मऊभात, तूप, मेतकुट... स्टेप बाय स्टेप...
चित्पावनी न्याहारी....
एका रम्य, रिकामटेकड्या सकाळी पितळी पातेल्यात भरपूर पाणी खळखळून उकळले की त्यात धुतलेले तांदूळ वैरावेत. तांदुळ रटरटत (आवाजाशी अगदी साधर्म्य हवंच बरं का) बोटचेपं शित शिजलं की थोडावेळ झाकण ठेवावं, गॅस बंद करु नये ...
नंतर पुन्हा थोडं पाणी घालून भात गुरगुट्या होईल इतपत ढवळावा. मग चवीनुसार मीठ, मिरपुड आणि हिंग घालावे...
हा उपक्रम पार पाडल्यावर एक पोह्याचा पापड खरपूस भाजून/तळून घ्यावा. मग एका स्वच्छ केळीच्या पानावर आधी तो पापड ठेवून त्यावर हा भात ओतावा (हा ओतावाच लागेल बरं का) त्यानंतर भाताच्या गरम वाफांनी आसमंत जादुई होत असतानाच त्यावर थोडी कडेने व नंतर भरपूर (मधे किंचित विहीर करुन) घरगुती खमंग तुपाची धार सोडावी (I mean ती देखील ओतावी) नंतर अस्सल खमंग मेतकुटाची उत्तम नक्षी संबंध भातावर मनसोक्त काढावी....पोह्याचा पापड, मऊभात, हिंग, मिरपुड, साजूक तूप आणि मेतकुट यांचा एक amazing aroma संबंध घरात दरवळायला सुरुवात होईल....
...एव्हाना पोटातील वैश्वानर जागा व्हायला सुरुवात झालेली असते. रसना चहूबाजूंनी खवळलेली असते. बोटांची चाळवाचाळव सुरु होते आणि मग गरम चटके सहन करत, लिंबाच्या मनसोक्त मुरलेल्या लोणच्यासह एका अद्वितीय चवीने तुमच्या जीभेवरुन पोटाकडे प्रवास सुरु केलेला असतो....
वर वर्णन केलेली न्याहारी ही आजही अनेक कोकणस्थ चित्पावनी घरात सर्रास केली जाते. प्रोटीन, फॅट्स, कार्बोहाइड्रेट यांचं एकमेवाद्वितीय असं काॅम्बिनेशन या न्याहारीत आहे.
याची गंमत म्हणजे तुम्ही ही न्याहारी सकाळी ८ वाजता केली तरी तुम्ही दुपारी साडेबाराला जेवू शकता आणि दोन अडीच वाजेपर्यंत उशीर झाला तरी अॅसिडीटी किंवा पित्ताचा त्रास होत नाही हे नक्की. मंडळींनी या न्याहारीचा अवश्य अनुभव घ्यावा
Comments
Post a Comment