आज '#आषाढी_एकादशी' आजच्या दिवसाचे धार्मिक महत्व महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.
या दिवसाच्या निमित्ताने आपण या दिवसाशी निगडित धार्मिक महत्व असलेल्या वृक्षांची माहिती करून घेऊ.
संतशिरोमणी ज्ञानदेवांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी आळंदीला संजीवनी समाधी घेतली. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांनी हातातला दंड [ काठी ] मातीमध्ये रोवला आणि ते समाधी विवरामध्ये गेले. त्या दंडाने मूळ धरले आणि त्याला पालवी फुटून कालांतराने त्याचा वृक्ष झाला. तोच हा #अजानवृक्ष ! संत नामदेव म्हणतात -
अजानवृक्ष आरोग्य अपार
समाधीसमोर स्थापियेला I
कोरडया काष्ठी फुटीयेला पाला
तेव्हा अवघीयाला नमस्कारी II
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेला अत्यंत पूज्य आणि पावन समजला जाणारा अजानवृक्ष जनमानसात आदराचे स्थान मिळवून बसलेला आहे. त्याला अनन्यसाधारण धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे. अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनवण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधनेसाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थानी असलेल्या अजानवृक्षाची फळे, पाने तोडण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्षछायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आपणास आढळतील. त्या काळात साधकाच्या या ज्ञानेश्वर पोथीवर पारायण काळात एखादे जरी पान पडले तरी ते भाग्याचे समजले जाते व त्या साधकाला सिद्धी साठी पुढचा मार्ग सक्रीय होतो अशी तेथील परंपरा आहे.
अजाणवृक्षाचं वनस्पतिशास्त्रीय नाव आहे Ehretia laevi( एहरेशिया लेव्हीस ) त्याचा समावेश भोकर कुळात केला जातो.
मराठीमध्ये अजाणवृक्षाला ' #दातरंग ' असंही म्हणतात. ह्या झाडाची साल चघळतात आणि त्यामुळे दात रंगतात- लाल होतात- म्हणून हे नाव !
फुलण्याचा हंगाम वसंत ऋतूमध्ये असतो. कोवळ्या, हिरव्या फांद्यांच्या टोकांना तसेच पानाच्या कक्षांमध्ये लहान लहान पांढरया शुभ्र फुलांचे छोटे छोटे तुरे येतात. फुले पाच ते दहा मिलिमीटर आकाराची, तरकाकृती असून त्यांना मंद सुवास असतो.
उन्हाळ्यात वाटाण्याएवढ्या, गोलसर, गुळ्गुळीत हिरव्या फळांचे घोस दिसू लागतात. पिकल्यावर फळे नारिंगी किंवा भगव्या रंगाची होतात आणि शेवटी वळल्यावर काळी आणि सुरकुतलेली दिसतात. प्रत्येक फळात एक ते चार सूक्ष्म बिया असतात. पिकलेल्या फळातील गर खान्याजोगा असतो, पक्षी प्राणी आवडीने खातात.
अजान वृक्षाचे फळ ते श्वानमुखी जाणं ! ते सेवन करता मनुज अजरामर होय निश्चित II हा वृक्ष फळ मुळासहित अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे.
पंढरपूरच्या वारीशी निगडित अजून एक वृक्ष आहे
तो म्हणजे #नांद्रुक देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता अर्थातच ज्यावेळी तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
या घटनेशी निगडित ओव्या आपल्याला किर्तनातूनही ऐकायला मिळतात.
देहूच्या माळावरी कुणी सांडीला माळ बुक्का
तुकाराम आलं खाली कशा हालती नांदरुका
पहाटेच्या प्रहरामध्ये कोण म्हणतो हरी हरी
तुकोबा महाराजाची स्वारी नांदुरकीच्या झाडाखाली
आळंदी माळावरी कुणी तिथ नांद्रुक लावली
आता बाळयाला माझ्या वारकर्याला सावली
नांदुरकीचे झाड हालत लखा लखा
बिजेला आला तुका
#कान्होपात्राचे झाड पूर्वी पंढरपूरला विठ्ठल मंदिरात होते. पाहताना झुडूप वजा वाटतं असले तरी हा जाड खोडाचा शातायुषी वेल आहे. वाघाटीचा वेल म्हणजेच कान्होपात्रेचं झाड. संत कान्होपात्रेचं जबरदस्तीने अपहरण करून नेत असताना तिने पांडुरंगाचे चरणी आपला देह ठेवला. तिथे एक तरटीचं झाड उगवलं तेच ते कान्होपात्रेचं झाड!
नको देवराया अंत असा पाहू हा संत कान्होपात्रेचा अभंग प्रसिद्ध आहे.
वाघाट्याच्या फळांची भाजी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी खातात. त्यामुळे पोटात गोविंद गोविंद असे होते असे जुन्या काळी वयस्कर लोकं सांगायची. म्हणून या फळाला #गोविंदफळ असेही नाव पडले असावे. भाजी जास्त प्रमाणात खाल्यास मळमळने,डोकेदुखी असे त्रास होतात. विदर्भात या फळाला वाघाटे म्हणतात, फळाची भाजी होते, फळात बिया फारच जास्त प्रमाणात असतात, फळातील बिया काढून फक्त टरफलाचीच ( वाघटयाची ) भाजी करतात, चण्याची डाळ घालून छान होते.
चिमण्या वाचवायच्या असतील तर गावागावात व शहरात हजारो तरटीची झाडं लावली पाहिजेत. अशा झुडपांवर चिमण्या आणि इतर छोट्या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असतो.
आषाढी एकादशी निमित्त अजून एक संतांच्या निसर्ग सेवेची माहिती आपण करून घेऊ.
सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच विठ्ठल आणि आपल्या कामातूच विठ्ठलभक्ती दाखवली. सावता महाराजांचा हा कर्मयोग म्हणजे पर्यावरणपूजा होती, खरे अर्थाने ईश्वरपूजा होती.त्यांनी खरे अर्थाने निसर्गात संतूलन ठेवणारी आदर्श शेती त्यांनी केली.
त्यांची शेती प्रमुख पाच भागात विभागलेली होती.
पहिला भाग: दैनंदिन जीवनात लागणाऱ्या, रोज उत्पन्न देणाऱ्या बाबी जसे की, भाजीपाला, फळभाज्या, गूराढोरांना हिरवा चारा, देवाला-सजावटीला फूले.
दूसरा भाग : वर्षाला लागणारे धनधान्य गहू-ज्वारी-तांदूळ-दाळी- साखर- गूळ- कापूस- तेलबिया ( आजच्या भाषेत कॅशक्राॅप्स).
तिसरा भाग : लाकडासाठी झाडे, जळावू लाकूड, फर्निचर - बांधकामासाठी लाकूड, जसे की लिंब, साग.
चौथा भाग: जंगलशेती यात प्रामुख्याने औषधी वनस्पती, संरक्षक काटेरी झाडे, वर्षाकाठी फळ उत्पन्न देणारी झाडे.
पाचवा भाग : अध्यात्मशेती जी महावृक्षांची लागवड. वड-पिंपळ-बेल-उंबर-करंज-पळस-लिंब-नांद्रुक-कवठ जी निसर्गात संतूलन ठेवणारी आदर्श शेती उत्पादने होत.
आणि हे सर्व करताना सावता महाराजांनी जलसंधारणालाही महत्व दिले माथ्याकडील भागात जलसाठा आणि पायथ्याकडे खात्रीचा जलस्रोत असलेली विहीर. दूधदूभत्यासाठी जनावरांचे पालन, गौ उत्पादनांची सोय आणि सततपणे आपला मळा आपली जमीन उपजाऊ सूपीक ठेवण्यासाठीचे धोरण.
त्यांनी शेती हि उत्पन्न मिळावे याकरिता कधीच केलेली नव्हती. आवश्यकतेपेक्षा जास्त त्यांनी कधीच मागितले नाही, जे स्वतःकडे शिल्लक ते उदारपणे ईतरांत वाटलेले. त्यांनी समृद्धीची व्याख्या धनधान्य -पैसाअडक्यात न करता निसर्गाची सेवा करताना मिळणाऱ्या आनंदात केली. आणि म्हणूनच ते सार्थ आयुष्य जगले.
अध्यात्म हे "मानव आणि पर्यावरण संबंधाचे विज्ञान" होय, हे सांगणारे संत सावता महाराज आधूनिक वैज्ञानिकांच्या दृष्टीनेही मार्गदर्शकच. वर्तमान पिढीने या पर्यावरण सुसंगत जीवनपद्धतीचा जरूर अभ्यास करावा आणि जमले तर आचरणातही आणावा.
संत सावता महाराजांचे विचार मानत असाल तर मग,
म्हणा
आपलं गाव हेच पंढरपूर
गावचा निसर्ग हाच पांडुरंग
गावची देवराई हिच रूक्मिनी
गावची नदी हिच चंद्रभागा
गाव जपणारी वडिलधारी हेच संत
वेळोवेळी श्रमदान हिच वारी
प्रदूषणमुक्त शिवार हिच भक्ती
निसर्गनियमांचे पालन हिच साधना
गावात शुद्धसात्विक सलोखा हाच पांडुरंगाचा प्रसाद
.... बोला "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय"
Comments
Post a Comment