#गगनजाई...
🌸🌸🌸
जाईच्या फुलांसारख्या पांढ-या रंगांची आणि जाईपेक्षा अधिक सुगंधी अशी ही आकाशाकडे झेपावणारी झाडं म्हणून त्यांचं नाव #गगनजाई.निंबाच्या पानांसारखी पानं म्हणून दुसरं नाव #आकाशनिंब.तर याच्या खोडापासून काचेच्या बाटल्यांची बुचं बनवतात म्हणून तिसरं अगदी अरसिक आणि जास्त वापरातलं नाव म्हणजे #बुचाचं झाड.🙄लहानपणी घरापासून शाळेत जाताना वाटेत या फुलांचा सडा पडलेला असायचा.आम्हा मैत्रिणींच्यात का कोण जाणे पण या फुलांना पाटलिणीची फुलं असं नाव होतं.कदाचित त्या झाडांची मालकीण कोणीतरी पाटील आडनावाची बाई असावी.सकाळी सकाळी रस्त्यावरुन चालताना या फुलांचा सुगंध दरवळत नाकाशी आला की आपसुकच दोन्ही मुठीत मावतील इतकी फुलं गोळा करायची.सुट्टीच्या दिवशी वेचून घरी नेली की आई बोटांवर वळून त्याची छान वेणी करायची.इतर दिवशी शाळेत मैत्रीणींना वाटायची.त्याचे छोटे छोटे गुच्छ करुन वेणीत घालायचे.दुपारनंतर ती फुलं मऊ व्हायची.मग अलगद केसातून काढून पुढचा उद्योग सुरु व्हायचा.या पांढ-या शुभ्र किंवा किंचित गुलाबी छटा असलेल्या फुलांना पाच पाकळ्या असायच्या.तीन पाकळ्या स्वतंत्र तर चौथी आणि पाचवी एकमेकींना जुळ्या बहिणींसारख्या चिकटलेल्या. सकाळी ताठरलेल्या पाकळ्या दुपारनंतर मऊ झाल्या की नख लावून वेगळ्या करायच्या.मग अंगठा आणि तर्जनी यांच्या चिमटीत धरुन हळूवार दाबल्या की त्याला मधोमध पोकळी तयार व्हायची.ओठांच्या चिमटीत धरुन मग फुगा फुगवल्यासारखी पाकळी फुगवायची आणि दुस-या हाताच्या तळव्यावर "टिच" करुन फोडायची.प्रत्येक पाकळी फुगवून फोडताना तो "टक" आवाज व्हायचा ना त्याचीच आम्हाला गंमत वाटायची.मधल्या सुट्टीनंतर बाई वर्गावर येईपर्यंत हे टिकटिक सुरु असायचं.आताच्या मुलांना ही फुलं माहित असतील की नाही कोण जाणे. त्यामुळे या असल्या गंमतीजंमती माहित असण्याची शक्यता कमीच आहे.आकाशनिंब हा मूळचा ब्रम्हदेश आणि मलेशियातील वृक्ष आहे.या झाडाला भारतातील हवामान चांगलंच मानवल्यामुळे आता भारतातही हा आढळतो.तरीही पूर्वी सर्रास रस्त्याच्या कडेला झाडं दिसायची तशी आता दिसत नाहीत.आकाशाला गवसणी घालण्याचं वेड त्याला मुळातच असावं त्यामुळे तो ८० ते ९० फूट इतका उंच वाढतो.याची मुळं खोलवर न जाता जमिनीत वरवरच पसरलेली असतात त्यामुळे जोराच्या वा-यात झाड उन्मळून पडण्याचा धोका असतो.याच्या मुळावरच छोटी छोटी रोपं उगवतात.ती काढून दुसरीकडे लावून नविन झाड तयार करता येतं.तसंच याला बारीक, चपट्या शेंगा येतात त्यातील बिया पक्ष्यांमार्फत इकडून तिकडे जाऊनही बीजप्रसार होतो.या झाडाला पहिली पानं गळत असतानाच पुढची पानं येत असतात.त्यामुळे ते कधीच निष्पर्ण दिसत नाही.याचं लाकूड मृदंग,पखवाज, संवादिनीचे स्वर व इतर वाद्यांसाठीही वापरतात.एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशी दोनवेळा ही झाडं बहरतात आणि पांढ-या शुभ्र फुलांचे घोसच्या घोस झुंबरांसारखे लटकताना दिसतात.झाडाखाली फुलांचा सडा आणि आजूबाजूला मंद सुगंध पसरलेला असतो. लटक चमेली,गगन मल्लिगे,बिरटू,Tree Jasmine, Indian Cork tree, आणि लॅटीनमध्ये Millingtonia Hortensis अशी नावं असणा-या झाडाला मराठीतली आकाशनिंब,गरूडलिंब किंवा गगनजाई ही नावंच योग्य वाटतात.
#स्वाती_जोशी_रत्नागिरी.
दि.५ डिसेंबर,२०२०.
PC - #गूगलबाबा.
Comments
Post a Comment