श्रीराम
उद्या 'दीपअमावस्या', त्याबद्दल विशेष लेख प्रसारीत करीत आहे.
०९.०८.२०१८
*'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' अर्थात 'दीप अमावस्या*
उद्या आषाढ महिन्याची अमावस्या !!!
या अमावस्येलाच 'दिव्याची आवस' किंवा 'दीप अमावस्या' असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥"
भावार्थ:-
‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’
कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि यातूनच विविध कहाण्यांची निर्मिती झाली. कहाणीच्या पुस्तकात 'विविध सण' आणि 'व्रतवैकल्ये' यांच्या मनोहर कहाण्या दिलेल्या आहेत. त्या कहाण्या सांगण्याचा मुख्य हेतू श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि समाजाने नियम पाळावेत असा असावा. कारण तत्कालीन समजपद्धतीत 'धर्माने' अथवा 'शास्त्राने' सांगितले आहे असे मानून तसे आचरण करणारी मंडळी पुष्कळ होती.
भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतू संपतो. तसेच दुसऱ्या दिवशीपासून वर्षा ऋतूची सुरुवात होते. वर्षा ऋतू स्वाभाविकच जास्त पावसाचा. *पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळे प्रकाशासाठी दिव्यांची गरज होती. दिवा स्वच्छ असेल तर स्वाभाविक त्याचा जास्त प्रकाश पडणार. त्यानिमित्ताने घरातील सर्व दिव्यांची तपासणी (आपण त्यास आजच्या लौकिक भाषेत ऑडिट म्हणू शकतो) व्हायची. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की कंदील, टूकं (रॉकेल वर जळणार छोटा दिवा), बत्ती असे विविध प्रकारचे दिवे असायचे. त्या दिव्यांची खूप निगा राखावी लागत असे, अन्यथा ऐनवेळी ते दिवे पेटत नसतं. यासाठी उजळणी म्हणून घरातील सर्व दिवे उजळले जायचे. श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आणि तुफानी वादळाचे. त्यामुळे हवामान त्यामानाने थंड. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. घरात प्रकाश आणि पुरेशी ऊब मिळण्यासाठी दिव्यांची गरज असतेच. त्यामुळे दिव्यांची डागडुजी, स्वच्छता हा त्यामागील तांत्रिक भाग होता. आजच्या आधुनिक युगात संपूर्ण आषाढ महिना 'विद्युत सुरक्षा मास' म्हणून पाळावा असे सुचवावेसे वाटते. घरातील, कार्यालयातील सर्व वायरिंग , प्लग , सॉकेट, एर्थींग, बटन्स, सर्व विद्युत उपकरणे आदि या महित्यात तपासून घ्यावीत, दिवे पुसून घ्यावेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाचे दिवे, इनव्हर्टर, जनरेटर आदींची आवश्यक ती निगा राखावी. या सर्वांचे मूल्यमापन (तपासणी) दीपअमावस्येला करावी.( कारण अमावस्या ही सर्वात जास्त काळोखी असते). विशेष करून घरातील गॅस शेगडी तसेच गॅसचा पाईप यांचीही तपासणी करावी कारण *'स्वयंपाकघर सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित !!'* आजच्या भाषेत आपण त्यास 'विद्युत सुरक्षा दिन' म्हणू शकतो नव्हे तो होताच कारण हा 'दिन' संपूर्ण भारतात तितक्याच श्रद्धेने अनेक वर्षे पाळला जायचा आणि आजही पाळला जातो. *मधल्या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरलो आणि आपल्या बऱ्याचशा सणांचा भावार्थ बदलला, तसेच त्याचा यथोचित अर्थ समाजास समजून सांगण्याची व्यवस्था आपण समाज म्हणून प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो, खरंतर तसा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून 'वटपौर्णिमा', 'जागतिक विद्युत सुरक्षा दिन' म्हणून 'दीप अमावस्या', 'जागतिक कृतज्ञता दिन' म्हणून 'सर्वपित्री अमावस्या', जागतिक आरोग्य दिन म्हणून धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती), महर्षी नारद जयंतीला 'जागतिक पत्रकार दिन' असे बरेच 'दिन' आपण साजरे करु शकतो. कारण या सर्व गोष्टींचा उगम भारतात झालेला आहे. गरज आहे ती फक्त इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची!!*. आज आपण सर्वांनी प्रण करुया की आजपासून 'दीप अमावस्ये'च्या निमित्ताने घरातील 'विद्युत सुरक्षा' आवर्जून पाळली जाईल.
आपल्या मागील सर्व पीडा (अर्थात गैरसमजुती, कोती वृत्ती) जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. *पंच महाभूतांमधील अग्नि तत्वाची ही पूजा आहे. आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नी अन्नपचनाचे काम करतो. शरीरातील अग्नीतत्व मंद झाले तर पोट बिघडते. याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे.* या दिवशी घरातील सर्व पितळी दिवे, समया, निरांजने, तांब्याचे दिवे, लामणदिवे, कापूरवाती अश्या सर्वांची पूजा केली जाते. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचे, रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता घरातून निघुन जाते अशी श्रद्धा आहे. यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभंकरोति, परवचा म्हणायची पद्धत होती. दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना, या संधिकालात परमेश्वराचे नाव घेतले तर मनःस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असते, नाही का?
*पूर्वी मुलाला कुळदीपक किंवा वंशाचा दिवा असे संबोधले जायचे किंवा रागाच्या भरात 'किती दिवे लावलेस ते माहीत आहे' असेही बोलले जात असे. अर्थात या बोलण्यातील मर्म असे आहे की मुलगा मुलगी कोणीही असो, त्याने घराण्याचे नाव आपल्या शुद्ध आचरणाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल करावे. *'उजेडात होते पुण्य, अंधारात पाप'* असे एक गीत आहे. मनुष्याने नेहमी उजेडातील कर्म करावीत असे ही दीप अमावस्या आपल्याला सुचविते असे म्हटले तर वावगे होणार नाही.*
भारतातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या गुहांमध्ये सुंदर चित्रकारी, नक्षीकाम पाहावयास मिळते. हे काम दिव्याशिवाय करणे शक्य नव्हते. भारतामध्ये दिव्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. अग्नीचे प्राचीन काळापासून धर्मकर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. वेदांमध्ये अग्नीला देवतास्वरूप मानण्यात आले आहे. यामुळेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. दिवा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. *दीप लावण्यामागचे कारण म्हणजे, आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात ज्ञानाच्या प्रकाशासाठी पुरुषार्थ करावा*. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरवणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असते. तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. यामुळे प्रदूषण दूर होते. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने याचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. 'दीप प्रज्वलन' हा घराला प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे.
दिवा लावतानाचा मंत्र:-
*"दीपज्योति:परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।*
*दीपोहरतिमे पापंसंध्यादीपं नमोस्तुते।।"
दिवा लावण्याचे नियम: -
● दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.
● दिव्याची वात पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.
● दिव्याची वात उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.
● दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेकडे करू नये. यामुळे धन आणि जीवित हानी होऊ शकते.
दीप प्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात ?
अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्वाच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होत असते.
आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो. म्हणून यादिवशी काही लोकं अति प्रमाणात मांसाहार करतात. आज समाजात ही अमावस्या आज जरा 'वेगळ्या' कारणांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आज कोकणात तरी ती 'गटारी अमावस्या' म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. *सणांचे इतके विडंबन फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते आणि ते फक्त 'हिंदूच' करु शकतात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. धर्मांध असू नये याबाबत सर्वांचे एकमत होऊ शकेल पण धर्माभिमानीही असू नये हा दैवदुर्विलास नव्हे काय? आज आपल्या परंपरा, सण, व्रतवैकल्ये पुन्हा एकदा डोळसपणे समजून घेण्याची आणि समजून देण्याची नितांत गरज आहे अन्यथा पुढील पिढीला आपल्या विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची माहिती होणार नाही.*
उगवत्या सूर्याची पूजा करणारे आपण हिंदू लोकं आहोत. *आपल्या परंपरा, आचारविचार ह्या उजळवलेल्या दिव्यांच्या ज्योतीवर धरुन 'पारखून' घेऊ आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक घरात जर असे 'ज्ञानदीप' लावले गेले तर आपला देश नक्कीच उजळून निघेल आणि त्या प्रकाशाने साऱ्या जगाचे डोळे दिपतील यात शंका नाही.*
*"शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||"*
श्रीराम
संदीप रामचंद्र सुंकले
थळ,अलिबाग
८३८००१९६७६
सूचना:- हा लेख अनेकांपर्यंत जाईल असे पाहावे. आपला अभिप्राय अवश्य कळवावा.संदीप सुंकले आपल्या त्या गृपवर आहेत
Comments
Post a Comment