लघुकथा..... Author Unknown.
"ओव्हरड्राफ्ट....."
रोजच्यासारखी बिनगजराची पाच वाजता जाग आल्याने दातार मास्तर अंथरुणात उठून बसले. यंत्रासारखे हाताचे तळवे चेह-यापुढे आले आणि ते कराग्रे वसते लक्ष्मी…. म्हणायला लागले. काय करायचंय एवढ्या लवकर उठून? असं रोजच्यासारखं म्हणत ते चटकन उठले. पांघरुणाची घडी, चादर इस्त्री केल्यासारखी नीटनेटकी करून उशाशी असलेल्या तांब्यातलं उरलेलं पाणी त्यांनी पिऊन टाकलं आणि ते आवरायला लागले. सत्तरी ओलांडलेले मास्तर अजून वेतासारखे सरळ होते. सहा फुटांची सणसणीत उंची, रापलेला गोरा वर्ण, भेद घेणारे पिंगट डोळे, डोक्यावर पांढऱ्या केसांची झालर आणि खर्जातला आवाज म्हणजे दातार मास्तर. आजचा दिवस त्यांच्यासाठी विशेष होता. ह्या दिवसाला ते स्मरणयात्रा म्हणायचे. आनंदीला - त्यांची बायको - जाऊन आज दहा वर्ष झाली. मास्तर मोत्यासारख्या अक्षरात रोजनिशी लिहायचे. आज सगळ्या रोजनिश्या काढून ते बसायचे. काही ठिकाणी त्यांनी खुणेचे कागद ठेवले होते. तेवढंच ते आज वाचायचे. चटचट आवरून त्यांनी दुधाचा फक्कड चहा केला आणि कप घेऊन ते आरामखुर्चीत येउन बसले. कोकणातली सकाळ सुखासारखी असते, कमी काळ टिकणारी. एकदा सुर्य वर आला की घामाच्या धारा चालू. पण मास्तरांचं घर पूर्व पश्चिम दरवाज्याचं होतं त्यामुळे अनपेक्षित थंडगार झुळूक कधीही सुखवून जायची.
मास्तरांना फक्तं चहा करता यायचा, बाकी सगळी बोंब होती. त्यामुळे भूक लागली असं वाटलं तर ते चहा प्यायचे आणि परत खुर्चीत बसायचे. आत्ताही अंगणात कोवळ्या उन्हात बागडणा-या चिमण्या बघून त्यांना आनंदी आठवली. आपण गेलो की लगेच सगळ्या गायब होतात, आनंदी कडेनी गेली तर त्या निर्धास्त बसायच्या आणि तेंव्हा संख्येनेही जमायच्या. आज रोजनिश्या काढायचा त्यांना कंटाळा आल्यासारखं झालं. कुठे काय विसरलोय आपण! सगळं कसं कालपरवा घडल्यासारखं लख्खं आठवतंय. मागच्या जन्मीचं पुण्यं रग्गड असणार माझं म्हणून तू मला मिळालीस असं म्हणालेले ते एकदा आनंदीला, ती म्हणाली, 'खरंय, माझा मागच्या जन्मीचा पुण्याचा घडा रिकामा असणार हे मलाही जाणवतंय'. मास्तरांना आठवूनही हसू फुटलं आणि डोळे पाणावले. आनंदी होतीच तशी, अफाट निर्विष विनोदबुद्धीची, हजरजबाबी, उत्साही, आपल्या नावाला जागणारी आणि हवीहवीशी वाटणारी. मास्तर कोळ्याच्या जाळ्यात किडा अडकावा तसे ते आठवणींच्या जाळ्यात अडकून बसले. बाहेर निघायची घाई नव्हतीच तशीही त्यांना. मास्तर त्यांच्या पंचविशीत कधी शिरले ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
--------------
चिपळूणचा माधव दातार बी.ए.झाला आणि तडक गुहागरच्या शाळेत मास्तर झाला. मुंबईला मंत्रालयात नोकरी मिळत असताना त्यानी ती केली नाही. स्वखुशीनी त्यानी पायावर धोंडा पाडून घेतला. इनमिन दोन खोल्यात भरणारी ती पाचव्या इयत्तेपर्यंतची शाळा, मुलांच्या हजेरीएवढाच तुटपुंजा पगार. माधव दिसायचा कडक पण शिकवायला लागला की ऐकत रहावं नुसतं. काहीही समजलं नाही तरी मुलाला काय तरी वेगळं ऐकतोय असं वाटायला लावणारं. तो पोरात पोर होऊन कानगोष्टी केल्यासारखं शिकवायचा. इतिहासाच्या धड्याची नाट्य रुपांतरं करायचा आणि नाटक चालू असतानाच थांबवून आत्तापर्यंत काय काय कळलं ते विचारायचा. येताना बाहुलीच्या गोळ्या आणून टेबलावर ठेवायचा, त्या मांडून गणित शिकवायचा आणि बरोबर उत्तर देईल त्याला त्या गोळ्या द्यायचा. जीवशास्त्र असो नाहीतर अजून कुठला विषय असो दातार मास्तर शिकवणार म्हटलं की पोरांना त्यात काय अवघड असं वाटायचं. शाळेला लागून असलेल्या दोन गुंठ्यांवर मास्तरांना रहायला गावानी घर बांधून दिलं. मास्तर गावकुटुंबातील एकजण झाले. माधव ज्यांच्याकडे जेवायला जायचा त्या बापटांची भाची होती हरिहरेश्वरला, रमा केळकर. एका सुदिनी बापटांनी मुहूर्त काढला आणि माधवचे चार हात केले.
सुखवस्तू घरातील रमा मामाच्या शब्दावर हो म्हणाली. 'मुलगा चांगला आहे, एकटा आहे, निर्व्यसनी आहे, पैशांनी कमी आहे पण बुद्धीनी कुबेर आहे, तुझा लक्ष्मीचा हात फिरला की होईल सगळं नीट'. मोठा विजोड होता जोडा खरंतर. पाच फुटाला इंचभर कमीच रमा तशी. गोल चेह-याची, गुब-या गालांची, लिंबकांतीची, बोलक्या डोळ्यांची, डाळींबी ओठांची आणि कापूस गाठीसारखी स्थूल देहाची होती. शरीराचा भाग असल्यासारखं स्मित तिच्या चेह-यावर होतं. पिवळ्या अंगानी ती घरात शिरली आणि माधवच्या दोन खोल्यांना तिनी राजमहाल करून टाकलं. गुहागरला आल्यावर सवयीनी दुस-या दिवशी माधव सकाळी रोजनिशी लिहायला बसला. मागून डोकावत आनंदी म्हणाली. 'सगळं खरं लिहिणार? कुणाच्या हातात पडली तर पंचाईत होईल हो'. माधव अवाकच झाला, किती बिनधास्त आहे ही. माधवची नवरा म्हणून भीती तिला पहिल्या दिवसापासून वाटली नाही. तिच्यातलं ते लहान मुल माधव अनिमिष नजरेनी बघत रहायचा. एकदा रात्री त्यानी तिला विचारलं, तू असं बूटबैंगण, मला कसं हो म्हणालीस?' आनंदी लगेच म्हणाली, 'छ्या, उलट मलाच फायद्याचं, मी आयुष्यंभर तुमच्याशी मान वर करून बोलणार आणि तुम्ही मान खाली घालून'.
एकदा संध्याकाळी बापट आलेले घरी. 'माधव, हे नाव बदलतात ते ठिक आहे पण तुमचा नावांचा योग जुळून आला होता खरं तर चांगला - रमा अन माधव - उगाच बदललंस खरंतर'. माधव काही बोलायच्या आत आनंदी म्हणाली. 'बरं झालं ते बदललं ते, नाहीतर पेशव्यांसारखा यांना राजयक्ष्मा झाला तर काय केलं असतंत?' ती रांगोळी तर अशी रेखीव आणि सुबक काढायची की बघत रहावं. माधव एकदा म्हणाला, 'किती गुण गं तुझ्या अंगात, मी असा भणंग मास्तर, कशाला हो म्हणालीस मला, चांगली राणीसारखी राहिली असतीस श्रीमंताकडे आनंदात'. आनंदी गंभीर चेहरा करून म्हणाली, 'खरंय, मलाही वाटतं आताशा, माझं चुकलंच. पण तुमच्या शाळेतली मुलं डोळ्यापुढे आली. बिनलग्नाचा कातावलेला मास्तर मारझोड करणार म्हणजे त्या पोरांचं नुकसान, म्हणून केलं मी'. माधवलाही असं वारंवार निरुत्तर व्हायला आवडायचं. आनंदी असे विनोदाचे अत्तरसडे जातायेता टाकायची आणि परिस्थितीच्या निवडुंगात मोग-याचं पीक काढायची. मागणं हा स्वभाव नव्हताच तिचा. सतत देत राहिली.
तिचे वडील गेले मग एक दिवशी भाऊ आणि वहिनी आले. 'ताई, तुला काय काय हवंय सांग इस्टेटीतलं, तू म्हणशील त्याला मी तयार आहे', म्हणाले. आनंदी क्षणाचा विलंब न करता म्हणाली, 'मला काहीही नकोय, आत्तापर्यंत ज्या प्रेमानी वागलास ते कायम ठेव म्हणजे झालं. ते कमी झालेलं दिसलं तर मात्रं कोर्टात खेचेन वाट्याकरता'. आनंदी आरशाच्या चेह-याची होती, सगळं कसं स्वच्छ प्रतिबिंब. माधवनी कष्ट घेत शाळा वाढवली आणि तो मुख्याध्यापक झाला पण सगळं गाव त्याला दातारमास्तरच म्हणायचं. आनंदीनी अभिमानाने दारावर पाटी करून घेतली होती 'श्री.माधव दातार - मुख्याध्यापक'. माधव म्हणाला. 'अगं, पाटी काय करायचीये, ते काय राष्ट्रपतीपद आहे का?' आनंदी म्हणाली, 'असू दे, कुणी नवखा आला तर? आपल्या दोघात चेह-यावरून नाही कळत पण निदान पाटी वाचून तरी त्याला वाटेल की हा माणूस बायकोपेक्षा जास्ती शिकलेला दिसतोय'. तसं आनंदीही अकरावी पर्यंत शिकलेली होती.
माधवनी आयुष्यात एकदाच फक्तं तिला दु:खानी रडलेलं पाहिलं होतं. शाळेचा दहावीचा रिझल्ट होता. कुळवाड्याचं पोर शाळेत पहिलं आलेलं. त्याच्या आई वडिलांना कळण्याच्या पलीकडचं होतं सगळं. दोघंही माधवच्या घरी काम करायचे आणि ते पोर ही हुशार होतं. पुढचा खर्चही माधवच करणार होता. मुलाचं कौतुक होताना बघून त्याच्या आईचा फुललेला चेहरा बघून आनंदीला भरून आलं, न्यून जाणवलं आणि पटकन तिनी डोळे पुसले. माधवच्या नजरेतून ते सुटलं नाही. सुखी आयुष्यात तेवढी एकंच खंत होती खरंतर पण दोघांनी कधीही त्यावर राग राग केला नाही की आदळआपट केली नाही. आनंदीचं उत्तर असायचं 'करायचीयेत काय व्रत करून? उगाच एक दोन मुलं नकोयेत आणि मला, गांधारीचं कुठलं व्रत असेल तर सांगा'. त्यादिवशी रात्री माधवनी जवळ घेतलं आणि आनंदी बांध फुटल्यासारखी फुटली. दोघांनाही न बोलता कळायचं सगळं. मोकळी झाल्यावर ती म्हणाली, 'परत नाही कधी रडणार आता, नसेल नशिबात तर नसू दे, नाही त्याचं दु:खं कशाला, त्यानी आहे त्याचा आनंदही नासतो. आपलं विरजण नाही लागलं त्याला काय करणार आणि एक बरंय की लोकांसारखी घोटाळा होण्याची भीती नाही आपल्याला, न घाबरता आनंद मिळतोय की' आणि हसायला लागली. माधवनी मग तिला अजून जवळ घेतलं.
वर्षामागे वर्ष गेली, पिढ्या आल्या आणि शिकून गेल्या. साठाव्या वर्षी दातार मास्तर पेन्शनीत निघाले पण. शाळेनी घर त्यांनाच दिलं होतं. शाळेची प्रगती मास्तर कौतुक नजरेनी पहात होते आणि सुखावत होते. तिच्या भावाचा मुलगा दिनकर आलेला एकदा. 'काका रिटायर्ड झालात ना, दोघंही चला मुंबईला माझ्याकडे कायमचे, मलाही आता मोठं कुणी नाही घरात'. आनंदी म्हणाली, 'अरे, दुरत्वात प्रेमाला उधाण असतं. नाती फार जवळ आली की त्याची वर्तमानपत्र होतात, चटकन शिळी होतात. इथे बघ, हे पंचम जॉर्ज आणि मी एलिझाबेथ. पण काळ काही सांगून येत नाही, वाटलंच तसं तर मात्रं हक्काने येईन, पण येत रहा रे असाच वरचेवर, तुझ्या शिवाय तरी मला कोण आहे माहेरच्या मायेचं. आयुष्याच्या सातबा-यावरून आमचं नाव कधी कमी होईल सांगता येत नाही आता.' भरल्या डोळ्यांनी तो गेला, 'काय हो, तुम्हांला जायचं मनात नाही ना? नंतर म्हणाल, मला जायचं होतं.' माधवनी फक्तं हसून तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं.
दोघंजण उन्हं उतरत आली की अंगणात खुर्च्या टाकून बसायचे. रस्त्यानी जाणारा प्रत्येक जण काही न काही बोलून पुढे जायचा मग त्या माणसाच्या कुठल्या न कुठल्या आठवणीत ते रमून जायचे, विद्यार्थी यायचे, भरभरून बोलायचे, नमस्कार करून भरल्या डोळ्यांनी परत जायचे. मास्तर हल्ली फार हळवे झाले होते. पटकन गहिवरून यायचं त्यांना. एकदा असेच अंधार पडला तरी ते बोलत बसले होते. मास्तर एकटेच बोलत होते. तक्रार काहीच नव्हती. आठवणींच्या चंदनाचे सुखाचे वळसे होते फक्तं. आनंदी एवढंच म्हणाली, 'मला काही तुमच्यासारखं मोठं मोठं नाही बोलता येत. पण मी जे काय जगले ते आनंदात जगले, शेवटी प्रेम म्हणजे काय असतं हो? न सांगता मनातलं समोरच्याला समजतं ते प्रेम असतं. तुम्हाला काय मला काय, कधी सांगावं लागलं नाही एकमेकाला. हल्ली हळवे झाला आहात तुम्ही फार, दोघांनाही वाटतंय एकत्रं उतरू शेवटच्या स्टेशनला, पण ते काही आपल्या हातात नाही. पण जो शेवटी उतरेल त्याने मात्रं रडत, कुढत नाही करायचा तो प्रवास एवढं लक्षात ठेवा, चला उठा, आयुष्याची आणि दिवसाची संध्याकाळ झाली, पण आहोत तोवर दिवा लावायचाच'.
--------------
सगळं आठवून मास्तरांनी पंचाला डोळे पुसले. मास्तर आजवर तसंच जगले होते, न कुढता, न रडता. आनंदी आयुष्यात आल्यापासूनचा चाळीस वर्षाचा प्रवास केवढ्या गतीनी झाला. चाळीस वर्ष आणि ती गेल्यानंतरची ही दहा. दिनकर बोलावून थकला पण मास्तर काही गेले नाहीत मुंबईला. त्यांचाच विद्यार्थी शाळेत मास्तर झाला होता. त्याची बायको डबा द्यायची, ती ही त्यांचीच विद्यार्थिनी. आनंदी गेल्यापासून ते एकवेळ जेवायचे. दोन वेळचा चहा स्वत: करायचे. रसिका डबा घेऊन आली आणि मास्तर भानावर आले. 'अगो, आणलायेस खरा डबा तू, पण मला भूक नाही, घेऊन जा आज परत.' 'मला माहितीये, दहा वर्ष झाली ना आज? सगळं काकूंच्या आवडीचं आणलंय. त्यांची चव नाही माझ्या हाताला पण केलंय मात्रं त्यांनी जसं शिकवलेलं तसंच'. 'नाही गं, तू सुगरणच आहेस, घोटाळा माझ्या बाजूला आहे, अन्न तेच आहे पण त्याची चव ती घेऊन गेली बघ. असो, तू एवढ्या मायेनी आणतेस, ठेव, खाईन मी. थांब, जेवूनच घेतो, आजपासून बसशील जेवेपर्यंत? भूतासारखं वाटतं आताशा, घास जात नाही घशाखाली.' रसिकानी हुंदका आवरला आणि तिनी डबा उघडायला सुरवात केली.
सावरलेले मास्तर तिला म्हणाले, 'तुला सांगतो रसिके, चाळीस वर्ष फक्तं सुख दिलन तिनी मला, मी ओव्हरड्राफ्ट घेतला होता सुखाचा, त्याचे हप्ते भरतोय बघ गेली दहा वर्ष, अजून किती बाकी माहित नाही'.
As received on whatsapp.
Comments
Post a Comment