भोंडला-एक आठवण
©® माधवी समीर जोशी, ठाणे
नवरात्र जवळ आले की वेध लागतात ते भोंडल्यांचे. मागच्या वर्षी एका सामुदायिक भोंडल्याला गेले होते . भल्यामोठ्या मैदानात भोंडल्यांचे आयोजित केला होता. तिथे नटुनथटून बायका जास्त करुन आज्यांचीच गर्दी होती.काही बरोबर आपल्या सुना आणि नातीना घेऊन आल्या होत्या.भोंडल्याची गाणी ध्वनीमुद्रित लावली होती, फेर धरला होता.सगळं कसं छान होतं पण काहीतरी हरवून गेले आहे असे वाटलं त्यात काय नव्हते ते आपलेपणा.
भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो .याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते..
माझं लहानपणी नवरात्रीत रोज आजुबाजुला कोणाकडे तरी भोंडला असायचा. साधारण संध्याकाळी ५ वाजता सगळ्यांना बोलवले जायचे. पाटावर खडूने किंवा फुलांनी हत्ती काढला जायचा. ज्या मुलीचा भोंडला असेल ती नटुनथटून तयार होत असे .मग जमलेल्या मुली गोल फेर धरून गाणी म्हणतात.पाटावर हत्तीच्या चित्राखाली रांगोळीचे ठिपके काढतात . गाणे झाले की ठिपका पुसून टाकायचा . ही सर्व गाणी स्त्रियांच्या भावविश्वाबद्दल असतं. प्रत्येक गाण्याची विशिष्ट चाल असे. ती सर्व गाणी मौखिक पंरपरेने पुढील पिढीत पोचत असे. ह्या गाण्यांनी भोंडला सुरू होतो...
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा..
पुढील गाणं
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू..
पूर्वी एकत्र मोठी कुटुंब, दळणवळणाच्या सोयीचा अभाव, स्त्रिया कामाच्या व मुलांच्या रगाड्यात, लहान वयातील लग्न, सासुरवास ह्या मूळे त्यांना माहेरची आठवण तीव्रतेने येत असे. अनेक लोकगीतातून, ओव्यातून, गाण्यांतून ती व्यक्त होत होती . माहेराला जाण्यासाठी सुनेला सासुची परवानगी लागे..
कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा...
भोंडल्याच्या गाण्यात माहेरची स्तुती आणि सासरची निंदा असायची जसे
आला माझ्या माहेरचा वैद्य डोक्यावर टोपी भरजरी....
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं...
:
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं..।
नणंदेनी भावजयीबद्दल भावाकडे केलेली खट्याळ तक्रार ह्या गाण्यात आहे.
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाळल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं..
नवराबायकोवरील गाणं, रुसलेल्या स्त्रीला सासू, सासरे,दिर,नणंद, जाऊ समजावला जातात पण नवराच तिची कशी समजूत घालतो ते गाणं
यादवराया राणी घरास येईना कैसी
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी..
पती गेला समजावयाला
चल चल राणी अपुल्या घराला
लाल चाबूक देतो तुजला
मी येते अपुल्या घराला
यादवराया राणी घरास आली कैसी
सासूरवाशीण सून घरास आली कैसी..
मुलांनी आईकडे केलेला प्रेमळ हट्ट
कृष्ण घालीतो लोळण, यशोदा आली ती धावून
कायरे मागतोस बाळा तुजला देते मी आणून..
शिवाजी महाराजांची स्तुतीपर गाणं होते
शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो किल्ला तोरणा...
अशी अनेक गाणी म्हणली जायची. ती गाणी आजच्या पिढीला कालबाह्य वाटातात.
भोंडल्यांचे मुख्य आकर्षण असायचे ते खिरापत ओळखायचे. एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते.. शेवटी गोड की तिखट? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू होत असे.खिरापत काही असायची डाळ, चिवडा,दडपे पोहे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या, लाडू , चणे ,इ. सहज ओळखायला न येणारी खिरापत करण्यात आयांचं कौशल्य पणाला लागायचं आणि आम्ही मुली भाव खाऊन जायचो. पुर्वी स्पर्धेच्या क्लेशकारक चक्रव्युहामधे बालपण आडकलेलं नसायचं त्यामुळे अशा प्रकारच्या सार्वजनिक सोहळ्यांचा आम्हा मुलींना मनसोक्त आनंद घेता येत असे. खिरापत खाउन झाले की भोंडला संपायचा. अजून कुठे बोलावणं असेल तर लगबगीनं सगळ्या तिकडे पळायच्या.
भोंडल्याची सांगता ह्या गाण्यांने होत असे.किती छोटे छोटे आनंद होते ना.
आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोनी,
आडात पडला शिंपला,
आमचा भोंडला संपला...
Comments
Post a Comment