"तरुणौ रुपसम्पनौ
सुकुमारौ महाबलौ ।
पुंडरीक विशालाक्षौ
चीरकृष्णार्जिनाम्बरौ ।।
फलमुलाशनौ दान्तौ
तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ
भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।"
हे दोन रामरक्षेतले श्लोक बहुतेकांना ठाऊक आहे. श्रीराम आणि लक्ष्मण यांचे नितांत सुंदर वर्णन करणारे हे श्लोक मूळ वाल्मिकी रामायणातले आहे. लक्ष्मणानी कान आणि नाक कापल्यावर शूर्पणखा त्याचा भाऊ खर याच्याकडे गेली आणि "तुझी ही अवस्था कोणी केली?" या त्याच्या प्रश्नावर शूर्पणखेनी "वनात आलेल्या दोन पुरुषांनी ही अवस्था केली" असे सांगितले , आणि त्या पुरुषांचे वर्णन करणारे हे दोन श्लोक शूर्पणखेच्या तोंडी महर्षी वाल्मिकी यांनी घातले आहे.
काल रात्री हे श्लोक रामायणात वाचताना मला विलक्षण आश्चर्य वाटले आणि महर्षींना अक्षरशः प्रणाम करावासा वाटला.
अत्यंत जखमी आणि अपमानित अवस्थेत असलेल्या शूर्पणखेच्या तोंडी सुद्धा राम लक्ष्मणाचे अत्यंत चपखल वर्णन करणारे श्लोक त्यांनी टाकले, खरचं - प्रतिभेचा इतका सुंदर आविष्कार पाहून मन थक्क झाले.
रामरक्षा स्तोत्रात हे श्लोक घेण्याचे रचनाकार टाळू शकले नाही, हे एकप्रकारे आपल्या मूळ संस्कृतीचे द्योतक आहे. जे जे उत्तम आहे, ते कोणाचेही असो , ते ग्राह्य आहे. अन्यथा राक्षसिणीच्या तोंडातले श्लोक दैनंदिन उपासनेत येण्याची सुतराम शक्यता नव्हती. 😊🙏🙏
Rasagrahan by:
Madan Kalwit.
Comments
Post a Comment