Skip to main content

दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?

दक्षिणा,आहेर, बक्षीस हे  ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?
                         आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा, १० वी  / १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना कौतुक म्हणून बक्षीस, धार्मिक कार्यांमध्ये आहेर हा रोख देतांना नेहेमी सम रकमेत  १ रुपया मिळवून ती रक्कम विषम करूनच दिला जातो. या मागची अनेक करणे आणि समजुती आपण आज जाणून घेऊया. 
                          मान्य केलेल्या रकमेपेक्षा थोडेसे अधिक दिले तर घेणारा खूष होतो. कोकणात पूर्वापार आंबे, काजू अशा गोष्टी शेकड्यावर घेतल्या जात असत. त्याचे १०० मोजले की अधिक ५ फळे तरी दिली जात असत. मापट्याने ( फरा, पायली ) धान्य मोजताना पहिला पसाभर देवासाठी आणि शेवटी पाच पसा अधिक दिले जायचे. युरोपात एकदा एका बेकरीवाल्याने १ डझन म्हणून चुकीने १२ ऐवजी १३ वस्तू दिल्या. त्यामुळे तिकडे १३ वस्तूंना बेकर्स डझन म्हणतात.

                         विषम रकमेच्या आहेरामागे अशी एक भावना असते की सम अंकाचा भागाकार होऊ शकतो पण विषम अंकाचा भागाकार होत नाही. तसाच आहेर घेणाऱ्याच्या सुखाचा, आनंदाचा कधीही भागाकार होऊ नये आणि पुढचा १ म्हणजे ते वर्धिष्णू असल्याचे द्योतक.  तसेच  ५०. १००, ५०० म्हणजे शेवटी शून्य. शून्य म्हणजे सगळे संपले... असे होऊ नये म्हणून अधिक १ !...  हा पुढचा अधिकचा १ रुपया म्हणजे, हल्लीच्या भाषेत ...and counting म्हणजे त्यापुढेही अजून सुरूच असल्याची सद्भावना...  अधिकस्य अधिकम फलम ! आज खरेतर १ रुपयाला कांही किंमतच उरलेली नाही. १  रुपयाची नोट छापायला सरकारला १ रुपयापेक्षाही अधिक खर्च येतो. तरीही सरकार अजूनही  १ रुपयाची नोट छापते. लोकांच्या मनातल्या या भावनेची घेतलेली ही दखल तर नाही ?  

                       पूर्वी धार्मिक कार्यासाठी भटजींना सव्वा रुपया दक्षिण दिली जात असे. अगदी पूर्वी तर फक्त चांदीचा रुपया असे.  ही दक्षिणा फळे, शिधा, नारळ या व्यतिरिक्त प्रतीकात्मक म्हणून आणि शुद्ध धातूचे दान म्हणून दिली जात असे. जर काही कारणांमुळे पूजा साहित्य जमविणे यजमानाला कठीण असेल तर भटजींना पूजेच्या साहित्याचा  सव्वा रुपया अधिक सव्वा रुपया दक्षिणा असे अडीच रुपये दिले जाऊ लागले.  येथे एक गंमतीदार गोष्ट सांगाण्यासारखी आहे. इंग्रज सरकारने १९१८ साली भारतात अडीच रुपयांची ( २ रुपये ८ आणे ) अजब चलनी नोट छापली होती.  कागदी नोटा आल्यावर एक नवीन डोकेदुखी आली. दक्षिणा  देतांना त्यावर तुळशीपत्र ठेऊन उदक म्हणजे पाणी सोडून ती दिली जात असे. तुळशीपत्र ठेवणे आणि उदक सोडणे म्हणजे सर्वकाही समर्पण केल्याचे प्रतीक असते. कागदाच्या नोटांवर पाणी कसे सोडायचे ? म्हणून मग त्यावर १ नाणे ठेऊन देण्याची प्रथा रूढ झाली. 

                  याचाच एक महत्वाचा भाग अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगतो.. अनेक धार्मिक स्थळी किंवा खूप जाणकार भटजी, तुमच्याकडून घेतलेल्या दक्षिणेतील १ रुपया तुम्हाला परत करतात. तो रुपया म्हणजे शुभ शकुनाचा, देवाच्या प्रसादाचा म्हणून मानला जातो. त्याशिवाय देणाऱ्याने जरी त्याचे सर्वस्व तुमच्या झोळीत टाकले तरी ते सर्व स्वीकारून त्याला कफल्लक करायचे नसते. म्हणून त्यातील थोडे तरी धन त्याला प्रसाद म्हणून परत करायचे असते. ही प्रथा आता फक्त कांही जाणकारच पाळतात. 

                          कांही ठिकाणी असे मानले जात असे की दानामधील वरचा १ रुपया हा पुजाऱ्याचा आणि बाकी रक्कम देवळाची !   घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १२ व्या किंवा १३ व्या दिवशी, घरातील माणसे सर्व धार्मिक कार्ये आटोपल्यावर, नव्याने सुरुवात म्हणून देवळात जात असत. त्यावेळी पुजाऱ्याकडून कुठलेही धार्मिक कार्य करायचे नसल्यामुळे त्यांना सम रकमेची दक्षिणा  / दान दिले जात असे. त्यामुळे सम रक्कम देणे हे एकप्रकारे अशुभही मानले जाते. 
                         आता तुम्ही पुढे कधी कुणाला १०१ किंवा ५०१ रुपये द्याल तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी नक्कीच आठवतील. 
 ( हा लेख आणि फोटो शेअर  केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत ).

***** मकरंद करंदीकर.

makarandsk@gmail.com

No photo received.

Comments

Popular posts from this blog

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले...