*"याद किया दिल ने कहाँ हो तुम "- हेमंतकुमार*
" हेमंत दा जब गाते हैं , ऐसा लगता है कोई साधू मंदिर में गा रहा हो " …
असे यथार्थ उद्गार गानसम्राज्ञी लता मंगेशकरने हेमंतकुमार बद्दल काढलेले आहेत . तर प्रख्यात संगीतकार सलील चौधरींच्या मते देव जर कधी गायलाच तर त्याचा आवाज हेमंतकुमार सारखाच असेल . इथे मला वरचा आभाळातला देव म्हणायचाय हां . हो कारण आपल्या जमिनीवरच्या देवने (आपला देव आनंद हो) तर आधीच पडद्यावर हेमंतकुमारच्या आवाजातली कित्येक गाणी अजरामर करून ठेवलीच आहेत .
तर आजच्याच दिवशी १६ जून ला १९२० साली महान गायक हेमंतकुमार मुखोपाध्याय (मुखर्जी) यांचा वाराणसी इथे जन्म झाला . म्हणजेच २०२० हे सुरु असलेलं साल हेमंतकुमारचं जन्मशताब्दी साल आहे .
संगीतकार अनिल बिस्वास , एस डी बर्मन , सलील चौधरी यांच्या प्रमाणेच हेमंतकुमारच्या संगीतावर देखील बंगालच्या रविंद्र संगीताचा प्रभाव पडलेला जाणवतो . हेमंतदांच्या संगीतात पूर्व भारतातील लोकसंगीत आणि शास्त्रीयसंगीताचा सुरेख मेळ आढळतो .
१९३५ साली वयाच्या पंधराव्या वर्षी All India Radio मध्ये हेमंतकुमारने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आणि निमल सन्यास (१९४१) ह्या बंगाली चित्रपटासाठी आपलं पहिलं सिनेगीत गायलं .
हेमंतकुमारच्या आवाजाला मर्यादा आहेत असं अनेकांचं मत आहे . पण मला खरतर हाच त्यांचा प्लस पाॅइंट वाटतो . ह्या खर्जातल्या आवाजामुळेच हेमंतदांचा आवाज इतर गायकांपेक्षा खास ठरतो . त्यांचा आवाज ऐकताना मन एक वेगळीच तल्लिनता गाठतं , खुपदा तर ट्रान्स मध्ये जातं.
त्यांच्या ह्या गूढ धीरगंभीर आवाजामुळे त्यांच्या अनेक गीतांभोवती कायमच एक गुढतेच वलय निर्माण झालं आहे . मग ती विरह गीते असोत की प्रणय गीते किंवा एखादं भजन किंवा अंगाईगीत . त्यांचा स्वर अगदी हळुवारपणे मनाच्या गाभाऱ्यापर्यंत झिरपत जातो . बराच वेळ खोलवर घुमत राहतो . आत्म्याला स्पर्शून जातो .
आवाजाला मर्यादा असल्या तरी हेमंतकुमारने जवळ जवळ सर्वच प्रकारची गाणी गायली आणि अजरामर केली आहेत …
"जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला" आणि
"या दिलकी सुनो दुनियावालो" सारखी विरह गीते ऐकताना आजही डोळ्यातलं पाणी आवरता येत नाहीच .
"तुम पुकारलो तुम्हारा इंतजार है"
"न तुम हमे जानो न हम तुम्हें जाने"
ही गाणी तर एक वेगळीच हुरहूर निर्माण करतात .
हेमंतदांचा आवाज जरी एखाद्या साधू सारखा असला ना तरी त्यांना काही फक्त गंभीर विरह गीते किंवा भजनं गायला नाही मिळाली . उलट "हरे मुरारे मधु कैटभ हरे" आनंद मठ (१९५२) किंवा "दरशन दो घनश्यामनाथ मोरी अँखियाँ प्यासी रे" नरसी भगत(१९५७) सारखी मोजकीच भजनं त्यांनी गायली .
या उलट हेमंतदांच्या आवाजातील गुढते मुळे त्यांनी गायलेल्या प्रणयी गीतातील seductiveness मात्र शतपटीने वाढला . बघा ना
"ये रात ये चाँदनी फिर कहाँ"
"ये नयन डरे डरे ये जाम भरे भरे"
"चुप है धरती चुप है चांद सितारे"
ह्या गाण्यात हेमंतदांच्या आवाजात जाणवणारी ती ओढ , ती उत्कटता शब्दबद्ध करणं केवळ अशक्य .
हेमंतदांच्या आवाजातली
"जरा नजरो से कह दो जी" आणि
"बेकरार करके हमे युँ न जाईये" सारखी हलकीफुलकी प्रणयीगीते ऐकायला कसली गोड वाटतात ना ?
"न ये चाँद होगा न तारे रहेंगे
मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे"
हेमंतदांनी इतक्या आश्वासक आवाजात वचन दिल्यावर मन त्यावर बिनधास्तपणे विश्वास ठेवणारच .
मुनीमजी(१९५५) मधलं "शिवजी बिहाने चले" हे काहीसं विनोदी धाटणीचं गाणं तर मस्तच आहे पण त्यातलंच "दिल कि उमंगे है जवाँ" ह्यात हेमंतदांनी कसली धम्माल आणलिये .
"चली गोरी पी के मिलन को चली" हे शास्त्रिय गीत ,
" दे दी हमें आझादी बीना खड्ग बीना ढाल" हे देशभक्तीपर गीत
आणि माझं अत्यंत आवडतं अंगाईगीत "चंदन का पलना, रेशम की डोरी"
देखील हेमंतदांनीच गायलेलं आहे .
"ओ नींद ना मुझको आए"
"एक बार जरा फिर कह दो मुझे शर्माके तुम दिवाना"
"सो गया सारा जमाना iनिंद क्यू आती नही"
"छुपा लो युँ दिल में प्यार मेरा"
"याद किया दिल ने कहाँ हो तुम"
"नैन सो नैन नाही मिलाओ"
"मुझको तुम जो मिले ये जहान मिल गया"
"उम्र हुई तुमसे मिले फिर भी जाने क्युं"
ही व अशी अनेक लोकप्रिय युगल गीते सुद्धा हेमंतदांनीच गायली आहेत .
केवळ हिंदी आणि बंगालीच नाही तर हेमंदांनी काही मराठी गाणी सुद्धा गायली आहेत .
"गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय"
"मराठी पाऊल पढते पुढे"
"मी डोलकर डोलकर डोलकर दरियाचा राजा"
ही त्यापैकीच काही गाजलेली गाणी .
हेमंतदांनी फक्त गाणीच नाही गायली तर अनेक चित्रपटांना संगीतही दिलं . नागिन , साहब बीबी और गुलाम , बात एक रातकी , हाऊस नं 44 , अनुपमा , कोहरा हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट .
"पिया ऐसो जियामें समाई गयो रे"
"कोई दूरसे आवाज दे चले आओ"
कुछ दिलने कहा .... कुछ भी नहीं .... "
"सखी री सून बोले पपीहा उस पार"
"छुप गया कोई रे दूर से पुकार के"
"वो शाम कुछ अजीब थी"
"धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार "
"झूम झूम ढलती रात"
"कहीं दीप जले कहीं दिल"
ही हेमंतदांनी संगीत दिलेली पण इतरांनी गायलेली काही गाजलेली गाणी.
त्यांनी संगीत दिलेल्या असंख्य गीतांपैकी जागृती चित्रपटातल
"चलो चले मा
सपनो के गावो में"
हे स्वप्नांच्या रम्य दुनियेत फिरवून आणणार आणखी एक अप्रतिम पण काहीसं दुर्लक्षित राहिलेलं गीत .
नागिनचं संगीत तर इतकं अफाट गाजलं की त्यासाठी हेमंतदांना फिल्मफेअर अवार्ड मिळालं .
नागिन (१९५४) चित्रपटात हेमंतदांनी आपल्या प्रतिभेची कमाल साधली आहे .
"मन डोले मेरा तन डोले"
"मेरा दिल ये पुकारे आजा"
"जादूगर सैय्या छोडो मोरी बैय्या"
"मेरा बदली में छुप गया चांद रे"
"सून रसिया काहे को जलाये जिया आजा"
"तेरी याद में जलकर देख लिया"
अशी एक से एक लाजवाब गाणी लता ला देऊन ती अजरामर करून ठेवली .
नागिन मधलीच हेमंतदांनी गायलेली
"ओ जिंदगी के देनेवाले जिंदगी के लेनेवाले"
हे गाणं ऐकताना काळजात जितकं गलबलून येतं तितकंच
"तेरे द्वार खडा एक जोगी"
ऐकताना त्यातली मिश्कीलता मनाला भावते .
हाॅलीवूड दिग्दर्शक Conrad Rooks च्या १९७२ सालच्या "Siddhartha" चित्रपटासाठी हेमंतदांनी संगीत दिलं आणि त्यात गाणीही गायली . अशाप्रकारे हाॅलीवूड चित्रपटासाठी संगीत देऊन गाणारे ते पहिले भारतीय गायक ठरले . ह्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ US Govt. कडून त्यांना Baltimore आणि Maryland ह्या US मधल्या शहरांची Citizenship सुद्धा मिळाली होती .
गायन आणि संगीताबरोबरच काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली . बिस साल बाद , खामोशी , कोहरा हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट .
हेमंतदांनी गायलेली सगळीच गाणी कधीही , केव्हाही , हवी तितकी , हवी तितक्यांदा ऐकावी अशीच आहेत . अस्ताव्यस्त मनाला आवरायला मदत करणारी , अशांत मनाला सुखावणारी ....
"याद किया दिल ने कहाँ हो तुम
झुमती बहार है कहाँ हो तुम"
असं विचारताच
"प्यार से पुकारलो जहाँ हो तुम
प्यार से पुकारलो जहाँ हो तुम"
असा आपल्या प्रेमळ आवाजात दिलासा देत तुम्हाला अलगदपणे कुशीत घेऊन मनाला समाधी अवस्थेकडे घेऊन जाणारी....!!
Author unknown.
Comments
Post a Comment