शेराचे झाड.
Euphorbia tirucalli.
अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड!
पूर्वी शेतबांधावर आपले पुर्वज आवर्जून हे झाड लावायचे,किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे!तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर!
आमचे अख्खे बालपण शेराखाली खेळण्यात गेले, आमची आई फक्त शेराच्या झाडाला हात लावू देत नव्हती. याचा चिक डोळ्यात वगैरे गेला तर अत्यंत घातक म्हणून. पण शेराची सावली अत्यंत आरोग्यदायी असते हे आता कळतंय, कारण शेर नामशेष होऊ लागलेत.
शेराचे झाड पिकावरील किडींचा प्रादुर्भाव रोखते हे वाचून मी ह्यावर्षी आमच्या मक्यावर एक प्रयोग केला. मक्यावर पडणाऱ्या लष्करी आळीसाठी मी शेराच्या पाचसहा नांग्या खलबत्त्यात चेचून दोन दिवस एक लिटर पाण्यात भिजत ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी दोनशे मिली पंधरा लिटर पाण्यातून फवारल्या!रिझल्ट म्हणाल तर मी दुकानातून आणलेले औषध परत केले!अडिचशे मिली औषधाची किंमत अकराशे रुपये होती आणि ते उधारीवर आणलेले असल्याने परत करायला अडचण आली नाही😊
पुर्वी पिकाच्या मुळ्यांना खाणारी तास आळी,हुमणी ईत्यादी किडींसाठी शेतकरी शेराची छोटी फांदी तोडून पाटात ठेवून पिकाला पाणी देत.
जे शेतकरी विषमुक्त शेती करू इच्छितात त्यांनी शेराचा प्रयोग आवश्य करून पाहावा.पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या प्रदेशात विवीध झाडांची रोपे शेराच्या सावलीत ठेवतात.
तसेच शेराच्या फुलांवर अनेक प्रकारच्या मधमाश्या येतात. कारण शेराला फुलेच अशावेळी येतात जेव्हा पावसाळी फुले संपलेली असतात. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत!
हे झाले शेतीसाठी उपयोग,
दाढदुखीमुळे आपला कान बधीर झाला असेल तर, शेराखाली पडलेली पिकलेली,परंतु ओली नांगी विस्तवावर गरम करून कानात पिळावी.त्या नांगीतून अत्यंत नितळ पाणी निघते. तुमची दाढ दुखायची थांबतेच,पण जास्त किडली असेल तर आपोआप निघून पडते!हा स्वानुभव आहे!
ईतर उपयोगात शेराचा ताजा चिक एक ते दोन मिली मिठाबरोबर दिल्यास उलट्या व जुलाब होतात.हा उपाय मानसिक विकृतीतून जडलेल्या सांधेदुखी साठी करतात.
मज्जा तंतूच्या दुखण्यात चिकाचा लेप मणक्यावर लावतात.
काही कारणांनी माणसाला विषबाधा होते, माणूस हळूहळू खंगत जातो, अशावेळी शेराचा दोन थेंब चिक चण्याचे पीठ आणि काकवी यांची गोळी करून देतात, जर विषबाधा असेल तर सदर माणसाला जुलाब होऊन विष बाहेर पडते, नसेल तर जुलाब होत नाहीत.
शेराच्या ताज्या चिकाने चामखीळ जातात, मात्र चेहऱ्यावर हा उपाय करू नये.
ज्यांना जखडलेले सांधे, फ्रोजन शोल्डर वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी शेराच्या चिकात तिळाचे तेल मिसळून मालीश करतात.
टिप:--वरील सर्व उपाय सांगण्याचे कारण, झाडाचे महत्त्व पटावे व त्याची लागवड व्हावी म्हणून दिले आहेत. वापर आवश्य करावा, मात्र तज्ञांचा सल्ला घ्यावा.कदाचित भविष्यात आताची औषधे मानवी शरीरावर परिणामकारक ठरतील ह्याची शाश्वती नाही, पुन्हा झाडांकडे वळायचे म्हटले तर ती राहावीत एवढाच उद्देश!
FB group दुर्मिळ झाडे व प्रजाती गटातील सदस्य अमोलजी भंगाळे यांच्याकडून आलेला लेख.
Comments
Post a Comment