'हो नं कभी पथ विचलित ...
------------------------------
(महेश काळे)
'आपले डॉक्टर गेले'...या अवघ्या तीन शब्दांनी पोरसवदा असलेली शेकडो तरूण मुले अक्षरश: थिजून गेली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून 'हिंदु समाज संघटनेचा' बीजमंत्र घेऊन संघाचा कायविस्तार करण्यासाठी नागपूरची ही तरूण मुले देशाच्या विविध भागात गेली होती. मात्र २१ जून १९४० चा तो दुर्दैवी दिवस! या देशातील हिंदू समाजाला संघटित करण्याचे असिधारा व्रत घेऊन त्यासाठी रक्ताचे पाणी करणारा महामानव डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या अवघ्या ५२ व्या वर्षी झालेल्या मृत्युने सारा हिंदू समाजच हेलावून गेला. 'हिंदू' या अत्यंत गौरवशाली कुळात जन्माला येऊनही 'हिंदी' होण्याचे व्यसन जडण्याच्या त्या काळात डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू समाज संघटनेचे अशक्यप्राय वाटणारे कार्य करून दाखवल्याने अवघा हिंदू समाजच डॉक्टरांच्या जाण्याने पोरका झाला. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवस अगोदरच नागपुरातील अधिकारी प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्यावेळी देशभरातील चौदाशे स्वयंसेवकांसमोर बोलताना 'आज माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप मी पहात आहे' असे कृतज्ञतापूर्ण उद्गार डॉक्टरांनी काढले होते.योगायोगाने काही दिवसांपूर्वी नागपूरच्या रेशीमबागेवर तृतीय वर्षाच्या वर्गात जाण्याचा योग आला. स्मृतिमंदिरात डॉक्टरांच्या त्या भव्य मूर्तीचे दर्शन झाले.तब्बल ६९ वर्षांपूर्वी डॉक्टरांनी अशाच तृतीय वर्षाच्या वर्गात हिंदूराष्ट्राचे लघुरूप पाहिले होते, पण १९२५ साली आपण मांडलेल्या एका विचाराचे 'विश्वरूपदर्शन' डॉक्टरसाहेब घेत असल्याचा भास झाला.
आज संघकार्याची शतकाकडे वाटचाल चालू असताना आणि ज्या महामानवाने 'होय.. हे हिंदू राष्ट्र आहे!' हा दुर्दम्य विश्वास समाजाला दिला त्या डॉक्टरांच्या स्मृतिदिनी एक प्रश्न कायम मनात घोळतोय तो म्हणजे, आकर्षित होण्यासारखे कुठलेही बाह्य लक्षण नसताना शेकडो बाल-तरूण लोहचुंबकाप्रमाणे खेचले जावे असे डॉक्टरांमध्ये काय होते? केवळ खेचलेच नाही तर संघाच्या विस्तारासाठी ते सांगतील तिथे जाण्याचे धाडस ही पोरसवदा तरूण कसे काय करू शकली ? भाषा, प्रांत, आर्थिक व्यवस्था अशा असंख्य अडथळ्यांवर मात करत त्यांनी संघ कसा काय रूजवला असेल? संघाच्या अगदी प्रारंभीच्या काळात काही बालांना घेऊन डॉक्टरांनी संघ स्थापन केला. त्यावेळी त्यांचे एक सहकारी कायम म्हणत 'ही शिशू-बालांची पिलावळ कशाला पाहिजे? त्यांना बंद करा!'. मात्र आश्चर्य म्हणजे नागपूरच्या या 'पिलावळी'नेच संघ संपूर्ण देशात नेऊन पोहोंचवला.
डॉक्टरांच्या सांगण्यावरून राजस्थानमधील पिलानीमध्ये संघाच्या विस्तारासाठी गेलेला अवघ्या सोळा वर्षाचा चंडिकादास डॉक्टरांची प्रकृती बरी नसल्याचे कळाल्याने नागपूरला आला. पण आल्यावर त्याला एकच वाक्य ऐकायला मिळाले.. 'आपले डॉक्टर गेले!' ज्यांनी आपल्याला एवढ्या लांब शिक्षणासाठी पाठवले ते डॉक्टरच गेले मग आता कुणासाठी काम करायचे? असा प्रश्न पडला. पण डॉक्टरांनी त्याच्या मनात देशभक्तीचे फुलवलेले स्फूलिंग एवढे प्रखर होते की अवघ्या काही काळातच हा चंडिकादास पुन्हा संघकार्यात गुंतला. तो एवढा गुंतला की त्यातून नानाजी देशमुख नावाचं 'भारतरत्न' जन्माला आले. लोकमान्य टिळक गेल्याने सारा देश दु:खात असताना 'तुम्हाला क्रिकेट खेळायला काही वाटत नाही' असे डॉक्टरांनी म्हंटलेले वाक्य एका बालकाच्या मनात एवढे खोलवर रूतले की त्यातूनच दादाराव परमार्थ नावाचा एक बुद्धिमान प्रचारक नावारूपाला आला. काही बालकांना पोहणे शिकवण्यासाठी गेल्यानंतर विहिरीजवळून जाणार्या एका बालकाला डॉक्टरांनी 'विहिरीत उडी मारतोस?' असे थट्टेने विचारताच त्या बालकाने देखील पोहणे येत नसतानाही कमरेला दोरी बांधताच थेट विहिरीत झोकून दिले. त्याचा हा धाडसीपणा डॉक्टरांना भावला. त्यांनी त्या बालकाला प्रयत्नपूर्वक शाखेत आणले आणि गोपाळराव एरकुंटवारांसारखा एक बहुआयामी प्रचारक घडला.
हिंदू संघटनेसारखे दीर्घकालिन उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर या उमलत्या पिढीच्या मनात देशभक्तीचे संस्कार रूजवले पाहिजेत हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यातूनच एक एक बालक त्यांनी घडवले, त्याच्यावर विश्वास टाकला आणि त्याला संघकार्यासाठी प्रवृत्त केले. पुढे याच बालकांनी संघ सार्या क्षेत्रात नेला. ज्याला समाज घडवायचा आहे त्याला एवढा दीर्घकालिन विचार करून तो विचार प्रत्यक्ष आणण्याची वाट पहावी लागते हा महत्त्वाचा संदेश डॉक्टरांनी आपल्या कृतीतून दिला. डॉक्टर जन्मजात देशभक्त होतेच, पण आपल्यातील देशभक्तीचे स्फूलिंग त्यांनी कायम पेटते ठेवले. त्यामुळेच त्यांचे एक तपस्वी व्यक्तिमत्त्व तयार झाले. या तपस्वी जीवनाकडे पाहूनच शेकडो तरूण संघकार्यासाठी तत्पर झाले. १९२८ साली ज्या ९९ निवडक तरूणांना त्यांनी संघाची प्रतिज्ञा दिली, त्यापैकी जवळपास सर्व स्वयंसेवकांनी ही प्रतिज्ञा शब्दश: आजन्म पाळली, ती डॉक्टरांच्या तपस्वी जीवनाकडे पाहूनच. डॉक्टरांनी बालकांना घडवले वगैरे ठिक आहे, पण पू.श्रीगुरूजींसारखा एक बुद्धिमान प्राध्यापक देखील डॉक्टरांच्या व्यक्तित्त्वाला भुलला. गुरुजी एका ठिकाणी म्हणतात की, एकदा चुकून डॉक्टरांचे भाषण ऐकले. मला त्यात कोठे आरग्युमेंट, ऐतिहासिक दाखले,तत्त्वज्ञान, प्रमेये आढळली नाहीत. डॉक्टर एवढेच बोलले, 'स्वयंसेवक बंधूंनो! काम करा, निष्ठेने काम करा, प्रेमाने काम करा'. डॉक्टरांनी माझ्या अभिमानाला धक्का दिला. त्याचे कारण एकच होते की, ज्याची गाठ पडली. ते मन फारच विशाल होते.
श्रीगुरूजींनी म्हंटले हेच सत्य होते. आपले डॉक्टरसाहेब खूपच विशाल मनाचे होते. त्यामुळेच जे अशक्य मानले जात होते ते त्यांनी शक्य करून दाखवले. डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या काळात श्रावणभाऊ सूर्यवंशी नावाचे एक धुळ्याचे स्वयंसेवक शाखेवर आले होते.त्यांना डॉक्टरांच्या आठवणी सांगा असे सांगताच बराच वेळ त्यांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या.कारण प्रत्यक्ष डॉक्टरांचा सहवास त्यांना लाभला होता. ज्यांना सहवास लाभला त्यांना डॉक्टरांनी संघकार्याची प्रेरणा दिलीच. पण आजही जगभरातील कोट्यवधी स्वयंसेवकांचे डॉक्टर हेडगेवार प्रेरणास्थान आहेत.कल्याण आश्रमाच्या प्रारंभीच्या काळात आपल्या हातून काही काम होत नसल्याने परत जाण्याच्या विचारात असताना डॉक्टरांच्या अदृश्य भेटीमुळेच आपण आजन्म कार्य करू शकलो असे संघ प्रचारक कै.मोरूभैय्या केतकर सांगायचे. मोरूभैय्यांसारख्या अशा अनेक कार्यकर्त्यासाठी डॉक्टरांचे जीवन प्रेरणादायी होते आजही आहे.
आता याक्षणी माझ्यासमोर डॉक्टरांचे १९४० च्या संघशिक्षा वर्गातील अखेरचे बौद्धिक आहे. त्यातील काही बिंदू आजही महत्त्वाचे आहेत.त्याचा थोडक्यात आशय असा आहे.
- शरीरात प्राण आहे तोपर्यंत संघाला विसरणार नाही.
- पाच वर्षांपूर्वी स्वयंसेवक होतो असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका,
- आसेतू पसरलेल्या हिंदू समाजाला आपल्याला एक करायचे आहे.
- संघ केवळ स्वंयसेवकांपुरता नाही. संघाबाहेरील लोकांसाठीही आहे.
- हिंदूंचे अंतिम कल्याण या संघटनेनेच होणार आहे.
याच बौद्धिक वर्गाच्या अखेरीस डॉक्टरांनी एक भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते..' हा मार्ग आक्रमण करता करता एक सोन्याचा दिवस निश्चित उगवेल की, ज्यादिवशी संपूर्ण हिंदुस्थान संघमय झालेला दिसेल. मग हिंदू जातीकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणारी कोणतीही शक्ती उभ्या जगात राहणार नाही.'
याला म्हणतात दुर्दम्य आत्मविश्वास !!
आज डॉक्टरांनी मांडलेला विचार सार्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रभावी होताना दिसतोय. डॉक्टरांवरीलच एका पद्यात म्हंटले होते की करोत कितीही आज उपेक्षा।
अखेर सारे तुलाच स्मरतिल।।
डॉक्टर, आज संपूर्ण जग तुम्ही मांडलेल्या विचारापुढे नतमस्तक होताना दिसतयं.
मात्र ... आपल्यासमोर शेवटी मागणे एकच आहे....
'हो नं कभी पथ विचलित। दो आशिष प्यारा।
Comments
Post a Comment