दीप अमावस्या
मकरंद करंदीकर यांची पोस्ट शेअर करतेय.
गटारी नव्हे दीप अमावस्या !
( हिंदूंच्या मंगलपूजेचे गटारीकरण नको )
येत्या सोमवारी २० जुलै रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर “ आम्हाला आमचे सण साजरे करू द्या “ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये. दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे " शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म का म्हणून बदनाम करायचा ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.
प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे.
**** आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. हल्ली मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण होते. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.
अमावास्येची दीपपूजा आणि निरांजनाची खास रचलेली आरती !
या दीप अमावास्येच्या दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत. घरात खूपच दिवे असतील तर नेहेमीच्या पूजेतील, कुटुंबात वंशपरंपरागत असलेले, असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत. शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते. पाटाखाली छोटीसी तरी रांगोळी काढावी. पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी. त्यांना हळदीकुंकू, फुले वाहून नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी दूधसाखर, दुधगूळ, लाह्या बत्तासे, पेढे, फळे असे काहीही चालते. उदबत्ती व निरांजन लावून ओवाळावे ( पूजा करावी ). दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी. जीवा - शिवाच्या एकरूपतेचे, अद्वैताचे प्रतीक म्हणून, जोडा सलामत राहावा म्हणून, अशी याची कारणे सांगितली जातात. परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण ( कॅपीलरी ऍक्शन ) योग्य प्रकारे होऊन, ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो.
दिव्यांचे तोंड / मुख म्हणजे त्याच्या वाती ! हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात ( पेटवितात ). कांही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी, साखरेचे ४ / ५ दाणे ठेवतात. या दिवशी अनेक जातीनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे. विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण, उकडीचे मोदक, उकडीचे दिवे, कणकेचे गोड दिवे, मुरड कानवले, दिंड पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात. अशा खास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवितात.
सायंकाळी सर्व दिवे उजळून ( पेटवून ) आरती करावी. आरतीच्या वेळी घरातील विजेचे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवा. बाहेर काळोख, पाऊस, थंड हवा आणि घरात उजळलेले दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे ( मुलगे आणि मुलीसुद्धा ) मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण केले जाते. या सर्व गोष्टी करतांना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही. देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते. तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढीत नाही. त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा, दडपणाने, भीतीने करू नये.
प्रत्येक पूजेमध्ये देवाला, आरती करतांना आपण निरांजनाने ओवाळतो. पण येथे एक वैशिष्ठय असे की खुद्द निरांजनाचीच आरतीही रचलेली आहे. ( खाली ही आरती देत आहे ). तसेच पूजा किंवा व्रतानंतर सांगितल्या जाणाऱ्या ' कहाण्या ' हा मराठी वाङ्मयाचा एक आगळावेगळा प्रकार म्हटला पाहिजे. त्या त्या पूजेला साजेल अशी, त्या व्रताचे महत्व सांगणारी अशी एखादी गोष्ट, अत्यंत बाळबोधपणे या कहाणीमध्ये सांगितलेली असते. जर एखादी स्त्री लिहिता वाचता येणारी असेल तर ती अशी कहाणी वाचून दाखवीत असे. अनेक स्त्रियांना ती कहाणी तोंडपाठ असल्याने, त्यांच्या मधील एखादी स्त्री ती कहाणी सांगत असे. ही कहाणीही खाली देत आहे. आपल्याकडे दिव्यांच्या संबंधी खूप चांगले श्लोक आहेत, त्यापैकी एक श्लोक खाली देत आहे.
दीपज्योति: परब्रह्म दिपज्योतिर्जनार्दन: । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोस्तु ते ।।
माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया ! या मांगल्याचा प्रचार करूया !!
ज्यांना जमेल त्यांनी, एखाद्या दिव्यासोबत आपले स्वचित्र ( selfie ) काढून ते एकमेकांना पाठवावे, शुभेच्छा द्याव्यात.
माझ्या संग्रहामधील काही सुंदर दिव्यांचे दर्शन सोबतच्या छायाचित्रात, खास आपल्यासाठी !
सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !
( हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )
( हा लेख आणि फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत ).
***** मकरंद करंदीकर.
वरील लेखाचा येवढाच भाग उपलब्ध आहे, पुढील भाग वेगळ्या लेखणीतून दिलेला आहे :-
*🪔 कशी साजरी करावी दीप अमावस्या🪔*
*आषाढ अमावस्या म्हणजेच "दिव्यांची अमावस्या".*
*काय करावे....*
*🪔 घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.*
*🪔 पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.*
*🪔 आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते.*
*🪔 आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी.*
*🪔 गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.*
*🪔 आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.*
*🪔 दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.*
*🪔 या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात.*
*🪔 त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते.*
*🪔 पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.*
*🪔 ती प्रार्थना अशी 🪔 *
*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*
*अर्थ:*
_‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस._
*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.*
*🪔 त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.*
*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.*
_तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले._
_मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा *दीप अमावास्येसाठी* सांगितली आहे._
✍️. *श्री.संतोषभाऊ*🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Comments
Post a Comment