Skip to main content

मनातले बोल

१. 

खळाळत्या नदीतीरी सांज झाली ग उनाड
मनी माझ्याही उधाण ,
जणू फेसाळ सागर !
हात लागती आभाळा
 चित्त क्षितिजापल्याड !
भेटतील दोन तीर होती मोकळी कवाडं
हिरवाई उधळून
मन माझही लबाड !!!

              सौ लतिका गांगल
२.

कोपरा एक किंचितसा काजळलेला ,
आठवांचे साठव होऊन जरा जळमटलेला
संधीप्रकाशात कुठेसा हरवलेला ,
ना दिवा ना पणती काहीसा विझलेला !
   गतस्मृतींच्या कॅलिडोस्कोपने सांधलेला
     नाजूकसा एक  सांधा 
   काहीसा निखळलेला !
     दोस्तीतल्या रुसाव्याफुगव्यांनि 
          थोडा भागलेला ,
          अनामिकेने अबोला तर
 दोन बोटांच्या मिठीने रुसवा 
                संपवलेला !
 कोपरा तो एका अनामिक ओढीने
             व्यापलेला 
शैशव चांदण्यांनी आता
           उजळलेला 
नको साद पुनवकौमुदिस आता 
      असे तो प्रकाशलेला !!!
                    ~ लतिका गांगल.

३.

परीटघडीत रोजच घरात येणारा
काळा पांढरा समाजरंग 
संयतअभिमानाने अंगी मिरवणारा
वाफाळत्या चहाची खुमारी वाढवणारा
पुरवणीतून कॉफीलाही सायंनशा आणणारा
"पत्र नव्हे मित्र"  बिरुद बाळगणारा !
आज बरेच दिवसांनी भेटला
रागरंग गंध  वेगळाच भासला
तमस जो जगी ग्रासला 
उरी तोच याने बाळगला ,मग
हळूच त्याच्या कानी लागून 
मीच समजावणीचा सूर धरला !!

 सौ .लतिका 

४.

मायपरात करी  गर्भसंस्कार
पाण्या तेलाचं शिंपण
जशी मायेची पाखरण !
 पोळपाट पिता देई जीवनाकार
कधी मायेची चापट
कधी लाटण्याचा संस्कार !
पिठी भावंडासम उदार
वाट चालवती सरसर
माया होई  जीवनाधार !
धगीवर भेटे तवा जोडीदार
कधी माफक उबदार
कधी तप्त कहर !
कधी जळे तिचे  ऊर 
लुसलुशीत  कधी प्रेमपदर
घडेबिघडे जीवन निरंतर !!!
  
लतिका

५.
संध्याकाळ होती, निरवशी नाही म्हणता येणार अशांतशी, वादळानंतरची भयाण शांतता होती वातावरणात !
 निरवशी सायंकाळ  शांताबाईंची कविता , हातात कॉफी चा कप ,त्याच कवितेचं गाणं होताना चा अनुभव सलीलजींकडून Utube वर ,लताजींच्या स्वर्गीय आवाजात तेच गाणं मोबाईल वर किंवा TV वर एखादा गाण्याचा कार्यक्रम किंवा डांस ची स्पर्धा हे गणित ठरलेलं!!  पण विजेअभावी कनेक्टिव्हिटी शिवाय हे काहिच शक्य नव्हतं ,,म्हणून अंगणात बसून पुस्तक वाचत होते किती वेळ गेला समजलं नाही सवयीप्रमाणे मोबाईल मध्ये वेळ बघितली सव्वासात झाले होते संध्याकाळचे आणि तरीही अंगणात स्वच्छ उजेड होता सहजी वाचता यावं असा ,क्षणभर वाटून गेलं आपण हँबुर्गला तर नाही ?? तिथे अशी संध्याकाळ अनुभवली होती .मोबाइल हल्ली हाताचा तळवाच असल्यासारखा चिकटून असतो हाताला ,बरेचदा पत्रिका पाहण्यासाठी कधी व्हाट्सअप्प गुगल कधी UTube तर कधी FB पाहण्यासाठी !!पण "निसर्ग"वादळाने अशी काही चपराक दिली की हा तळवा धावदोऱ्याची शिलाई असल्यासारखा सुटून गेला हातातून ! "निसर्गने" नैसर्गिक  संपत्ती ची भयानक हानी केली होती मग त्याच्यापुढे मानवनिर्मित गोष्टींचा काय पाड! 
     जमिनीवर टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता वातावरणात ,अगदी फ्रिज चा देखील तो "सू "असा आवाज नाही डोक्यावर फॅन ची घरघर नाही  की पानांची सळसळ नाही, ती बिचारी जमिनीवर पहुडली होती निपचित , msgs चे ते छळणारे टोन नाही वातावरणातला  वाहनांचा ,दूरदर्शन चा कसला म्हणजे कसलाच आवाज नाही !! कारण  वादळामुळे  महाकाय वटवृक्ष जणू आकाशाच्या पोटातून उगवल्यासारखे जमिनीवर कोसळले होते घरावरच्या पत्र्यांंनी आपली जागा सोडली होती  विजेचे खांब जमिनीला लवून नमस्कार करत होते,विजेच्या तारा सात जन्मीचे ऋणानुबंध असल्यासरख्या एकमेकांत गुंतल्या होत्या !!  सगळीच यंत्रणा कोसळली होती !!
ही गूढ शांतता आणि हा स्वर्गीय आणि हा स्वच्छ प्रकाश मला काही सुचवू पहात होता बहुदा ! मग विचाराअंंती लक्षात आलं ते अस,कधीतरी मनातून सगळे आवाज बाजूला ठेवून  निसर्गाच्या सानिध्यात बसावं तेही आपल्याच अंगणातल्या आणि वाचन चिंतन मनन करावं !! 
विजेच्या किरणांचा प्रकाश सोडून रवीकिरणांच्या प्रकाशाचा हा जादुई खेळ अनुभवावा !!
खरोखर "निसर्ग" ने मनातला सगळा अंधःकार धुवून प्रकाशाची एक नवी ज्योत तेववली  !
तंत्रज्ञानाचे गुलाम झालोय आपण हे प्रकर्षाने जाणवलं  !! गुलामी कोणाचीही वाईटच !
ज्ञान आत्मसात करणं चांगलंच पण फारच तंत्रावर नाचवायला लागलं तर वेळीच सावध व्हावं !!

सौ लतिका गांगल

६.

मैत्रिणी


  बंध आपुल्या मैत्रीचे निखळ 


सुखदुःखांंची असे कळकळ !


मुक्तबंध हे बंधन प्रेमळ


वाहे आंनंदनिर्झर निर्मळ !


मैत्र आपुले मोगरा परिमळ


नांदतो मनी तयाचा दरवळ !


मैत्रबंधाची गाठ अंतरी नितळ


भेटण्या एकमेका होतो व्याकुळ !


सांभाळत संसाराचा जगडव्याळ


 होऊ स्वयंसिद्धा मनी असे तळमळ !


झणी सगळ्याच कविता कमाल~~~


चांदणथवा आनंदमेवा धमाल !!


केतकी वर्ण कुणी 


कुणी सावळी सोजवळ


कुणी शेलाटी


कुणी जरा अघळपघळ


बोलघेवडी कुणी 


कुणी जरा अबोल


मिठ्ठास वाणी कुणी


कुणी जरा फटकळ !


लिहू जाता एकेक ओळ


मन आनंदे घाली शीळ !!!



सौ लतिका गांगल

७.

मित्र 


आरसा प्रांजळाचा तया अंतरी  वसे 

जाणी , दुःखहुंकार जे बंद ओठी असे !

 ठायी तया अहंचा लवलेशही नसे 

तिखट उन जरी पंख तो घालीतसे !

 कधी थाप धीराची लाभतसे

कधी अंतरीची मायाही दिसे !

शिवीही त्याची प्रेमळ भासे

अंतरी  वारसा कलेचा असे !

मित्र लाभला ऐसा पूर्वसंचित जैसे

नरनारी भेद क्षण एकही नसे !

लिहिता अक्षरे जव शाई सांडतसे

 मित्र म्हणता नाव तुझेच मी स्मरतसे !

कृष्णसखा तो भासे 

अर्जुन ममांतरी वसे


सौ लतिका गांगल

८. 

येतो रे नेमेची श्रावण 

लेऊनी नितनवे सण

व्रत वैकल्यांंना उधाण 

 जिव्हाचोचले पुरवणं

मनासवे देहाचं बहरणं !

आली आली मंगळागौर

सजवू पत्रीफुले वेचून 

झिम्मा फुगडी खेळणं

 वडे भरड्याचे तळणं

अन्

वजनकाट्याने जरा रुसणं !

आला रक्षाबंधनाचा सण

बंधुप्रेमाची रक्षागुंफण

टम्म फुगे करंजी

गोड नारळ सारण 

अन्

काट्यानं डोळे वटारणं !!

आला जीवतीचा सण 

करू सवाष्ण पूजन

पुरणपोळी संगे तूप.ऊनऊन 

कुरडया पापडांंचं तळणं

अन्

काट्याचं गाल फुगवणं !

येता जन्माष्टमीचा सण

घालू रसनेला बंधन

करू उपवास प्रयोजन

करू मिष्टान्न कृष्णार्पण

मग

मिळे काट्यासही निवांतपण !! 


सौ लतिका गांगल

९.
मन्मनी स्वप्रतिमा न्याहाळता,
सोहम कोहंचीउकल उकलता 
कोहं कोहं मनासी पुसता ,
कातरते मन नेणिव होता !
तनया सखी भगिनी माता ,
चारुलता मी की मी सरिता
शाश्वत प्रतिमा चितारु पहाता
काजळते मन धूसर ती देखता!!
                   लतिका गांगल

Comments

Popular posts from this blog

*काय वाढले पानावरती*

गदिमांची अफाट काव्य प्रतिभा*       *जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे.* हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरंच नवल...! *काय वाढले पानावरती..!* काय वाढले  पानावरती,  ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले,  मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहु मुरलेले,  आणि लिंबू रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे ती सह ओले,  तीळ भाजूनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले! भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुन सुरेख तळल्या,  कोशिंबिरी च्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या,  केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या, एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी, रान कारली वांगी काळी,  सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळ...

Cowrie, Damri, Dhela, Pie, Paisa, Rupayya and related phrases in Hindi and Marathi

Indian History of Currency (Coin) Phootie Cowrie to Cowrie Cowrie to Damri Damri to Dhela Dhela to Pie Pie to to Paisa Paisa to Rupya 256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa = 16 Anna = 1 Rupya And remember these phrases ? Ek phootie cowrie nahi dunga! Do cowrie ki aukat nahi hai! Pie pie ka hisab lunga! Jaan chali jaye par Damri naa jaye! Vo kisi ko ek Dhela naa de! फुटकी कवडीसुद्धा हा घे ढेला पै पै (pie) करून पैसे जमवणे कवडीचुंबक दीडदमडीचा सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली मजा वाटली😊😊   फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी कौड़ियों के दाम बिक रहा है चमड़ी जाए पर दमड़ी ना जाए पाई पाई से घड़ा भरना धेले भर का Some more in Hindi सोलह आने सच Some rare coins One Anna Back side Front side

वातींचे प्रकार

*वातींचे प्रकार  सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार सांगते..  *नंदादीप वात*  किंवा समई वात तेलाच्या दिव्यासाठी-- ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात.. *बेलवात*-- ह्या श्रावण महिनाभर लावतात-- एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3 पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी लावतात... *शिवरात्रवात*-- महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात.. *वैकुंठवात* --350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडाळतात... *टिपूर*--तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात.. *अधिक महिन्याची वात*--- 33 पदरी 33 वाती , 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात .. कोणी महिनाभर लावतात कोणी एकदाच लावतात.. *कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात.. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात.. *काडवाती*-- अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळू...