माझे माहेर डोंबिवली.
किती मस्त लिहिलंय....👌👌👌
माझ्या आठवणीतील डोंबिवली
डोंबिवली एक निद्रिस्त खेडं होतं. येथे रेल्वे येताच गाव होण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या काळात दोनच प्लॅटफॉर्म होते. असं सांगतात कि ते आजच्या सारखे उंच नव्हते. जमिनीवरच उतरावे लागे. तेव्हा वस्ती ही फार नव्हती तर गर्दी कुठून येणार? येथल्या भूमिपुत्रांची संख्याही कमी. तेव्हा तरी त्यांना ट्रेनची गरज भासत नव्हती. रेल्वे येताच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने वसाहतीसाठी जागा दिली. तीच आज अवशेष स्वरुपात असलेले बारा बंगले आणि बावनचाळी. एके काळी विजेच्या चमचमाट्यानं चमकत होती. इंग्रजांनी ह्या गावाला डिमॉली असं नाव दिल. पुढे डिमॉलीच डोंबिवली झालं.
एक महत्वाची आठवण म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पलीकडे म्हणजे डोंबिवलीच्या पश्चिमेकडे एक तळं होतं. त्यात घन:श्याम गुप्ते यांची एक होडी असायची. हे गुप्ते पुढे डोंबिवलीचे सरपंच झाले. ह्या गुप्त्यांनीच दिल्लीपर्यंत स.गो. बर्वे यांची मदत घेऊन बदलापूरहून नळाचं पाणी आणलं.
डोंबिवली त्याकाळात किती निवांत होती हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकरांनी एके ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा ते काही काळ सरखोत चाळीत रहात होते. पहाटे निघून ते संध्याकळी सातपर्यंत कॉलेजला पोहोचायचे. भातशेतीतून रस्ता काढत हातात रॉकेलचा कंदील घेऊन स्टेशनला यायचे. गाडी आली की कंदिलाची वात लहान करून विझवत व तेथेच ठेऊन गाडीत चढत व संध्याकाळी तो घरी घेऊन येत. तोपर्यंत कधीच कोणी त्यांच्या कंदीलाला हात लावत नसे. नंतर अनेक खटपटी, लटपटीनंतर अनेकांच्या प्रयत्नांनी दिनांक १ जुलै १९९० रोजी 'डोंबिवली' लोकल सुरु झाल्याचे आठवते. डोंबिवली भूषण शन्नांच्या घरात जाण्यापुर्वीही एक छोटंसं मारुती मंदिर डोंबिवली स्टेशन बांधले त्या काळातील आहे. स्टेशन बांधण्याचा काँन्ट्रॅक्ट सुद्धा पाटकरांनाच मिळाला होता, अशी एक आठवण वाचनात आली. स्टेशनवरूनच हे गाव नजरेच्या टप्प्यात दिसायचे. मध्ये मध्ये बांबूची बने (बांबुच्या झाडांचा पुंजका), मध्ये भातशेती तर काही ठीकाणी डबकी व तळी(?). त्यावर गर्द हिरवी पाणवनस्पती व त्यावर डोलणारी जांभळी फुले. येथल्या भूमिपुत्रांच्या बैलगाड्या मातीच्या रस्त्यावरून जाताना दिसायच्या. गावात २१४ घोडे किंवा दोन टांगे सुद्धा कधी दिसायचे. आतासारखे रस्त्यावर घाणीचे ढिगारे आणि त्याची दुर्गंधी नसायची. पण कुठेतरी गाईम्हशींचे शेण पडलेले दिसायचे. मध्यंतरी भूमिगत गटारींचे मोठ्ठं काम झालं. पण फायदा आणि परिणाम शून्य अनं डासांचे साम्राज्य तसंच राहीलं.
एरवी वर्षभर लोकलच्या दावणीला बांधलेलं व घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या डोंबिवली शहराचा त्याकाळात मागमूसही नव्हता. काय गंमत बघाना श्रेष्ठ साहित्यिक पु.भा. भावे किंवा डोंबिवली भूषण शंन्ना नवरे किंवा अनेकानेक लेखक, कवि, अन्य क्षेत्रातील मान्यवर हातात पिशवी घेऊन भाजी घ्यायला यायचे. तेव्हा त्यांच्यातील साधेपणा, वागण्या-बोलण्यातली सहजता मनाला भावून जायची. त्याचं कारण होतं, तेव्हा 'सेलीब्रेटी'चं वारं नव्हतं शिरलं डोंबिवलीकरांच्या डोक्यात.
एकदा एका समारंभात पु.भा. भावेंना नऊवारसाडीत सुहासिनींनी वाद्यांच्या मधुर स्वरात पंचारती ओवाळतांना बघितले होते. खरंच तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले होते. तेव्हा टिव्ही, मोबाईल, कॅमेरे यांचे चकाचक फ्लॅश नव्हते आणि हजार ल़डींचे कानठाळ्या बसविणारे फटाके सुद्धा नव्हते. शाळांच्या संदर्भात सांगायचे तर ४०/४५ वर्षापूर्वी २/३ प्राथमिक शाळा होत्या. घुलेबाईंची शाळा आठवते. आता जेथे महानगरपालिका इमारत आहे. तिथे २/३ फुटाचे कातळाचे टेपार होते. मुलांना या कातळाच्या कठीण वाटा पार करायला लागायच्या. शाळेच्या १/२ रीच्या मुलांची सहल स्थानीक तर ३री, ४थी ची एक दिवसाची असायची. ५/६ वर्षाची मुलं एकत्र करून चार शिक्षिका मेढरं हाकावी तसं त्यांना मातीच्या रस्त्याने चालत न्यायचं. गोग्रासवाडीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत न्यायचे. येथे भले मोठे दोन्ही बाजूला हत्ती एवढे वाटणारे दोन गीर जातीचे बैल असायचे. आतील शेणमुत्राचा, गवताचा वास अन् शंभर गाई हे सर्व पहायचं, डबा खायचा आणि शाळेत येऊन हजेरी लावून मुले दुपारी घरी जायची. सर्व कसं विदाऊट टेन्शन चालायचं. पुढे जोशी हायस्कूल अन् टिळकनगर ह्या शाळा नावलौकिक पात्र झाल्या. मला आठवतं राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळा ब्लॉकच्या खोलीत डोंबिवलीच्या सर्व दिशांच्या नगरात निघाल्यात. राम, दत्त, गोपाळ इत्यादी ह्या शाळांच्या संदर्भात कॉमेंट्स ऐकले होते की, पानटपऱ्यांसारख्या सर्वत्र शाळा काढल्या. पण थोड्याच कालावधीत ह्याच शाळांनी एस.एस.सी. बोर्डाच्या गुणवत्तेत अशी काही मुसंडी मारली की रेकॉर्डब्रेक तर केलेच पण महाराष्ट्राच्या शैक्षणीक नकाशावर विराजमान झाल्यात.
एक आठवण डोंबिवलीच्या ग्रामदैवताची. गावकऱ्यांना एकत्र यायला एक जागा हवी या संकल्पनेतून दिनांक २४ मे १९२४ रोजी सार्वजनिक गणेशोत्सव व सन १९५२ला महालक्ष्मी पूजन सुरु झाले. आज मंदिरात दिसणारा वड ९८ वर्षाचा झाला. हे मंदिर म्हणजे डोंबिवलीचा केंद्रबिंदू झाला. याच्या परिघात जे जे येते ते व्यापून आपलेसे करते. *बिंब जरी बचके एवढे, परि त्रैलोक्या थोकडे, भक्त भगवंताचे नाते अतूट* बांधून ठेवणारा गणराज हाच या नगरीचे खरे अधिष्ठान आहे असे गणेश संस्थान आजही समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे.
समाजसेवेची आवड असणाऱ्या मोजक्या ब्राह्मण लोकांनी एकत्र येऊन सर्व समाजासाठी स्थापन केलेली ब्राह्मणसभा आज देखण्यारुपात समोर असली तरी आजपर्यंत तिनं केलेले सामाजिक कार्य सर्वांना माहीत आहे. डोंबिवलीचे आणखी एक मोक्याचे ठिकाम म्हणजे फडके रोडवर ५० वर्षे वॉच ठेऊन असणारे माधवराव फडके म्हणजे बितंबातमीचे केंद्रच. वैद्यकीय क्षेत्रातले अगदी जुने स्टेशन जवळचे डॉ. रावांचे हॉस्पिटल सर्वांच्या कठीण समयी दिलासा देणार होतं. कै. डॉ. भट यांनी दूरदृष्टीने महाराष्ट्रात पहीला डोंबिवली ज्येष्ठ नागरिक संघ स्थापला. आज सर्व महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. एकट्या डोंबिवलीत आज १७ संघ कार्यरत आहेत. तसेच डोंबिवलीतल्या पहिल्या स्त्री डॉक्टर मालतीबाई प्रधान (डोंबिवली भूषण). त्यांचा तो दवाखाना आणि अत्यंत सात्विक, सोज्वळ, प्रेमळ असे त्यांचे व्यक्तीमत्व पेशंटला आपलेसे करायचे. त्यांचीच मैत्रिण त्यांच्याच आग्रहाखातर डोंबिवलीला त्याकाळात कोणत्याही सुविधा नसताना, डॉ. कमलाबाई दाते यांनी स्त्रीयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित प्रसूतीसाठी प्रसुतीगृह सुरु केले. त्या आरोग्य मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला.
आणखी एक ऐकीव आठवण. खिमजीबाईंचा पहीला पत्रे असणारा ३४४ आसनांचा १ला चित्रपटगृह, १ला सिनेमा *'झनक झनक पायल बाजे'* आणि दर होता २ आणे, ३ आणे, ५ आणे. सन १९५०मध्ये सुरु झालेले ग्रंथालय, विजय प्रधानांचे सावरकर बालवाचनालय, व्याख्यानमाला सारेच याचा लाभ घेत आहेत. नऊवारी साड्यांचे 'पारशिवनीकर कंपनी'चे दुकानात आई आणि सासूसाठी घेतलेली पातळं या आठवणी सुखावून जातात. डोंबिवलीच्या पश्चिमेला कोणी जायला तयार नसत. जंगल, डास, दलदल. पण नाख्ये उद्योगाची एव्हरेस्ट कॉलनी सर्वांसाठी एव्हरेस्ट सर करणारी ठरली. आताचा विस्तार लक्षात राहीलेले खूप आहे. ४०/५० वर्षापूर्वीचे नवरे वखार, पित्रे बिल्डींग, १ले देरासर जैन मंदिर-पारसमणीभवन, शिवमंदिर, ओतुरकर कला मंदिर, स्टेशनजवळची छोटी मंदिरे, नळाला चोवीसतास पाणी-टिळकनगरमध्ये तरी होते. इत्यादी सर्व आठवणींचा कल्लोळ मनाच्या अंतरंगाच्या एका कोपऱ्यात निर्माण झाला आहे. किती ते आठवावे डोंबिवलीचे जुने रुप, जुने रंग, जुने ढंग…?
सद्य:स्थितीत डोंबिवलीचे वैशिष्ठ्य सांगायचे तर येथे पोटापाण्यासाठी बाहेरून आलेले बहुभाषी बांधवच जास्त संख्येने आहेत. ते इथल्या मातीशी व संस्कृतीशी एकरुप झाले आहेत. स्वा. विवेकानंद आणि त्यांचे कन्याकुमारीचे स्मारकाशी डोंबिवलीकरांचा जुना स्नेह आहे. साऱ्या देशा, विदेशातही नवी वर्षारंभी पहाट-संस्कृती देणारी नववर्ष स्वागतयात्रा तर डोंबिवलीनेच सुरु केली. त्याच्या किती बरं आठवणी सांगायच्या? आणि आता तर सुरु झाला नव्या दिशेचा प्रवास. त्यानंतर उभी राहीली एक नव्या विचारांची रुजवणूक. आता आपली नगरी एवढी वाढली, पसरली आहे की मनात असून ही आपल्या जिव्हाळ्याच्या क्षेत्राशी निगडीत व्यक्तींशी किंवा संस्थांशी संपर्क साधता येत नाही.
डोंबिवली जणू महानगराची सांस्कृतिक उपराजधानी तर मुंबईकराचं पुणं आणि ठाण्या पलिकडच्यांची सदाशिवपेठ. डोंबिवलीला हे वैभव प्राप्त करून दिलं अनेकानेक मान्यवरांनी. याचा सर्वांनाच अभिमान आहे. एक लाट आली आणि डोंबिवलीचं नाव जगाच्या नकाशावर गेले. साधारण तो काळ होता सन १९८०-९०चा. मुंबईच्या मराठी माणसानं मुंबईतल्या स्वत:च्या जागा कित्येक लाखात विकल्या. (मुंबई मराठी माणसाने रिक्त झाली) आणि डोंबिवलीत १०/१५ हजारात बंगल्यात रहाण्याचे स्वप्न पुरं केलं आणि हां हां म्हणता डोंबिवलीत चाळी आणि बंगल्यांच्या जागी उत्तुंग इमारीती उभ्या राहील्यात अन लोकसंख्येची घनता (दाटी) कल्पने पलिकडे गेली. ज्याने डोंबिवली गावाचा चेहरामोहराच बदलवून टाकला.
तो आहे उद्योगाच्या नेतृत्वाचा आणि कार्पोरेट कल्चरचा, छोट्या मोठ्या पडद्यावरच्या कलावंताचा, देशभरातील क्रिडांगणे गाजवणाऱ्या खेळाडूंचा, विविध क्षेत्रातील कलाकारांचा आणि चेहरा होता सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींचा. अजून काही काळानंतर ह्याच विषयावरच लेखन फारच वेगळं होईल.
कुणी लिहीलं माहीत नाही.
Posted as received.
डोम्बिवली चा इतिहास खुप सूंदर माहिती.
Comments
Post a Comment