#मधुमालती
🌸🌿🌸🌿
नावातच मधु असलेली आणि उसाच्या पेरांपेरांत साखर भरलेली असते तशी देठादेठांत मध भरलेली ही मालतीची फुलं आपल्यालाच काय तर काळ्या मुंग्यांनाही माहित असतात.😁त्याशिवाय का त्या दिवसभर फुलांच्या आत बाहेर करत मध गोळा करतात?😛म्हणजे नावात काय आहे असं विचारणा-यांनाही कळेल की मधुमालतीची वेल आणि तिच्यावर येणारी फुलं हे प्रकरण किती गोड आहे ते !☺ही मधु आणि मालतीची जोडी पूर्वी लग्नात नाव ठेवतानाही आढळायची.म्हणजे नव-याचं नाव मधुकर किंवा मधुसूदन असेल तर बायकोचं नाव बदलताना त्याला हमखास मालतीच सुचवलं जायचं 😜 इतकी ही जोडी फेमस होती.मी पाचवीत रोह्याला असताना बाबांच्या एका मित्राकडे जाऊन "मधुकाका...उद्या संध्याकाळी आमच्या घरी हळदीकु़ंकवाला मालतीकाकूंना पाठवा" असं बेधडक निमंत्रण दिलं होतं.मग काकांनी हसत हसत सांगितलं की नक्की पाठवतो पण काकूचं नाव मोहिनी आहे ! 🙈म्हणजे तिथे नियमाला अपवाद होता.🤗हिचं नावच इतकं गोड आहे की सिंहासन बत्तिशी लिहितानाही नवव्या पुतळीचं नाव मधुमालती ठेवण्याचा मोह लेखकाला आवरता आला नाही ! तर अशी ही मधुमालती ही भारतीय वंशाची सदाहरित वेलवर्गीय वनस्पती.#कॉम्ब्रेटम_इंडिकम
(Combretum Indicum)हे तिचं शास्त्रीय नाव असून ती #कॉम्ब्रेटेसी या कुळातील आहे.इंग्रजीत रंगून क्रीपर (Rangoon Creeper) हिंदीमध्ये माधवीलता,संस्कृत मध्ये माधवी किंवा अतिमुत्तलता या नावांनी ओळखली जाते.मधुमालतीची वेल सदाहरित प्रकारची असून तिला जागा मिळाली तर हातपाय पसरुन झुडूप तयार होतं आणि उंच जाण्यासाठी आधार मिळाला तर सत्तर फुटांपर्यंत वरवर जाण्याची तिची तयारी असते.ही वेल घरासमोरील प्रवेशद्वाराच्या कमानीवर सोडण्यासाठी किंवा बागेत लावण्यासाठीही सुंदर आहे.हिची साल तपकिरी रंगाची वर खवले असलेली,तर पानं सुरुवातीला लालसर, मग पोपटी व नंतर हिरव्यागार रंगाची,साधी पण चिवट, समोरासमोर,लांबटगोल आकाराची आणि दोन्हीकडे महिरपी कंसाच्या टोकासारखी टोकदार असतात.कळ्या अगदी लहान असताना हिरवट,मग गुलाबीसर पांढ-या रंगाच्या होतात.फुलं फुलताना पाच पाकळ्यांची पांढरी, पाठीवर गुलाबी पट्टा असलेली संध्याकाळच्या वेळी फुलून आसमंत गोड सुगंधाने भरुन टाकतात.दुस-या दिवशी तीच फुलं फिकट गुलाबी रंगाची व तिस-या दिवशी लाल होऊन गळून पडतात.या फुलांमध्ये दहा केसर दलं असतात.मधलं एक सर्वात मोठं असतं त्यापासून एकच गोलसर बी बनते. आपल्याकडे #कोकणात या वेलींवर फुलं भरपूर अगदी घोसाघोसांनी लटकताना दिसतात मात्र बिया कधीच दिसत नाहीत.ही फुलं फांद्यांच्या टोकांना येत असल्यामुळे त्याचे निसर्गनिर्मित गुच्छ बघायला मिळतात.ही फुलं काढणं हे अतिशय नाजूक काम आहे.कारण एकाच गुच्छात तिन्ही रंगाची फुलं आणि कळ्याही असतात.जरा जोरात हात लागला की पाकळ्या पडतील की काय वाटतं.अलगदपणे देठं खुडताना चुकून मधेच कळी येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.एकाच गुच्छात परवाची लाल, कालची गुलाबी आणि आजची पांढरी अशी तिरंगी फुलं, त्यातल्या मधाचा गोड घमघमाट,काळ्या मुंग्या,मधमाशा, भुंगे आणि पक्ष्यांचा मुक्त संचार आणि नि:शब्द कातरवेळी ऐकू येणारा गुंजारव हे सगळंच वातावरण भारून टाकणारं असतं.बारमाही फुलं देणारी मधुमालती वसंत ऋतूत मात्र अंगोपांगी बहरते.चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाला देवीच्या सजावटीसाठी मोठे मोठे गुच्छ वापरता येतात.फुलांच्या
दोरा न घेता एकात एक देठं गुंफून माळा करता येतात. मधुमालतीची मुळं,खोड,पानं,फुलं,बिया हे सारं काही औषधी आहे.तसंच ही पानं हवेतला कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन सोडून हवा शुद्ध करण्याचं काम करतात.डोकेदुखी,पोटदुखी,अतिसार,ताप, कृमी यांसारख्या अनेक रोगांवरील औषधात या वनस्पतीचा वापर करतात.ही वेल अतिशय वेगाने वाढते आणि तिची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.मुळं आडवी पसरत जाऊन त्यांना फुटवे फुटून रांगेत नविन रोपं आपोआप रुजून येतात.जास्त कौतुक करावं लागत नसल्यामुळे हल्ली ब-याच सार्वजनिक उद्यानांमध्ये मधुमालती आढळते.हिच्या विकसित जातींमध्ये आता जास्त उंच न वाढणारी,आखूड देठं आणि आकाराने लहान फुलं येणारी रोपं नर्सरीत मिळतात.गच्चीवर,बाल्कनीत कुठेही कुंडीत लावावी आणि सुगंधाचा आनंद लुटावा.अशी मधुमालती प्रत्येकाने आपल्या घरी लावावीच आणि वातावरण शुद्ध करण्यास मदत करावी असं मला वाटतं !
#स्वाती_जोशी_रत्नागिरी.
दि.४ एप्रिल,२०२१.
Comments
Post a Comment