*माज्या सारंगा, राजा सारंगा…*
*लता मंगेशकर*
कोळीगीतं गाताना आणि नंतर ऐकतानाही खूप मजा आली. किती वर्षं झाली या गीतांना… पण आजही ती कानावर पडली, तरी मन समुद्रात-कोळीवाड्यात भन्नाट फिरुन येतं.
शांताबाईंनी लिहिलेली आणि बाळने (हृदयनाथ मंगेशकर) संगीत दिलेली तीन कोळीगीतं मी गायले आहे. ही कोळीगीतं गाणं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. कारण ती गीतं लिहिताना शांताबाईंनी कोळी लहेजा शब्दांत नेमका पकडला होता, बाळने त्याच्या चालींमध्येही तो नेमका उतरवला होता, आता कसोटी माझी होती. तो लहजा गाताना मला नेमका पकडता आला नसता, तर सगळी मेहनत फुकट गेली असती... पण मला सांगायला आनंद होतो की, मी शांताबाई आणि बाळ दोघांनाही न्याय दिला. आजही जेव्हा मी ही गाणी ऐकते, तेव्हा माझ्याभोवती कोळीवाड्याचा, समुद्राचा आणि त्यात मासेमारीला गेलेल्या होड्यांचा माहौल उभा राहतो. मला खरंच कौतुक वाटतं शांताबाईंचं की त्यांनी कोळीवाड्यातली ही शब्दकळा कशी अचूक साध्य केली असेल? पण शेवटी शांताबाईच त्या, भाषाप्रभू होत्या. संस्कृत-मराठी भाषा त्यांना वश होत्या. मनातली एखादी भावना-विचार सांगायची खोटी, दुसऱ्या क्षणाला त्यांनी अलवार गीत पेश केलेलं असायचं. हुकमी नाणं होत्या, शांताबाई!
शांताबाई, म्हणजे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके. आमच्या मंगेशकर कुटुंबाशी त्यांची छान नाळ जुळलेली होती. डोईवरुन अंगभर पदर लपेटून घेतलेल्या शांताबाई घरी आल्या की सगळेच खूश व्हायचे. त्यांच्याकडे साहित्य-संस्कृतीविषयक माहितीचा एवढा साठा असायचा की, त्या बोलत राहायच्या आणि आम्ही ऐकत राह्यचो. आमच्या माईचाही त्यांच्यावर जीव होता. त्या जशा वागायला-बोलायला साध्या-सोप्या, तसंच त्यांचं गीतलेखन होतं. एवढं छान आणि नेमकं लिहायच्या की, त्या गीतातले भाव लगेच मनात उमटायचे. आता हे कोळीगीतच बघा ना-
मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो ये जा !
आयबापाची लाराची लेक, मी लारी
चोली पीवली गो नेसलंय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चा चाफा
वास परमालता वार्यानं घेतंय झेपा…
किती नेमकी शब्दरचना आणि तीही कोळ्यांच्याच भाषेत! कोळीवाड्यात तोऱ्यात मिरवणाऱ्या मुलीचं चित्रं डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहतं. हेमंतकुमार यांच्याबरोबर हे गाणं गाताना मजा आली होती. असं वाटत होतं की भर समुद्रात नाव लोटलेली आहे आणि आम्ही गातोय... बेधुंद-बेभान होऊन.
शांताबाईंनी लिहिलेली आणि मी गायलेली चित्रपटगीतं खूप आहेत. परंतु स्वतंत्रपणे आम्ही एकत्र खूपच कमी काम केलंय- 'गजानना श्रीगणराया, आधी वंदू तुज मोरया' आणि 'गणराज रंगी नाचतो' ही दोन गणपतीची गाणी आणि तीन कोळीगीतं, एवढंच! गणपतीची गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. परंतु मला शांताबाईंनी लिहिलेली कोळीगीतं विशेष भावली. एक वेगळंच जग त्यांनी माझ्यासमोर उभं केलं. जे माझं नसताना, माझ्याही नकळत माझं होऊन गेलं. महत्त्वाचं म्हणजे ही म्हणायला कोळीगीतं आहेत, परंतु त्यातला आशय भावगीतांचा आहे. आज उडत्या चालीची अनेक कोळीगीतं लोकप्रिय आहेत. परंतु शांताबाईंनी लिहिलेल्या आणि बाळने संगीत दिलेल्या कोळीगीतांची खासियत म्हणजे ती भावप्रवाही आहेत. या गीतांचं संगीत शब्दांबरोबर अलगद पुढे जातं, वाऱ्याने समुद्राच्या पाण्यात अलगद लाटा उठाव्यात तसं. आता हेच गाणं बघा-
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं धाकल्या दीरा र
चल जांवया घरा !
मासेमारीसाठी होडी समुद्रात लोटलेली आहे, परंतु मध्येच तुफान सुरू झाल्यामुळे सारंगाबरोबर गेलेली स्त्री सैरभैर झालीय. ती त्याला होडी पुन्हा किनाऱ्याकडे वळवायला सांगत आहे. तिची आर्जवं, तिच्या मनातील कालवाकालव सगळं शांताबाईंनी किती सहज शब्दांत पकडलंय नि बाळनेही त्याला तसंच संगीत दिलंय.
'माज्या सारंगा, राजा सारंगा' गीतांत नाजुकशी हुरहुर आहे. समुद्रात आलेल्या उधाणाने स्त्री घाबरुन गेली आहे. परंतु या गीतातील आशयाच्या नेमका उलट आशय असलेलं गीतही शांताबाईंनी लिहिलंय. तिथेही वादळंवारं सुटलेलं आहे आणि नाखवाने होडीला पाण्यात लोटलेलं आहे. पण तिथे प्रीतीचा जल्लोष आहे. त्या गाण्यातली स्त्री जणू समुद्राच्या लाटांनाच आव्हान देत आहे, कारण तिचा तिच्या सजणावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच ती दुःखाने नाही, तर आनंदाने म्हणते -
वादळ वारं सुटलं गं
वाऱ्याला तुफान उठलं गं
भिरभिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पाण्यात लोटलं
वादळ वारं सुटलं गं...
वेगळ्या बाजाची ही कोळीगीतं गाताना आणि नंतर ऐकतानाही मजा आली, अजून येते. किती वर्षं झाली या गीतांना! पण आजही ती कानावर पडली, तरी मन -कोळीवाड्यात फिरुन येतं. कारण कोळीबांधवांच्या भावनाच तर, शांताबाईंनी नेमक्या पकडल्या होत्या, शब्दांत!
As received on whatsapp.
Comments
Post a Comment