"मामाचं गाव" "आजोळ" अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो...कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी...आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात...अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये भरुन बुकींग करतात...
तिथे गेल्यावर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसतात, धाप लागली तरी विहीरीचं पाणी शेंदतात...श्वास वरखाली झाला तरी "तुला सांगतो अश्विनी, आमच्या लहानपणी माणगावला मामाकडे गेलो की मी दहा दहा बादल्या पाणी काढायचो विहीरीतून" असं सांगत असतो. चि.अश्विनी मात्र How to fetch water from well? चा व्हिडीओ युट्यूबवर शोधत असते.
सकाळी मऊभात-तूप-मेतकुट खाताना त्याला त्याची अलिबागची इंदूमावशी आठवत असते. तिच्या हातच्या मऊभात मेतकुटाची चव तो इथे शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघतो..ब्रेकफास्टला पास्ता नसल्याने किंचित नाराज झालेलं त्याचं पोरगं, बापाला बरं वाटावं म्हणून मनाविरुध्द मऊभात गिळत असतं.
इको-टुरिझमच्या अद्ययावत गोठ्यातल्या देशी गायी बघून त्याला बाबूकाकांचा जुना गोठा आठवतो, गायीच्या मानेची पोवळी खाजवत तो पोरांना बाबूकाकांची "यमुना" गाय त्याकाळी पाच शेर दूध कशी द्यायची हे आठवून सांगतो. पोरं शेणामुताच्या वासाने गुदमरत उसने हास्य आणून माना डोलवत असतात.
दुपारी कॉटेजमधे चटई टाकून तो पडतो आणि शहरात आयुष्य घालवलेल्या बायकोला जुन्या आठवणी सांगत बसतो. ती जांभया देत ऐकत बसते..
इथला सूर्यास्त त्याला चौल रेवदंड्याची आठवण करुन देतो. नानाकाकांनी अशाच एका सूर्यास्ताच्या वेळी "समुद्राला रत्नाकर का म्हणतात?"ती त्याला ऐकवलेली गोष्ट मुलांना चौथ्यांदा सांगतो....
सकाळी निघताना याचा पाय तसा निघत नसतो आणि मुलं बॅगा भरत असतात. त्याच्या नकळत त्याच्या बायकोला…"ममा नेक्स्ट टाईम अॅटलिस्ट मेघालय किंवा उटी तरी बघ हं...प्लीज" असं मुलीने बजावलेलं असतं.
"कसं वाटलं मामाचं गाव?" या त्याच्या प्रश्नावर मुलं अबोलपणे मान डोलावतात...तो खुशीत येउन गाडी रिसॉर्टबाहेर काढून मार्गस्थ होतो... कारण, खरंतर मुलांपेक्षा त्यालाच गरज असते आजोळची, मामाच्या गावाची...त्याच्या मुलांना मामाचं गाव म्हणजे त्याचा हिरानंदानी मधला फ्लॅट इतकंच माहिती असतं. त्यांच्या अनुभवविश्वाच्या टप्प्यात तेच असतं... पण यालाच खरी गरज असते जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...काळाच्या ओघात तुटलेले सांधे कृत्रिम वंगण घालून जोडता येतायत का ते बघण्याची...भुतकाळात गेलेलं मन साधारण कोपरखैरणे आलं की वर्तमानात येतं..उद्याचं प्रेझेंटेशन डोळ्यासमोर नाचू लागतं. HR चे ईमेल्स, परवाची VP सोबतची मिटींग...आणि एक निरागस मुल पुन्हा डांबरटपणाचा बुरखा घेऊ लागतं...
Author unknown.
Comments
Post a Comment