कोणी गच्चीत फळे, भाज्या लावून मळा करतात. कोणी अंगणात छानशी बाग करतात. पण, श्री. व सौ. नारगोळकरांनी चक्क जंगल लावले! पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या खडकवासला येथे २० एकर जमिनीवर चक्क जंगल पेरले!
भारतभर अनेक वनात फिरलेले प्रमोद नारगोळकर, यांनी एकदा मनात घेतले, आपणच वन का तयार करू नये? लवकरच खडकवासला येथे जमीन घेतली. पुढे जमेल तसे आणि जमेल तेंव्हा जवळपासची जागा घेत राहिले. देशभरातून विविध झाडांची रोपे आणून येथे वृक्षारोपण केले. आसाम, हिमाचल, आंदमान, श्रीलंका, आफ्रिका अशी ठिकठिकाणहून ५०० हून अधिक प्रकारचे वृक्ष त्यांनी सिपना वनराईमध्ये लावले.
सिपना वनराईमध्ये वृक्षांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या मध्ये एक कमंडलू वृक्ष पहिला. याचे फळ अर्धे कापून आतला गर काढला की त्याचे टणक कवच वाडग्यासारखे वापरता येते, म्हणून त्याचे नाव कमंडलू. आणि एक ब्रह्मदंड वृक्ष. याच्या लाकडापासून दंड-कमंडलू या जोडीतला दंड तयार केला जातो. तसेच कृष्णवड, मुचकुंद, अर्जुन, कुंभ, रुद्राक्ष, ताम्हण, चंदन, कदंब, समुद्रफळ, रिठा, कवठ, काटेसावर, नागचाफा, सीताशोक, पांगर, पळस, आंबा, फणस, चिंच, वड, जायफळ, निरगुडी, तुती, बहावा, गुलमोहर, आवळा, विलायती चिंच, बिबा, खैर, केवडा, रोहन... असे कित्येक प्रकारचे जवळ जवळ २०,००० वृक्ष इथे आहेत!
नारगोळकरांनी आतापर्यंत ४०,००० रोपे तयार करून वाटली. तर वनराईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ४०० झाडे लावली. विशेष म्हणजे या वनराईतील एकही फळ ते तोडत नाहीत. ही वनराई त्यांनी प्राणी व पक्ष्यांसाठीच केली आहे, त्यामुळे ते फळ पक्ष्यांनी खावे, माकडांनी खावे आणि पिकल्यावर खाली पडून त्यातील बिया आपोआप रुजाव्यात इतकीच इच्छा!
महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्यासाठी नारगोळकरांना "वनश्री" पुरस्कार देऊन गौरव केला!
आता हा सगळा पसारा त्यांच्या पत्नी नयना ताई सांभाळतात. मागच्या २५ वर्षात सिपना वनराईने या भागाचे संपूर्ण रूप पालटले आहे! पालापाचोळा जमिनीत जिरल्याने, कधीकाळी उजाड असलेल्या माळरानाच्या जमिनीचा पोत सुधारला आहे. उंच झाडांमुळे अनेक पक्ष्यांना आसरा मिळाला आहे. अनेक पक्ष्यांच्या जाती इथे पाहायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे प्राणी यांना देखील इथे घर मिळाले आहे.
नयना ताईंनी पावसाचे पाणी साठवायला लहानसे तळे बांधले आहे. ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पाणवठे बांधले आहेत. या तळ्याभोवती आणि पाणवठ्यावर अनेक पक्षी जमतात. थंडीच्या दिवसात इथे स्थलांतर करून येणारे पक्षी देखील पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणासाठी आणि पक्ष्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सिपना वनराई एक निवांत जागा आहे. त्यांचे पुत्र अमोल नारगोळकर हे छायाचित्रकार असून, खास छायाचित्र काढण्यासाठी त्यांनी जागा करून घेतल्या आहेत.

Botany चा अभ्यास करणाऱ्यांना इथे निरीक्षणासाठी एक दिवस कमी पडतो. ही वनराई पाहायला, Botany च्या विद्यार्थ्यांप्रमाणेच, अनेक शाळेच्या सहली येतात. कौटुंबिक सहली देखील येतात.
सिपना वनराई मध्ये झाडांची रोपे, तसेच सेंद्रिय खत उपलब्ध असते. इथे एका दिवसाची कौटुंबिक सहलीची व्यवस्था आहे. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस राहण्यासाठी ही निवांत जागा आहे. Smart City मध्ये असे Oxygen Hubs ठिकठिकाणी असले पाहिजेत. सिमेंटच्या जंगलात असे झाडांचे जंगल उभारले पाहिजे, असे नयना नारगोळकर म्हणाल्या.
नयनाताई या वनराईची अगदी लेकराप्रमाणे काळजी घेतात. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणे, वणव्यापासून संरक्षण करणे, वृक्षातोडी पासून रक्षण करणे, अतिक्रमणावर लक्ष ठेवणे, सेंद्रिय खत प्रकल्पावर देखरेख, Rain Water Harvesting च्या प्रकल्पावर देखरेख, असे एक न दोन, भरपूर गोष्टींची काळजी त्या वाहतात. हा मोठा पसारा त्या आईच्या मायेने सांभाळतात. नयना ताईना भेटल्यावर आपण आधुनिक काळातील, आधुनिक शहरातील वनदेवी पहात आहोत, असे वाटल्या शिवाय राहत नाही!
Contact for bookings: 9370670478 / 9822048540 / 02024324115
Information as received on WhatsApp.
Comments
Post a Comment