काल बिजॉन रॉय गुप्ता यांच्या बंगाली कथेचा अनुवाद वाचताना त्यात एक सुंदर शब्द आला...
*गोधुली* .
हा शब्द मी खुप पुर्वी कॉलेज जीवनात असताना ऐकला होता . काही शब्दांचं नादमाधुर्य इतकं सुंदर असतं की ते उच्चारताच त्यातली स्वर आलापी जाणवुन येते .
गोधुली हा शब्द असाच .
हा शब्द मी पुर्वी गजरा ह्या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमासाठी उषा मंगेशकरानी आपल्या मुलाखतीत वापरल्याच मला आठवतय .
त्यांतर भावसरगम ह्या कार्यक्रमात त्यांनी
कान्हा घेउनी जाय .
वनी धेनु घेउनी जाय ..
संगे चाले सिदाम सुदाम ...
या एका बंगाली गाण्यावरुन घेतलेल्या गोड गाण्याची माहीती सांगताना वापरला होता .
आमच्या शेजारी श्री वामन निवास हा मठ आहे . या मठात दर वर्षी परमपूज्य गुळवणी महाराजांच्या उत्सवाला प्रसिध्द साहीत्यीक श्री राम शेवाळकर नेहमी यायचे . एकदा मी भेटायला गेलो . तेव्हा गोधुली ह्या शब्दाचा अर्थ त्यांना विचारला .
शेवाळकर काकांनी " गोधुली " ह्या शब्दाचा अर्थच नुसता सांगितला अस नाही तर त्याची फोड करुन सांगितली.
गोधुली म्हणजे ... पूर्वी गुराखी गायी चरायला जंगलात , दूर नेत असत. प्राण्याना वेळ खुप छान कळते. ठरावीक वेळ ही त्यांच्या इतकी अंगवळणी पडली असते कि एक मिनीट सुध्दा इकडलं तिकडे होऊ नये.
पूर्वी घड्याळं नव्हती . पण ह्या गायी आपल चरणं झाल की कळपानी एकत्र जमत आणि परत आपल्या गोठ्या कडे जायला वळत .
ही वेळ असायची सुर्यास्ताची म्हणजे दिवेलागणीची . आणि सगळ्या गावाकडच्या गायी ठरावीकच वेळी परतीच्या वाटे असायच्या . जणू काही एका घड्याळाच्या गजराने एकत्र जमायचे असे त्याना सांगितले असावे .
या गायींच्या कळपामुळे धूळ उडायची आणि मग घरातल्यांना दूर अंतरावरून पण उडालेल्या धुळीवरुन कळायच की गायी , गुराखी , घराकडे येत आहेत . *गायींच्या पावलांनी उडवलेली धुळ म्हणजे गोधुली* .
सुर्य अस्ताला निघालाय केशरी , सोनेरी प्रकाश पसरलाय , गायींच्या गळ्यातील घुंघरं रुणझुण वाजतायत , मधूनच वासराच्या ओढीनी एकादी गोमाय हंबरतीय . किती सुंदर छान दृष्य असेल नाही .
आणि मग ह्या गायी घरी आल्या कि देवा पुढे सांजवात लावुन तुळशी पुढे दिवा लावुन घरची लक्ष्मी ह्या गोमातांच औक्षण करायची .
ही वेळ म्हणजे गोधुलीची वेळ . संध्याकाळची सांजवातीची वेळ .
किती सुंदर कल्पना . किती छान विचार , आणि किती सुंदर व्यापक आणि समर्पक अर्थ ह्या *गोधुली* नादमय शब्दाचा ...
Author Unknown.
Comments
Post a Comment