Skip to main content

मराठा महायोद्धा बाजीराव

As received on whatsapp-

Milind: 

जगणं विसरू नकोस....
 

प्रा. गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता....                                                                      त्यांच्याच "चांदणझुला" मधून एक नवी कोरी कविता......

"जगणं विसरू नकोस...."

"सखे,"
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस....
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

तुला निराश करणारे 
अनेक क्षण येतील...
पाय घालून पाडणारे 
अनेक जण येतील...

त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... 

तुझं कौतुक प्रत्येकाला इथं 
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही...

कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... 

तुला सुद्धा मन आहे 
याचा विचार कर...
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर...

काळजापासून माया तुझी 
झरणं विसरू नकोस...
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... 

रडावंसं वाटेल तेव्हा 
रडून मोकळी हो...
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो....

रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस.... 

तुला कुणाला पुरावे 
द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला परतून 
यायची गरज नाही....

ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस....

 Harshada: 

कोण?

कोण फिरवतो कालचक्र हे?
दिवसामागून रात्र निरंतर
कोण मोजतो खेळ संपता?
आयुष्याचे अचूक अंतर

कोण निर्मितो श्वासांसाठी?
करूणेचा हा अमृतवारा
कोण फुलवतो आठवणींनी?
रंध्रा रंध्रातुन पिसारा

कोण राखतो काळजावरी?
शरीराचा हा खडा पहारा
कोण शिकवतो कसा धरावा?
स्वप्नांमधला मुठीत पारा

कोण ठरवतो; पाऊस येथे
कधी दडावा, कधी पडावा?
कोण सांगतो कधी कसा अन,
कोणावरती जीव जडावा?

कोण पढवतो जगता जगता?
नावडता, तरी हात धरावा
कोण रोखतो अदम्य ईच्छा?
हृदयामधला श्वास सरावा

कोण बोलतो निमूट रात्री?
शरीराशी शरीराची भाषा
कोण रूजवतो गर्भामध्ये?
जगण्याची ही नाजूक आशा

कोण फुंकतो श्वासांमधूनी?
रक्तामधल्या प्रेमळ लहरी
कोण साठवी गंध कळ्यांतून?
दवभरल्या या गुलाबप्रहरी

रात्रीच्या या रोज ललाटी
चंद्रटिळा हा कोण रेखितो?
वसुंधरेला न्हाता न्हाता
सूर्याआधी कोण देखितो?

आई नसता जगात जरीही
घास भरवतो कोण तरीही?
पहाट स्वर्णिल कोण दावितो?
कटू स्मृतींची रात्र जरीही

रचतो कैसा कोण नभातुन?
थेंबांमधली भिजली गाणी
मातीच्या या ओठांमधूनी
कोण बोलतो हिरवी वाणी?

कोहं कोहं कोण वदवितो?
प्रश्न चिरंतन, बाकी नश्वर
कोण लुब्ध जो या सृष्टीवर?
नतमस्तक हे उत्तर 'ईश्वर
...............


 Dr Vasanti: 

तुम्ही मरताय हळूहळू

तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

सवयीचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

या कामात मन रमत नाही, असं वाटतं; 
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत 'त्या' व्यक्तीशी तरी, 
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

- पाब्लो नेरुदा,
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी।

Dr Vasanti:

 🌹हे तुम्ही वाचलेच पाहिजे🌹

मराठा महायोद्धा बाजीराव 
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून
गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला
सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने
देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होता तो एकाच गोष्टीचा… पण ती देखील कुठे आहे
कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त 'हिंदुस्तानातच आपल्यावर येऊ शकते..

१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने खाड्कन डोळे उघडले आमचे…
हा लेख होता श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर....

त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!
बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू झाला हे आम्हाला माहित
होतं…
पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव
खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? 'लढवय्या पेशवा' पेक्षा
'बाजीराव – मस्तानी' ह्या प्रकरणाला जास्त महत्व
देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!

ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!

"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"

बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश ह्या मोगल सरदारा खिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते.
असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव
उठले आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.
बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.

" उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर
इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून
उशीर झाला!"

ह्याला म्हणतात मराठी बाणा! 

ह्या कृत्यानंतर बाजीरावाने
बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…
आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!

अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय
आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार
असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा म्हणून आम्ही लगेच निघतो काय… सगळं अगदी घाईघाईत घडलं…
इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार येऊन गेला..
जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल
बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या पुलावरून ती ओलांडली…

घोड्यांच्या टापांनी हादरून
उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या आवाजाने भरून गेला होता!

बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा मिनिटे एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही
बळजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला…. आणि नंतर लागल ते एक छोट गाव! 
हेच रावेरखेड़ी असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला! अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही
पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये
विचारल,
"इधर कोई समाधी है क्या?"

" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"
असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड
होतो अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!
कोणालाच माहित नाही! मग मूळ मुद्द्यावर आलो,
"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?" रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे
कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय… मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने आम्ही कूच केली…
ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…

गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे… भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम... जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर
असावीत!

सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले असतील!
अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....
सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि
आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक
दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर
नेणारा हाच तो......
बाजीराव!

गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित
स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती!
कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक
व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!........असो!
तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता करता गाव संपल! पुढे नुसती सपाट जमीन!
डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय तयार होइल इतकं भाजून काढणार ऊन!!
आता काय करायच ह्या विचारत असताना एक
उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी
वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पाहू इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरलेला तो मारून पाहू!
असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!

पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची
जाणीव त्या दिवशी झाली!
आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!
आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल अशी आपण अपेक्षा ठेवत नाही. तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!

महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून
आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?"
असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही
गोष्ट घडली खरी! असो!
मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"
"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे
म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!

हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम
बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस 'दादासाहब' ह्या
खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता! मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले....

"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."

पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!
पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!!
इतका मान! इतका आदर!! 

ते देखील पुण्याहून शेकडो
मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!! आश्चर्य! 

मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या!
ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे
देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी.......
"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न
विचारणारे महारथी देखील आहेत!

आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे
निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे आणि ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा
गावठी 'दादासाहब' कुठे !

मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का
असेना लाज वाटली! जणू ह्या 'दादासाहब' ने नकळत
आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच गालावर पडली होती!

कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,
क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे! पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!

शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पणे आपण नावे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?
कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला 'दादासाहब'! त्याला काय घेणं देणं नसताना
इतका आदर करतो मराठ्यांच्या पेशव्यांचा....
पेशवा सरकार!!

ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि
आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या महान पुत्राला वंदन केले आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो! तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत निघालो!
परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण
विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो 'दादासाहब'!
बाहेर वा-यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत
परत ऐकू येत होते....

पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!
पेशवा सरकार!!!

मित्रांनो नक्की शेयर करा _/|\_

वाचल्या बद्दल धन्यवाद्
प्रांजल वाघ.

Comments

Popular posts from this blog

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ?

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं ? (इतिहास) पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे. १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ