Skip to main content

पावसाची नवरस रूपे...

श्री     
प्रिय प्रिय पावसा, 
                    कुठे आहेस रे?  गेले दहा पंधरा दिवस तुझं  दर्शनच नाही ! आज खूप आठवण येतीये  तुझी. म्हणून मनात  आलं पत्रच  लिहावं तुला! अगदी बालपणापासून ची आपली मैत्री ! ये रे ये रे पावसा, नाच रे मोरा... ह्या बालगीतापासून ते  गडद  निळे गडद निळे  जलद भरुनी आले, सरीवर सर ... अश्या कितीतरी कविता ओठी आहेत.  किती मस्त दिवस होते ना लहानपणीचे ! त्याची सर कशालाच नाही.                "ये दौलत भी ले लो | 
ये  शोहरत भी ले लो|       भले छीन लो  मुझसे मेरी  जवानी |  मगर मुझको लौटा दो बचपन का सावन |          वो कागज की कश्ती           वो बारिश का पानी | "           आत्ता हे जगजीत सिंग  यांचं गाणं मला म्हणावसं वाटतंय. आयुष्याची होडी  संथपणे पुढे जाते आहे.पण  माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तू मला वेगवेगळ्या रूपात  भासत गेलास. एका कवीने म्हटले आहे, " जो  काल इथे आला तो पाऊस वेगळा होता, आभाळ निराळे होते तो मेघ वेगळा होता" एखादया  निपुण नृत्यांगनेच्या  नृत्यातून ज्याप्रमाणे" *नवरस "* दिसतात ना तसे  या निसर्गाच्या रंगमंचावर तुझ्या वर्षावातून, तुझ्या रूपातून प्रकट होणारे " *नवरस* " मला खूप भावतात. अरे खरंच! बघ  तुला आता नवरसातलं तुझं  एकेक  रूप उलगडून  दाखवतेच.  
    
           तुझ्यावर केलेल्या बहुतांशी गाण्यांमध्ये आढळतो तो *शृंगार रस*!            "रिमझिम गिरे सावन       सुलग सुलग जाये मन      भिगे आज इस मौसम मे   लगी कैसी ये अगन |" किंवा "भीगी भीगी रातो में         मिठी मिठी बातो में          ऐसे बरसातों में              कैसा लगता है? " या ओळी कानावर पडताच तुझ्या रिमझिम बरसण्यानं  माझ्या  अंगावर मोरपिस फिरवतो आहेस असं वाटतं.  किती सुंदर रीतीनं तू चिंब चिंब करतोस  मला !  तुझं हे  रोमँटिक  रूप प्रत्येकाच्या मनातल्या शृंगारिक आठवणी नक्कीच   जाग्या  करतं.                                
तुला हसायला  येत असेल ना?   तुझ्यातला *हास्यरस* कवी  विं.दा. करंदीकरांच्या 'स्वप्नामध्ये पडला पाऊस' या कवितेमधून कसा  खुलंलाय  बघ !                       "स्वप्नामध्ये पडला पाऊस पावसामध्ये पडल्या गारा आई म्हणाली,  'माझ्या दहा!' बाबा म्हणाले, 'माझ्या बारा!' आजोबाही लावून दात पावसामध्ये लागले धावू आजी बोलली खाटेवरून 'आपण दोघे कुठून खाऊ!'
हा हा हा !    
ए, हसऱ्या वर्षावा तू असा हसत आलास ना  की मला पद्मजा फेणाणी यांनी गायले लं 'हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर  साजिरा श्रावण आला 'हे गाणं आठवतं. श्रावण,  ऊन पाऊस आणि  हिरवाई हे किती छान नातं आहे ना.  श्रावणात तुझ्या बरसण्यानं  धरणी  हिरवा शालू पांघरून किती सुंदर दिसते.                         आश्चर्य वाटतंय ना तुला  माझ्या विवेचनाचं?           अरे वरंधा घाटाच्या कुशीत असलेल्या शिवथरघळीमधे श्री समर्थांची  कविता लिहिलेली आहे. ती कविता वाचताना कोणत्याही ऋतूमध्ये तुझं   *अद्भुतरसातलं*   रूप डोळ्यापुढे उभे राहत.     "गिरीचे मस्तकी गंगा      तेथुनी चालली बळे |         धबाबा लोटती  धारा      धबाबा तोय आदळे|       गर्जता मेघ तो सिंधू         ध्वनी कल्लोळ उठिला | कड्याशी आदळे धारा      वात आवर्त होत असे|   
काय किमया आहे ह्या श्री समर्थांच्या ओळीमध्ये  कळत नाही. पण तुझ्या ह्या अद्भुत रूपाची कल्पना तो प्रचंड प्रपात प्रत्यक्ष  बघितला की येते. शिवथरघळीचे सौंदर्य खरंच अद्भुत आहे. 

    ए,  पावसा आपल्या ऋग्वेदामध्ये जे पर्जन्यसूक्त लिहिलेल आहे ना त्यात तर तुझ्यातलं   *वीररस* दर्शवणारं  रूप मला खूप आवडलं. "पर्जन्य गर्जना करितो      नाद होतो भयंकर            पातक्याना  ठार करी     जलवर्षक वीर तो |            भीतो  नी पळतो दूर निरपराधी ही  तसा                  अपराध्या  ठार  करी         वीर  तो  जलवर्षक |पावनखिंडीत आपले बाजीप्रभू आणि मावळे सिद्धी जोहरशी लढत असताना तू रात्रभर कोसळत होतास  ते वीरश्रीनेचं  ना!
शत्रूचा संहार करणाऱ्या शूरा  ना साथ  देणाऱ्या वीर पर्जन्या  तुझ्या  ह्या  वीररूपाचा मला  खूप अभिमान  वाटतो हं !  

पण मागच्या  वर्षी तू  ज्या  *भयानक  रूपात* बरसलास ना त्यानं सर्वसामान्य लोकांची भयानक दैना झाली रे !
'नदीला आला महापूर 
पाणीच पाणी दिसें दूर दूर 
उजाडले घरदार, फाटले उर 
वरुणदेवा, का झालास  निष्ठुर? 
 डोळ्यादेखत सारं पाण्यानं हरलं 
मागे ना काही शिल्लक उरलं 
दुःखद आठवणींनी मन केवळ भरलं 
जीवन आज बनलं  भेसूर 
वरुणदेवा  का झालास निष्ठुर? '
तुझ्या या  भयानक  रूपानं  लोकांचे घर संसार  उध्वस्त केले रे !पण  त्यानन्तर  सुद्धा  तू  बरसतच राहिलास आणि  *रौद्ररूप  धारण* केलंस. 
कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय 
"जटा  पिंजून या लाटा 
विखाळी झेप ही घेती 
भिडे काळोख प्राणांना 
  दिशांचे भोवरे होती ". नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला.        'तांडव  होते पाण्याचे, भयाण होते रौद्ररूप 'असं सगळेजण म्हणू लागले. तुझा या *रौद्र* *रूपानं*  महापुरानं सगळीकडे हाहा:कार माजवला होता.
"पाऊस रात्रीचा, कभिन्न माध्यान्ही, धुसमुसता, काळ्या वैऱ्यासारखा "असं तुझं भयकंपित रौद्ररूपाचं  दर्शन  कवी  ना. धो. महानोर  आपल्या  कवितेतून घडवतात.  या महापूरामुळे  मनुष्य जीवन तर  विस्कळीत झालंचं  पण झाडें  उन्मळून  पडली,  बिचार्‍या मुक्या जनावरांना आपले जीव वाचवता आले नाहीत. जिकडेतिकडे ही मेलेली, कुजलेली जनावरे बघून तुझं भयानक *बीभत्स रूप* दिसलं.जिकडे  तिकडे ही  मेलेली , सडलेली  जनावरे बघून मला असं वाटलं की तुझ्यामुळेच हे  बीभत्स, किळसवाणं  दृश्य  निर्माण  झालं. माझ्या मनाला खूप यातना झाल्या रे !            'ढोरं  आधी सोडू की  पोरं  पाण्याबाहेर काढू?  आधी वाचवू तरी कोणाला?  काय करू? जीव अडकला होता जनावरात !'अशी संभ्रमावस्था ज्यांच्याकडे जनावरे होती त्यांची झाली. झाली. कवी ज्ञानेश्वर तोडकर म्हणतात, "हंबरणारी जनावरं  ही.. त्यांचं काय चुकलं होतं.. सोडली होती दावी सारी पण काळाचं दार  झाकलं होतं... पुन्हा नको रे
कोपू असा तू...  नातीगोती तुटतात.. डोळ्यापुढं मरण बघून हातातले हात सुटतात !"  सगळीकडे मेलेल्या  जनावरांचा खच  पडला होता. खूप दुर्गंधी सुटली होती. अगदी अंगावर शहारे आणणारं  आणि  किळसवाण दृश्य सगळीकडे दिसत होत. तू तरी काय करणार म्हणा !
 "मानवानी  वाटेल तशी वृक्ष तोड केली, नद्या नाले यांच्यात प्रदूषण केलं ,  प्लास्टिक पिशव्या जिकडे तिकडे टाकून गटारं  तुंबलीआणि सगळीकडे प्रदूषण वाढल.सगळं निसर्गचक्र बिघडलं!
 भोगा आता..त्याचाच परिणाम आहे ना हा !"असं  तू म्हणत असशील ना. खरंच रे पण तू असा कोपू नको ना आमच्यावर... 

मला  खूप दुःख झालं  हे सारं  बघून.  तशातच  रेडिओवर तुझं *करूण  रूप* कवी ग्रेस यांच्या कवितेच्या ओळी  कानावर पडताच दिसलं.    'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता     मेघात अडकली किरणे      हा सूर्य सोडवीत  होता.."     ए,  करुणपावसा कवी ग्रेस यांच्या काव्यातून तू *करूण  रसात* व्यक्त होताना दिसतोस.          'पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने  ,               हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने... '  
 खरंच मी  जेव्हा मनातून  खूप दुःखी होते ना  तेव्हा माझ्या डोळ्यातून पण दुःखाचा पाऊसच झरतो.
तुझी रिमझिम  बरसातही
 करुण रूपात असते.

  ए, पावसा  असा शांत का रे बसला आहेस?  जेव्हा माझ्या  अंतर्मनात तू बरसत असतोस ना तेव्हा  शांततेची वृष्टीच  करत असतोस. 
 भगवान गौतम बुद्ध म्हणतात, "शांतता नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही."   
संतश्रेष्ठ   श्री ज्ञानेश्वर माऊलींनी "धनु वाजे  घुणघुणा... वारा वाहे रुणझुणा"अशा अध्यात्म लईत  पावसाला टिपलय.   आषाढी एकादशीला माऊलींची पालखी घेऊन तुझ्याबरोबर भिजत जाणारे वारकरी बघितले की तू पण *शांतरसात नाहून* निघालेला  दिसतोस बर का!

 ए , नवरसात ओथंबलेल्या  पर्जन्या आवडली का तुला तुझीच नवरसातली  अनोखी रूपे ?  तुझ्यातले हे नवरस माझ्या जगण्यात बरसत गेले. पण ये ना रे आता भेटायला मला! कवी सौमित्र यांनी म्हटलंय  तसं  आपण दोघेही गाऊया  ना !                    "ढग दाटुनी येतात             मन वाहूनी नेतात             ऋतु पावसाळी सोळा        थेंब होऊनी गातात       झिम्मड पाण्याची... अल्लड गाण्याची....                           सर येते... माझ्यात...         सर येते... माझ्यात....   

          तुझीच वाट पाहणारी         
                    *सृष्टी*

सौं. हर्षदा मराठे 
इचलकरंजी 
19/7/20

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...