पोळ्या उरल्या तर आपण दुसऱ्या दिवशी तुकडे अर्थात कुस्करा..नाही ना कळले अजून..अहो..आपली फोडणीची पोळी हो ..ही करतोच ना आपण. पण अलीकडेच माझी मुलगी रात्रीच्या, एक पदर्धी जेवणात, खमंग फोडणी ची पोळी कर ग आई? असे राजरोस म्हणते..नक्कीच तिला आपल्या महान परंपरेचे इतके चविष्ट प्रतिनिधित्व करणारा हा पदार्थ या फर्स्ट फूड आणि हर तऱ्हेचे हॉटेलात मिळणारे शाकाहारी पदर्धात कुठेही (चवीलाही) सापडला नसणार याची मला खात्री आहे. मीही हौशी ने मग, भरपूर कांदा मिरची कोथिंबीर घालून हळूवार केलेले ताज्या पोळीचे तुकडे कढईत मंद आचेवर वाफ येई पर्यंत ठेवते. हो आणि घाईघाईने नको ह. तब्येतीत केले तर काय लाजवाब लागतो हा पदार्थ.
मानाच्या पानात कुणी बसायचं यासाठी सर्व पदार्थांची स्पर्धा कायम सुरु असते. फोडणीची पोळी मात्र या स्पर्धेपासून अलिप्तच आहे. पण हिला कढईत हलविताना मला पण अनाहुत अश्या रम्य बालपणी च्या आठवणी येतात..माझी आजी नावा प्रमाणेच
*अन्नपूर्णा*. उन्हाळयात आम्ही सर्व १२ नातवंडे सुट्टी घालवायला एकत्र येत असू. नागपूरचा उन्हाळा आणि त्यात दिवसही मोठा..नातवांना सकाळ चा घरघुती नाश्ता असे..कधी सातूचे पीठ - दूध गुळात कालवलेले तर कधी आवडी प्रमाणे तिखट तेल कांदा लोणचे पोहे घालून खमंग कोरडे सुद्धा, तर कधी तक्कू तेल पोळी, तर कधी फोडणी ची पोळी..असे आलटून पालटून..पण बहुतेक सर्व नाश्त्याचे प्रकार पोळी अर्थात गव्हा बोवतीच..आता विचार करते, तर येवढ्या जास्तीच्या पोळ्या आदल्यादिवशी च करून ठेवायच्या..म्हणजे किती कष्ट त्या माऊलीचे असायचे..आणि आम्ही आपले अनेक वेळा नाहकच त्या वर्ल्ड क्लास पदार्थाला ' तुकडे ' म्हणून उपेक्षित ठरवायचो.
खरेच फोडणीची पोळी हा पदार्थ रानातल्या एकाकी वाटेवर उमलणाऱ्या रानफुलांसारखा आहे, तरीही फार जिवाभावाचा..
लेखिका: सौ वंदना विलास वैद्य
Comments
Post a Comment