखवायचे की त्यांचे भाषण ऐकायला माणसे येतात, पण चित्रपटाकडे फिरकत नाहीत. मग आणखी एक टूम निघाली. मुंबईतल्या शाळेतल्या मुलांना फक्त चार आण्यात चित्रपट दाखवला जाऊ लागला. मग चित्रपटातली गीते सादर करण्याची स्पर्धा जाहीर झाली. साहेबांनी मुंबईभर माझी हत्तीवरून मिरवणूकही काढली. 
आणि एक दिवस जाहीर झाले, की राष्ट्रपती सुवर्णपदकासाठी अगदी पहिल्या वर्षीच 'श्यामची आई' चित्रपटाची निवड झाली आहे, आणि त्यानंतर सगळे चित्र बदलले. आता चित्रपट पाहण्यासाठी अतोनात गर्दी होऊ लागली. मी श्याम म्हणून ओळखला जाऊ लागलो. काही वर्षांंनंतर महाविद्यालयातही मला फिशपॉन्ड मिळाला की 'संयुक्त महाराष्ट्र समितीला भांडवल गोळीबाराचे आणि माधव वझेला 'श्यामची आई'चे! चित्रपटाला सुवर्णपदक मिळून ६० वष्रे झाली. तरी अवचितपणे अगदी दररोज कोणीतरी भेटते आणि 'श्यामची आई'ची ओळख सांगते. असे कोणी कोणी अनेकदा युरोप-अमेरिकेतही भेटले.
आता जरा दूरवरून मी या चित्रपटाच्या विलक्षण लोकप्रियतेचा विचार करतो, तेव्हा मला प्रकर्षांने जाणवते की 'श्यामची आई' पुस्तकातल्या एकूण ४२ रात्रींमधून आचार्य अत्रे यांनी अतिशय विलक्षणपणे, चित्रपटासाठी प्रसंग निवडले. आईच्या आचार-विचारांमधून प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे मुलावर झालेले संस्कार हे सूत्र सांभाळताना बोधपटाचे रूप चित्रपटाला येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. म्हणून श्यामचे बालपण त्यांनी काहीशा स्वतंत्र नजरेने पाहिले. 'छडी लागे छम छम' हे गाणे आणि त्याचे चित्रीकरण हे खास अत्रेय वैशिष्टय़.. दूर्वाची आजी काहीशा व्यंगात्म शैलीने यावी हीदेखील त्यांची कल्पना. प्रवचनकारांचे विक्षिप्त व्यक्तिमत्त्वदेखील त्यांच्या प्रतिभेचा उन्मेष. त्यांच्यातला शिक्षक, नाटककार आणि नकलाकार त्यांनी बाजूला केला नाही. म्हणूनच हसत्या खेळत्या अशा प्रसन्न वातावरणामधून त्यांनी हळुवारपणे  प्रेक्षकांना शोकात्म वातावरणामध्ये नेले आणि तिथेच आपली पकड घट्ट करून मध्यंतरानंतरचा चित्रपट थेट 
मेलोड्रामाच्या दिशेने नेताना ते अजिबात कचरले नाहीत. 
 साने गुरुजींच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाशी संपूर्ण इमान राखून आचार्य अत्रे यांनी  पटकथा आणि संवाद लेखन केले. कधी कधी त्यांचा चेष्टेखोर स्वभाव उफाळून वर यायचा. 'तुमचे प्रवचन म्हणजे जेहत्त्ये काळाचे ठाई, पुढे कोण दिसते आहे नवीन बाई!' -असे वाक्य त्यांनी श्यामच्या तोंडी घातले होते! चित्रीकरण करताना मीही ते अगदी निरागसपणे म्हटले होते. चित्रीकरण पाहायला आलेल्या अनंत काणेकर, सोपानदेव चौधरी वगरे साहित्यिकांनी साहेबांच्या विनोद बुद्धीचे कोण कौतुक केले होते. पण एक दोन दिवसांनी साहेबांनी ते दृश्य पुन्हा चित्रित केले आणि आता वाक्य होते, 'जेहत्त्ये काळाचे ठायी, पुढे काही आठवत नाही!' साने गुरुजींच्या मूल्याधिष्ठित जीवनाचा त्यांनी विसर पडू दिला नाही. जाणवते ते असे की गमतीदार अशा लहानलहान प्रसंगांची पखरण करून त्यांनी आधी प्रेक्षकांचा विश्वास संपादन केला, आणि मग वेळ येताच प्रेक्षकांना ढसढसा रडायला लावले.
'श्यामची आई' चित्रपटातले एकत्र कुटुंबातले वातावरण ५० आणि ६०च्या दशकात प्रेक्षकांच्याही घरी कमी-अधिक फरकाने होते. समाजाला आणि कुटुंबांना एक नतिक अधिष्ठान होते. त्यामुळे साहजिकच 'श्यामची आई' हा चित्रपट त्यांना आपलाच वाटला आणि त्यानंतरच्या दशकात, जीवनातले श्रेयस आणि प्रेयस असे दोन्ही हरवून बसलेल्या समाजाला आणि अर्थातच कुटुंबांना 'श्यामची आई' या चित्रपटातून तरी ते काही प्रमाणात परत सापडल्याचा अनुभव आणि आनंद घेता आला. अगदी या घडीला हा चित्रपट त्याचा संदर्भ आपल्या मराठी समाजात जागवून आहे त्याचे रहस्य तिथे आहे असे मला राहून राहून वाटते. हा चित्रपट एक नतिक भूमिका घेऊन आला आहे. म्हणूनच या पुढील काळातही प्रेक्षकांना तो आपलाच वाटत राहील.
 स्वतः श्यामनी ( श्री. माधव वझे) लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख👆

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

पांढरी रूई किंवा मंदार

#रानफूले...... या सदरातील आजचे ६६वे फूल आहे *पांढरी रूई* वा *मंदार* हिंदूधर्मशाश्त्रात अत्यंत महत्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणले गेलेली ही वनस्पती हल्ली खुपजणांनी दारात लावलेली दिसते. जुन-जुलै मधे पावसात हिचे बि रूजते व  हळू हळू वाढत राहते, आठ ते दहा महिन्यात फुले येतात . गुच्छामधे येणारी फुले दूरूनही ओळखू येतात  या मधे जांभळसर रंगाच्या फुलांची रूई जास्त प्रचलीत आहे. कश्याही जमीनीत, मातीत, कमी पावसात पण येते . फुलांचे परागीभवन किटकांमार्फत होते व फलनपण होते.कप्पे असलेल्या शेंगेमधे(पाँड) मऊ मऊ कापूसतंतू असलेल्या बिया असतात  (या कापसाची ऊशी अत्यंत मुलायम असते)त्या सुकल्या की मार्च एप्रील मधे तडकतात व बिया हवेत ऊडतात , कापसामुळे वार्याने वहन होऊन बिजप्रसार होतो.मातीत जाऊन पडली की येणार्या पावसाळ्यात रूजतात.जाड जाड मोठी मोठी पाने शनिमहाराजांना हार करून घातली जातात.महादेवाला प्रिय असलेली हि वनस्पती   पण बहूपयोगी आहे. Calotropis gigantea असे वनस्पतीशाश्त्रीय नांव असलेली हि वनस्पती पण औषधी आहे. याचा चिक जर पायात काटा वा काच गेली तर त्यावर लावला असता जखम न  चिडता त...