दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का?
...म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू
लोकसत्ता ऑनलाइन |
– वैद्य हरीश पाटणकर
नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!
आदिती दिवाळीच्या सुट्टीला गावी गेली होती. गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. आदितीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. मामाला थोडंफार येत होतं, पण आज त्याला आदितीच्या आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.
असो. तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:। .. महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असतान जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.
आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.
आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.
गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.
बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.
लाडू…
उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.
लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.
करंजी
आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.
चकली
वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.
चिवडा
तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.
अनारसे
अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.
अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.
Comments
Post a Comment