*फुंकर*
चुलीतल्या धुमसत्या लाकडांवर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात ज्याने अन्न शिजते.
कुणाच्या भाजलेल्या त्वचेवर अथवा जखमेवर फुंकर घातल्यास तिथला दाह कमी होतो.
शाळेत कधी डोळ्यात काही पडलच तर बाजूची मैत्रीण तिच्या चिमुकल्या हातांनी डोळा मोठा करत त्यावर फुंकर घालायची जेणेकरून डोळ्यात पडलेला कण उडून जायचा.
कुणाच्या दु:खावर मायेच्या आश्वासक शब्दांची फुंकर घातल्यास त्या व्यक्तीस दु:ख सहन करण्याची,त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते.
नवथर तरुणीच्या अल्लड बटांवर तिच्या प्रियकराने घातलेली हलकीशी फुंकरही तिच्या कायेत रोमांच फुलविते.
आठवणींच्या वहीवर फुंकर घालताच अनेक आठवणी पिंगा घालतात.
आठवणींची साखळीच तयार होते.
अन ही गुंफण तजेला देते.
गरमगरम कॉफीचा फुंकर घालून आस्वाद घेण्याचा नाद वेगळाच.
लहानपणी लाजरीच्या पानांवर हळूवार फुंकर घालून ती मिटताना पहाणं हाही एक नादच होता.
बशीतला गरम चहा एकाकडेने आजी/आई धरते व दुसऱ्या कडेने बाळ बशीला गच्च पकडते. मग आई हळूवार फुंकर घालते चहावर जेणेकरून बाळाच्या जीभेला चटका लागू नये. ते पाहून बाळाला अजून मजा येते. बाळपण मग फुर्र फुर्र करत चहा पिऊ लागतो.
लहान बाळाच्या जावळावर फुंकर घाला. त्याचे मुलायम केस भुरुभुरु उडतात व बाळ जितका वेळ आपण फुंकर घालू तितका वेळ खुदूखुदू हसतं. ते हसणं दैवी असतं. त्याहून सुंदर आकाशातलं चांदणं देखील नसतं.
पाटी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसली की ती फुंकर घालून वाळवायचो तेंव्हाचं ते गाणं चिमणी चिमणी पाणी दे कावळ्या कावळ्या वारा घाल..अजुनही बालपणात घेऊन जातं.
बासरीच्या मुखरंध्राजवळ श्रीकृष्णाची अलवार फुंकर पडू लागली की गोपिकाच काय, गाईवासरेही देहभान विसरुन डोलू लागायची.
अशी ही फुंकर..इवलीशी..तरी अगदी जवळची.
# My addition
👌
हातावर ठेवून म्हातारीला फुंकर मारून उडविणे आणि ती कशी आकाशात तरंगत उडते हे पूर्वी शालेय मुलांचा एक आवडी चा छंद (माझा सुद्धा), ज्यांनी अनुभवलाय त्यांना यायला आनंद माहिती असणारा.
Comments
Post a Comment