१. ।।आठवणीतील कविता ।।
दहा दिवस दहा कविता
3 जुलै 2020
नमस्कार! मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज माझ्या आठवणीतील आवडती कविता सादर करीत आहे.मला या उपक्रमात माझी मैत्रीण वर्षा विजय देशपांडे हिने आमंत्रित केले आहे आणि मी माझी मैत्रीण अनघा नासेरी हिला या उपक्रमात सहभागी करतेय. या उपक्रमातील माझी ही पहिलीच कविता आहे
आजची माझी पहिली कविता म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे .
आकाशातले काळे दाट मेघ आषाढ महिन्याची नांदी देतात आणि चंद्रभागेच्या काठावर विठ्ठलभक्त जमू लागतात. गोपीचंदनाची उटी आणि तुळशीच्या माळांचा साज चढवलेले हे वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करताना टाळ-मृदंगाच्या तालावर देहभान विसरतात. राग-लोभ, मोह-माया यांच्या पलिकडे जाऊन केवळ भक्ती हाच भाव प्रत्येकाच्या मनात उरतो. रंग-रूप, जात-पात, लहान-थोर, उच-नीच कसलाही भेदच उरत नाही. सारा आसमंत विठोबामय होतो. निर्मळ भक्तीची ही पायवाट हा भवसागरातून आपल्याला तारून नेईल असा विश्वास तुकोबा प्रत्येकाच्या मनात जागवतात.
यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. पण हे चित्र प्रत्येक विठ्ठलभक्ताने मनात जगलं असणार. त्या विठ्ठल माऊली च्या पायाशी मनःपूर्वक डोकं टेकवून आज या काव्याच्या वारीत पाऊल ठेवते आहे.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ।।
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ।।
वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ।।
होतो जयजयकार गर्जत अंबर
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ।।
-संत तुकाराम
२. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 4 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील दुसरे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आज मी या श्रुंखलेत आणखी एक कडी जोडतेय. माझी मैत्रीण सौ. जयश्री संगीतराव हिला आमंत्रित करतेय.
अर्थात आजची माझी दुसरी कविता ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मभूषण वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपले कविवर्य कुसुमाग्रज यांची आहे .
सूर्य अस्ताला जाताना त्याची लाल-केशरी किरणं विविध आकाराच्या ढगांमधून डोकावताहेत जणू मेघांचे पळस, क्षितिजावरती लाल माणकांची माळ, या नभाच्या लालीचं प्रतिबिंबानं सागरात केशर-पाणी आणलंय. हे निसर्गचित्र बघताना बालकवींची आठवण सहज होणारच. हे सगळं अनुभवणाऱ्या तो उदास होतो, त्याला त्याच्या प्रियतमेची आठवण येते अन् श्रावणातला आठवणींचा ऊन-पाऊस तो अनुभवतो. कुसुमाग्रज यांनी या कवितेतून प्रियेच्या विरहात व्याकुळ झालेल्या मेघांच्या सोबत प्रियतमेला संदेश पाठविणाऱ्या यक्षाचं चित्र रंगवलं असलं तरी या पावसात सखीची आठवण मनात जागवणाऱ्या प्रत्येक प्रियकराचं हे वर्णन आहे ना?
पळस : कुसुमाग्रज
मेघांच्या पळसाचा
अस्तावर जाळ
अस्ताच्या कंठात
माणकांची माळ
माणकांच्या माळेला
केशराचे पाणी
केशराच्या पाण्यात
बालकवींची गाणी
बालकवींच्या गाण्यात
एक उदास पक्षी
पक्षांच्या पंखांवर
श्रावणाची नक्षी
श्रावणाच्या नक्षीत
देवळाचे कळस
कळसावर पुन्हा
मेघांचे पळस
३. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 5 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील तिसरे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे.अर्थात आजची माझी कविता 'रांगोळी घालतांना पाहून' ही केशवसुतांची मला आवडणारी कविता.
मी शाळेत असताना शाळेत कवितांची अंताक्षरी स्पर्धा असायची. मी शाळेच्या चमूत होते. तेव्हा पाठ केलेली ही कविता माझ्या मनात दडली होती. पण पूर्ण आठवत नसली तरी हे महत्वाचं की तेव्हा रांगोळी घालण्याची एक लहानशी गोष्ट कविता लिहिण्याएवढी मोठी कशी काय असं वाटलं होतं. पण मोठं झाल्यावर आता या कवितेतील साधेपणातलं सौंदर्य जाणवलं आणि मनापासून पटलं की -
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परि होती पहा आंधळे.
घराच्या स्वच्छतेची सुरवात अंगणापासून करणारी, घरावर प्रेम करणारी ती गृहिणी डोळ्यासमोर उभी रहाते. अंगण स्वच्छ करून ती सडा शिंपते आणि मग दारासमोर रांगोळी घालते. या रांगोळीतून साऱ्या आसमंताची आठवण जपते - नभाचे वसुंधरेची नातं जोडते, वृक्षवल्लींना गोंजारते, देवऋषींना नमन करते, सारी शुभचिन्हे रेखते आणि साऱ्या शुभ-मंगल गोष्टींचं स्मरण करते. दारातील ही शुभचिन्हांची रांगोळी लांघून आता घरात कोणतंही संकट येणार नाही याची तिला खात्री आहे.
मनाशी ओव्या गुणगुणत मनःपूर्वक साऱ्या चराचराचं स्मरण करत ती रांगोळी रेखणारी स्वतःची कलात्मकता जपणारी गृहिणी मला या कवितेतून भेटली. रांगोळी रेखून उभी राहून क्षणभर त्याच्याकडे बघून समाधानाचं स्मित चेहऱ्यावर आलं असणार. आता आपल्या घरातील प्रेमाच्या गोतावळ्यात रमण्यासाठी ती पाठ वळवून घरात शिरते…
- - -
मित्र-मैत्रिणींनो,
आज मी या पोस्टसोबत मी रेखलेली एक रांगोळी पण तुमच्या सोबत शेअर करतेय...
- - -
रांगोळी घालतांना पाहून
- कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"
"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
४. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 6 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील चवथे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आजची माझी कविता कविवर्य बा. भ. बोरकरांची 'विचित्र वीणा' मला आवडलेली कविता.
तिन्हीसांजेची वेळ झुक-झुक करत आगगाडी चालली आहे. गाडीच्या खिडकीतून दिसणारं दृष्य सतत बदलतं आहे. निळ्या पाण्यातून काळे ढग, दुधाळ कणसाचे तुरे, घराच्या भिंतीवर वाऱ्याच्या झुळूकीसवे म्हातारीच्या केसांसारखे मऊ शुभ्र गवताचे आनंदाने डोलणारे तुरे दिसताहेत. नभमंडलाकडे आकर्षित होऊन विजेच्या तारांवर अडकलेला नागफणी सारखा पतंग अस्ताला निघालेल्या सूर्याची चमचमती कवचकुंडले आणण्यासाठी निघालाय असं वाटतं. उंचशा पठारावर सुस्त म्हशी थबकलेल्या आणि टेकडीच्या टोकाशी पाळणाऱ्या बकऱ्या अन् एखादं स्वच्छ तुकतुकीत अंगाचं त्याच्या आईला लुचणारं कोकरू, अंगावर विविधरंगी टिकल्या लेवून भिरभिरणारे फुलपाखरं, आकाशातून उडणार्या बगळ्यांच्या थव्यांचे पाण्यातून प्रतिबिंब… गाडी बोगद्यात शिरते आणि बाहेर पडल्यावर रात्र झालीय. बाहेर जरी काही दिसत नसलं तरी मनात हे चित्र वीणा वाजवतंय…
आगगाडीतून दिसणारे निसर्गचित्रं बोरकरांची ही कविता डोळ्यासमोर उभं करते. आज कामाशिवाय बाहेर पडायला, प्रवास करायला मनाई आहे तर बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद आज बोरकरांच्या या अप्रतिम शब्दचित्रातून घेऊ या.
-----
विचित्र वीणा - बा. भ. बोरकर
निळ्या जळावर कमान काळी, कुठे दुधावर आली शेते,
थंडाव्याच्या कारंजिशी कुठे गर्द बांबूंची बेटे.
जिकडे तिकडे गवत बागडे, कुठे भिंतिच्या चढे कडेवर,
ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होउन अनावर.
तारांमधला पतंग कोठे, भुलून गेला गगनमंडला,
फणा डोलवत झोंबू पाहे अस्त - रवीच्या कवचकुंडले.
उंचवट्यावर म्हशी गोठल्या, तसेच कोठे कातळ काळे,
वर्ख तृप्तीचा पानोपानी बघुन झाले ओले ओले.
कोठे तुटल्या लाल कड्यावर, चपळ धीट बकरीची पोरे,
एक त्यातले लुचे आईला सटीन कांती गोरे गोरे.
फुलपाखरी फूल थव्यावर, कुठे सांडली कुंकुमटिंबे,
आरस्पानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे.
कुठे आवळीवरी कावळा, मावळतीचा शकुन सांगे,
पूर्वेला राउळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे.
घाटामध्ये शिरली गाडी, अन रात्रीचा पडला पडदा,
पण चित्रांची विचित्र वीणा अजुनी करते दिडदा दिडदा …
- बा. भ. बोरकर.
५. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 7 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील पाचवे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आजची माझी कविता ही कवयित्री पद्मा गोळे यांची 'आठवणी' ही आवडणारी कविता आहे.
बगिचात फुलं तोडायला गेले अन् सासुबाईंची आठवण झाली. त्या रोज बगिचात जायच्या, देवासाठी फुलं तोडायच्या आणि बागेतून घरात शिरताना एक सुगंधी फुल त्यांच्या छोट्याशा पुरचुंडीसारख्या जुड्यात खोचलेलं असायचं. सासुबाईंची आठवण सोबत त्यांच्या हातचा ओल्या अंजिराचा मुरांबा घेऊन आली आणि मग तर त्या मुरांब्यासारख्या मुरलेल्या मधुर आठवणींची माळच तयार झाली...
आयुष्यात किती आठवणी जमवतो आपण या मनात - कडू-गोड, खारट-तुरट, आंबट-चिंबट, सगळ्या चवी त्यात असतात. कामात असलं की त्या क्वचितच भेट देतात, पण शांत मनात एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी,... सोडा वाॅटर ची बाटली उघडल्याबरोबर फसफस सोडा बाहेर येतो तसंच या आठवणींचं असतं. आठवणींच्या कपाटाचं दार किलकिलं केलं तरी त्या लगबगीनं बाहेर पडतात आणि कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यात पाणी आणतात. कधी स्वतःवर तर कधी कोणावरच राग मनात जागतो, तर कधी चूक निर्णय घेतल्याची हतबलता मनात घर करते. इंद्रधनूच्या रंगांसारखे सगळ्या भावनांचे कढ परत जगतो आपण त्यांच्यासोबत.
पद्मा गोळे म्हणतात की अशा आठवणी जेव्हा मनात गर्दी करतात तेव्हा त्यांना मनात येऊ द्यावं, पण त्यांच्यात गुंतून पडू नये, त्यांना कुरवाळत थोपटत परत अंतर्मनात दडवावं, कधीतरी पुन्हा बाहेर काढण्यासाठी आज परत लपवावं…
- - - - - - -
आठवणी
मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच…
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे —
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे —
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे —
पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी — सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
— पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी
– पद्मा गोळे
६. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 8 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील सहावे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आज कविवर्य वसंत बापट यांची 'जिना' ही आवडणारी कविता मी सादर करते आहे. कविता तुम्ही वाचलेली असेल तरी पुनःप्रत्ययाचा आनंद मनात गोडीगुलाबी भाव परत जागवेल.
मित्र-मैत्रिणींनो,
आज आपल्या घरातला जिना आठवून बघा. त्या जिन्यावर हळूहळू पायऱ्या चढायला शिकलो आपण. मग दाणदाण उड्या मारत तर नंतर एकेक पायरी सोडून चढायला लागलो. मग त्या जिन्यावर लपाछपी खेळलो. पण या जिन्याचा, या लपण्याच्या जागांचा खरा उपयोग तरुणपणी कसा होतो याचं अतिशय लडिवाळ चित्र वसंत बापट यांनी या कवितेतून डोळ्यासमोर उभं केलंय.
कोवळ्या वयातल्या प्रेमाला प्रतिसाद मिळाल्यावरची एकमेकांची अधिर ओढ, तरुणपणीची जिवलगाची प्रणयातुरता, मिलनातली मधुर उत्कटता सारं काही त्या किंचितशा अंधारलेल्या वळणाच्या जिन्यात घडतं आणि तो जिना हा खरोखरीचा ईमानदार मित्र याची कुठेही वाच्यता करत नाही. जिन्याच्या वळणांवरचे प्रेमिकांच्या लोभस प्रणयाचे इतके उघड, तरीही उच्छृंखल न झालेले उत्कट वर्णन वसंत बापट यांची ही कविता करते. शेवटी ते म्हणतात की इहलोक सोडून जाताना त्या स्वर्गाच्या जिन्यालाही असंच एक वळण असावं अन् तिथून मागे वळून इथले गुलाबी, मधुर, सुखद आठवणींचे क्षण बघत प्रसन्न मनाने पुढच्या प्रवासाला निघावे. मला वाटतं की बहुतेक होत असावं असं काहीसं!
प्रत्येकाच्या घरात-मनात अशी एकतरी मधुर लडिवाळ आठवण असणार. आज ही कविता वाचताना आपल्या घरातली ती अशीच एखादी जागा, मनातली प्रौढत्वाच्या ओझ्याखाली लपवलेली ती गुलाबी आठवण परत जागी करा.
शुभेच्छा… 😊
जिना - वसंत बापट
कळले आता घराघरातुन;
नागमोडीचा जिना कशाला,
एक लाडके नाव ठेऊनी;
हळूच जवळी ओढायाला.
जिना असावा अरूंद थोडा;
चढण असावी अंमळ अवघड,
कळूनही नच जिथे कळावी;
अंधारातील अधीर धडधड.
मूक असाव्या सर्व पाय-या;
कठडाही सोशिक असावा,
अंगलगीच्या आधारास्तव;
चुकून कोठे पाय फसावा.
वळणावरती बळजोरीची;
वसुली अपुली द्यावी घ्यावी,
मात्र छतातच सोय पाहूनी;
चुकचुकणारी पाल असावी.
जिना असावा असाच अंधा;
कधी न कळावी त्याला चोरी,
जिना असावा मित्र इमानी;
कधी न करावी चहाडखोरी.
मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही;
सोपानाला वळण असावे,
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...
७. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 9 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील सातवे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आज कविवर्य चिं.त्र्य. खानोलकर म्हणजे 'आरती प्रभू' यांची 'गेले द्यायचे राहून' ही आवडणारी कविता मी सादर करते आहे. कविता तुम्ही वाचलेली असेल तरी पुनःप्रत्यय अजूनही वेळ गेली नाही हे जाणवून देईल अशी आशा.
-----
आईने आवडीचा पदार्थ बनवला आणि तो समोर पानात आला की इतका आनंद व्हायचा की मी लगेच आईला दाद द्यायची. बगिचात नुकतंच लावलेल्या रोपाला नवं पान फुटलं की आजीला धावत बगिचात न्यायचं अन् ते दाखवायचं. त्यानं काढलेलं चित्र मनासारखं जमलं की माझा नातू माझी हनुवटी धरून कामात गुंतलेली मान त्याच्या चित्राकडे वळवतो. पण वय वाढतं तसतसं हे निर्व्याज, उत्स्फूर्त प्रतिसाद देणं का बरं विसरतो आपण? परवा 'मुन्नाभाई' बघताना आणखी प्रकर्षाने जाणवलं की हे उत्स्फूर्तपणे दिलेले स्वाभाविक प्रतिसाद माणसाला किती सुखावतात. कष्टकऱ्याला मारलेली गळामिठी, वृद्धाशी खेळलेला कॅरम त्याच्या जाणिवांपर्यंत पोचून त्याला काम करण्याची, जगण्याची नवी उमेद आणि मुन्नाभाईला समाधान देतात.
वय वाढतं तसे असं सहज स्वाभाविक वागताना, हे बरं दिसत नाही असं वाटून, अवघडलेपण येतं आणि आपण विसरू लागतो. व्यावहारिक, व्यावसायिक पातळीवर विचार करण्याची सवय या अशा सहज वागण्यातला आनंद न मिळू देता, वागण्यात औपचारिकता आणते. हळूहळू संवेदना बोथट होतात.
बरेचदा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी पण आज वेळ नाही, परत पुढे करू असं करत काही गोष्टी कालौघात राहून जातात. पण कधीतरी या जाणिवा परत जागतात. आरती प्रभू यांची ही कविता मनात असेच भाव जागवते. कोणाला भरभरून आनंद देणं, खळखळून हसवणं, कोणासाठी काही प्रेमानं करणं, मनापासून एखाद्याच्या संवेदना जपणं, मदत करणं, समाधान देणं या साऱ्या गोष्टी म्हणजे 'नक्षत्रांचे देणं' असतं. ते तसंच उत्स्फूर्तपणे द्यायला हवं. किती कमी क्षणांचं हे आयुष्य. जगण्याच्या रहाटगाडग्यात आता हातातील कळ्यांचे निर्माल्य अन् ओल्या रसरशीत पानांचा पाचोळा होतो आणि मनात इच्छा असूनही देण्यासाठी काही उरतच नाही.
"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे,
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने.
आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त,
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त.
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला,
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा"
हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी या कवितेचे सोने केलेय.
८. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 10 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील आठवे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. आज गीतकार 'योगेश' यांचे 'की बार यूँही देखा है' ही आवडणारे गीत नाही तर कविता मी सादर करते आहे.
--------
माणसाचा मन कसं असतं ना? बागेत सुरेख फुल दिसलं की ते आपल्या डोक्यात माळण्याची इच्छा होते. फुल तोडण्यासाठी मनाई आहे हे माहीत असतं तरीही त्या फुलाची आस वाटते. पेपरमध्ये मेरीट आलेल्या मुलामुलींचे फोटो बघून आपलाही फोटो तिथे छापला जावा असं वाटायचं. लहानपणापासून ते वय कितीही वाढलं तरीही कधी कोणाच्या आयुष्यात घडलेली एखादी घटना आपल्याला इतकी आकर्षित करते की ती आपल्याही आयुष्यात घडावी असं वाटतं. माहीत असतं की असं घडणं अशक्य आहे तरीही ही आस मनाला स्वप्न दाखवते. माहीत आहे की आता हे होणं नाही तरीही कुणाशीही संवाद साधताना आता अरविंद असते तर अशी गमतीची काॅमेंट केली असती, गोड पदार्थ केला की ते असायला हवे होते, नातवासोबत खेळताना मी अन् मुली बाबा असते तर असं बोलले असते असं म्हणतो आणि त्यांच्या असण्याची आस मनात जागते. असं होणं शक्य नाही हे माहीत असूनही हे मन ती अशक्य गोष्ट झाली तर… असा विचार केल्यावाचून रहात नाही.
माझी सखी अनघा म्हणते,
ठाऊक आहे, ठाऊक आहे
आपण फुलपाखरू नसतो
तरीसुद्धा आपण फुलांवर
कसे भिरभिरत असतो.
पण गीतकार योगेश यांचं हे गाणं त्या पल्याड जातं. ते म्हणतात की मनाच्या विचारांचीही एक सीमारेषा असते. माझं मन सीमारेषा ओलांडतं आणि माझ्या मनही जाणत नव्हतं की मला या गोष्टी हव्या आहेत, मी अशा काही गोष्टींसाठी आसुसला, तहानलेला आहे, अशा गोष्टींची / माणसांची / घटनांची मला आस लागते.
मनाच्या सीमारेषे पलिकडे मनालाही अज्ञात असलेलं मन आणि ते जोपासतं माझ्या मनालाही ठाऊक नसलेल्या जाणिवा. योगेश यांच्या गीतात लपलेली ही कविता आणि त्यातले भाव मला खूप आपले वाटले. त्या कुठेतरी मनाच्या तळागाळातील गाभाऱ्यात लपलेल्या जाणिवा ज्या माझं मन जाणत नाही, त्या माझ्या मनाशी मी जपलेली सीमारेषा ओलांडून मनात जागतात. अशा प्रत्यक्षात नसलेल्या जाणिवा प्रत्यक्षात उतराव्या म्हणून माणूस भुकेला असतो ना?
Movie: रजनीगंधा (1974)
Music : सलिल चौधरी
Lyrics: योगेश
Performed : मुकेश
कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अनजानी प्यास के पीछे
अनजानी आस के पीछे
मन दौड़ने लगता है
राहों में, राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल, फूल मुस्कुरा के
कौन सा फूल चुरा के
रखूँ लूँ मन में सज़ा के
कई बार यूँ भी...
जानूँ ना, जानूँ ना, उलझन ये जानूँ ना
सुलझाऊँ कैसे कुछ समझ ना पाऊँ
किसको मीत बनाऊँ
किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूँ भी...
९. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 11 जुलै 2020
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
आज मी कवितेच्या मालेतील नववे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे. माणूस आणि निसर्ग यांचं नातं जोडणारी कवयित्री शांता शेळके यांची ही कविता आज सादर करतेय. तुकाराम महाराज म्हणाले की ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें...’ झाडांचे आणि आपले जन्मापासून नाते असते. तेच जन्म-जन्मांतरीचं नातं शांताबाई पण अधोरेखित करतात.
झाड बहरतं - त्याला नवीन पानं-फुलं येतात आणि ते वात्सल्यप्रेमानं मोहरतं. झाडाचं आणि माणसाचं समांतर आयुष्य असतं. रोपट्याचा वृक्ष होतो, फुल-पानं अंगावर सजवतो, लगडलेल्या फळांचं लाघव अनुभवतो, अंगावर पाखरांची घरटी सांभाळताना त्यांच्या किलबिलाटानं सुखावतो अन् संपूर्ण आयुष्य असं भरभरून जगल्यानंतर निष्पर्ण होऊन शेवटी मातीत सामावतो. बालपण, तारुण्य बहरतं, वार्धक्य - या साऱ्या अवस्था झाडंही माणसासारखं जगतं. परत बी मातीत रूजते आणि झाड नव्याने जन्म घेतं.
म्हणून शांताबाई म्हणतात की झाडाचं आणि माझं समांतर आयुष्य आहे. एकच वाऱ्याची झुळूक झाडासवेच मलाही गोंजारते. त्याच्या पानावरच्या भाग्य रेषा माझ्याही हातावर आहेत. त्याच्या जाणिवा मी पण जगते.
झाड
शांता शेळके
हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वा-याची एक झुळुक
दोघांवरून जाते
मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधून उमटणारे
जाणीव ओले भास
पहिल्यानेच याची मोहरताना फांदी
ठेवली होती बाळगाणी
याच्या कटिखांदी
मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती
याच्या पानावरच्या रेषा
माझ्या तळहाती
ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड
माझ्या रक्ताच्याही पैल
कधी तरी एके दिवशी मीच झाड होईन
पानांमधून ओळखीचे
जुने गाणे गाईन.
१०. आठवणीतील कविता
दहा दिवस दहा कविता
आज 13 जुलै 2020.
मी वृंदा अरविंद जोगळेकर.
काल माझं 'काव्यबिंब' सादर करायचं असल्याने काल मी आठवणीतील कविता सादर केली नव्हती.
आज मी कवितेच्या मालेतील दहावे म्हणजे शेवटचे पुष्प आपल्यासमोर सादर करीत आहे.
कुणालच्या आजीबरोबर गप्पा सुरू -
"आजी, पाऊस आला की काय गं करायचं? पाण्यात होड्या सोडायच्या का?"
"हो, सोडू या की! पण आधी ना आपण बिया पेरू या. मग काय होईल?"
"मग बघू या की काय मजा येते ते!"
त्यामुळे कुणाल पावसाची वाट बघत होता आणि ढगांचा गडगडाट, वीजेचा लखलखाट करीत पावसाच्या सरी कोसळल्या. सारा आसमंत प्रफुल्लित झाला. आजीसोबत कुणालने पाण्यात होड्या सोडल्या. "बिया पेरायच्या आहेत ना!" कुणाल ते विसरला नव्हता. मग आजीनं घरातून धणे आणले आणि थोडी जमीन उकरून सारखी केली. मग कुणालच्या हाताने तिथे थोड्या-थोड्या अंतरावर तिथे धणे पेरले. चिखलानं भरलेले पाय, माती भरले हात, कपाळावर पण थोडी मातीचे हात लागलेले पण डोळ्यात कित्ती मस्त काम केल्याचा आनंद लेवून कुणाल खूप लोभस दिसत होता. त्यानंतरचे चार दिवस केवळ त्या वाफ्याकडे बघताना तो थकत नव्हता. सतत आजी आता काय होणार हा प्रश्न दिवसाला पन्नास वेळा विचारून त्याने आजीला भंडावून सोडलं. आज तो बाहेर गेला आणि तिथूनच आजीच्या नावाचा घोशा सुरु केला. बीमधून आज एक कोंब फुटला होता. कुणालनं विस्फारलेल्या डोळ्यांनी हा आनंदाचा थरार अनुभवला. बीमधून उगवणारे हे नवीन रोप सृजनोत्सवाची नांदी होती. बी पेरणं, रोप उगवून त्याचं झाड होणं, ते फळाफुलांनी बहरणं या सगळ्यात तो गुंग झाला. असेच काहीसे भाव निसर्गाशी नातं जोडणारी कवी नलेश पाटील यांची ही मुक्तछंदात ही कविता घेऊन येते.
निष्पर्ण वृक्षालाच
नलेश पाटील
निष्पर्ण वृक्षालाच आपले घरटे समजून
एक भटके पाखरू त्यात अंडे घालून निघून गेले.
चारा भरल्या चोचीने व वारा भरल्या पंखाने ते परत आले.
तेव्हा त्यास अंडय़ाच्या जागी एक चिमणे पान दिसले.
आनंदाने बेहोष झालेले ते इवलेसे पाखरू
क्षणाचाही विलंब न लावता,
झाडाच्या प्रत्येक फांदीवर अंडी घालत सुटले.
पाहता पाहता झाडाचे घरटे हिरव्या
चिवचिवाटात बुडून गेले!
आता निष्पर्ण झालो, आता काही नवं, चैतन्यमय होणं शक्य नाही असं नसतं. नवीन काही करायची आस, नवीन कल्पनेचं बीज, नवा प्रयत्न आणि त्यासाठी कृती करणं कधी थांबवायचं नसतं. आनंद, उत्साह, चैतन्य आपल्या मनात जागवायचं. त्याचा वसा आपोआपच पुढच्या पिढीलाही मिळेल.
म्हणून एक शेल सिल्व्हरस्टीन ची कविता आठवतेय. असं करायला हवं होतं, तसं का नाही केलं या सगळ्या शंका-कुशंका काढणारे शब्द एका छोट्याश्या 'केलं' या शब्दामागे लपले.
All The Woulda-Coulda-Shouldas
Layin’ In The Sun,
Talkin’ ‘Bout The Things
They Woulda-Coulda-Shoulda Done…
But All Those Woulda-Coulda-Shouldas
All Ran Away And Hid
From One Little Did.
आपण 'केल्याने होत आहे रे' आणि 'होऊ शकतं' याची नवीन पिढीत पेरणी करून या सृजनोत्सवाचे स्वागत करू या…
माझ्या या आठवणीतील कवितांनी मला समृद्ध केलं. परत त्या वाचताना अनुभवाचे नवीन पदर उघडले आणि या सृजनोत्सवाचे तुम्ही सगळ्यांनी स्वागत केले.
मनःपूर्वक धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो.
Comments
Post a Comment