आठ आण्यातलं लग्न
(महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला आज १२ जून रोजी वीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा).
साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात 'ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)
शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग 'आपण लग्न करूया' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला.
लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात 'शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त 'हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी लेक देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.
माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. 'भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणीन,' असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. 'हसवण्याचा माझा धंदा' या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझा अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.
पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.
आमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना "मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, "मग आत्ताच जाऊ या की!" म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.
रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.
हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न 'समारंभ' संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून 'कु. सुनीता ठाकूर' हिचे नाव 'सौ. सुनीता देशपांडे' करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.
एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!
-- सुनीता देशपांडे
Comments
Post a Comment