या पदार्थासाठी घरी जवळपास 10/15 दिवस जुना आणि कुणी खात नसल्याने दीनवाणे कटाक्ष फेकत असलेला चिवडा हवा. आधी या चिवडा संपावा म्हणून घरातल्यांना आग्रह करून त्यांची बोलणी खाल्लेली असावी म्हणजे आई तुला खपवाखपवी करायला आम्हीच लागतो का असे मुलांनी म्हणायला हवे. ए तुझे चिवडा पूराण बस कर बाई तु खा मला नको असे नवर्याने पण म्हणायला हवे. मग मी तरी तुला का खाऊ असे दुर्लक्ष आपण पण करायला हवे. असे काही घडले की चिवड्याची खूमारी अधिक वाढते.
तर असा चिवडा खसकन डबा ओढुन वसकन मिक्सरच्या भांड्यात ओतावा. खर्रकन मिक्सरचा कान पिळुन चिवड्यातले दाणे कढीपत्ताा डाळे मिरच्या या सह तो मिक्सरमधून बारीक दळावा. परातीत घेऊन त्यात वाटीभर बेसन व वाटीभर कणीक बचकभर तिखट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ कचाकचा कापलेला कांदा घालून वचकटपणे मिसळावे. शेतकर्यांच्या संपामुळे 20 रू ला 20 काड्या मिळालेल्या कोथिंबिरीच्या काड्यातल्या 5/6 काड्या ओढून कराकरा चिरून त्यात घालाव्यात. पाणी घालून लेकराला जितक्या मायेने गोंजारतो तसे गोंजारून गोळा मळावा. धपकन तवा ठेऊन त्यावर सर्रकन तेल ओतावे. मग थालिपीठाचा गोळा त्यावर ठेवून नवर्याने सांगितलेली भाजी न आणता भलतीच भाजी आणली की कित्ती कित्ती प्रेमाने त्याच्याकडे बघतो तितक्या प्रेमाने थालीपीठाकडे बघून त्याला थापट्या मारून गोल थापावे. मग निर्ममतेने त्याच्या पोटात बोटे खूपसुन त्यात तेल भरावे. मग झाकण ठेवून त्याला कोंडावे. ते थालिपीठ चर्र आवाज करून निषेध करायला लागले की उलटावे. खालुन ते संतापाने लाल झाले असते मग दुसर्या बाजूला पण चांगला चटका द्यावा.
असे खरपूस भाजलेले थालीपीठ भस्सकन पानात काढावे एव्हाना नाके मुरडणार्या मुलांच्या नाकात खमंग दरवळ शिरलेला असतो. मग ते खस्सकन हातातले ताट ओढून तुकडा मोडुन गपकन तोंडात घालतात. मग wow आई सुपर साॅल्लीड अशा प्रतिक्रिया येतात आणि आपले कान तृप्त होतात. आई परत कर असेच अशी प्रतिक्रिया येते मग मेल्यांनो परत चिवडा करते आता अशी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या गोंधळलेल्या चेहर्याकडे बघुन दुसरे थालीपीठ लावायला घ्यावे... अशी ही चिवड्याच्या थालीपीठाची कहाणी सुफळ संपूर्ण. .....
As received on whatsapp
Comments
Post a Comment