आज कांदेनवमी आहे रे ब्वाॅ. त्या निमित्त
*कथा नवमीच्या कांद्याची*
आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ. विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात ही कांदेनवमी होत असे. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असेल. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे.
आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ बर्याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मासात कांदा वगैरे पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधार्यांशी घातलेला वाद आठवला.
तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेला नसतो. वातविकार म्हणजे काय ? आणि हे विकार माणसाला काय "वात" आणतात हे जाणायला वयाची किमान चाळीशी तरी गाठावी लागते.
मग एखाद्या वेळी पालेभाजी, वांग्याची भाजी नीट न पचल्यामुळे पोटात वात धरतो, कूलरसमोर रात्रभर झोप घेतल्यानंतर हाताची बोटे आखडतात. आणि मग वातूळ पदार्थ का खाऊ नयेत ? याच आपणच उपदेशन करायला लागतो.
मग आता चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिक रित्याच कमजोर झालेली असते त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच. म्हणून मग चातुर्मासात कांदा लसूणादि वातूळ पदार्थ वर्ज्य. मग कांदेनवमीलाच घ्या सगळे हाणून.
पुन्हा मनात विकल्प आलाच की मग नवमीला का ? दशमीला का नाही ? व्रताचा आरंभ जर एकादशीपासून असेल तर मग मध्ये हे एक दिवसांचे बफ़र का ? मग हळूहळू आधुनिक विज्ञानानेच उत्तर दिले याचे कारण की मानवी पचनसंस्थेत आहे.
शाकाहारी पदार्थ पचवायला सर्वसाधारण माणसाला ८ तास आणि अगदी कायमचूर्णवाल्यांना ३६ तासांपर्यंत लागतात.
मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. कथा नवमीच्या कांद्याची.
-
🙏🙏
Author unknown.
चातुर्मास कसा पाळायचा~
श्रीमहाराजांनी केलेलं चातुर्मासाचं मार्गदर्शन श्रावण महिना आला की लोकं ठरवतात चातुर्मास पाळायचा. महाराज म्हणतात " माझ्या माणसांने चातुर्मास कसा पाळावा?
तर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा. तो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करावा.समजा,आपण खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं...
आपण कुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .! आई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी रागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून नको ! आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा जसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिले तर आपण म्हणतो नां?
या पदार्थात कांदा नाही नां? माझा चातुर्मास आहे! जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात
तसेच, जेव्हा जेव्हा रागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा आपल्या मनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे ! राग आपल्यासाठी वर्ज्य आहे ! आपल्याला रागवायचं नाही ! असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,मग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडण्याचा प्रयत्न करावा वर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा ! असा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसानं कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय सारखाच!.
.गोंदवलेकर महाराज
Comments
Post a Comment