*शोध बाजीराव-मस्तानीपुत्र, पानिपतवीर समशेर बहादूर यांच्या कबरीचा*
पानिपत!हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी प्राणाहुती दिलेले स्थान! मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे युध्द,महायुद्धच! मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा धगधगता अविष्कार! मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युध्द!
या प्रचंड रणसंग्रामात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध मराठी सरदारांच्या, वीरांच्या समवेत लढले होते पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर. प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या समशेर बहादूरांनी अखेरचा श्वास घेतला तो भरतपूरमधे.याच समशेर बहादूरांच्या कबरीचा शोध मला कसा लागला त्याची हकीकत या लेखात नमूद करीत आहे.
महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील शिवरायांचे किल्ले पाहण्याच्या प्राथमिक उद्देशाने १९९० मधे सुरु झालेली माझी दुर्गदर्शन यात्रा पुढे खूप विस्तारत गेली.इतिहास घडविणाऱ्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन आणि शोध हा महत्वाचा विषय या यात्रेत समाविष्ट झाला.२००६ पर्यंत जवळपास तीनशे किल्ले पाहिले आणि शंभराहून अधिक महत्वाच्या मराठी वीरांच्या समाधीस्थळांचे दर्शन घडले.यातील बहुतांश समाधीस्थळे २००६ पर्यंत तरी लोकांच्या नजरेआड,प्रसिध्दीपासून दूर,अज्ञात अवस्थेत होती.स्थानिक ग्रामस्थ आणि वंशज यांच्याखेरीज इतरांना या समाधीस्थळांची माहिती उपलब्ध नव्हती. छायाचित्रांसह या समाध्यांची माहिती अद्याप प्रकाशित झालेली नव्हती.
'मराठ्यांची धारातीर्थे' या माझ्या २००६ साली छापलेल्या पुस्तकातून शंभरभर मराठी वीरांच्या समाधीस्थळांची छायाचित्रे त्यांच्या संक्षिप्त चरित्रासह प्रकशित झाली. यातील जवळपास निम्मी समाधीस्थळे या पुस्तकातून मराठीमधे छायाचित्रांसह प्रथमच लोकांसमोर आली.त्यातील एक महत्वाचा शोध म्हणजे समशेर बहादूर यांच्या कबरीचा शोध.पानिपतवीरांच्या समाध्या शोधत असताना २००६ साली मी भरतपूरला गेलो ते केवळ समशेर बहादूरांची कबर शोधण्यासाठीच.या शोधाची हकीकत सांगण्याअगोदर समशेर बहादूरांचे संक्षिप्त चरित्र नमूद करतो.
समशेर बहादूर हे पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव यांच्या मुस्लीम उपपत्नी मस्तानी यांच्या पोटी पुणे येथे जन्मले. उत्तर भारतात मोहिमेवर जात असताना बाजीराव पेशवे मध्यप्रदेशात रावेरखेडी येथे निधन पावले (१७४०).त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच मस्तानी आत्मघात करून जग सोडून गेल्या. आईवडिलांविना पोरक्या झालेल्या सहा वर्षाच्या समशेर बहादूरांचा सांभाळ बाजीरावानंतर पेशवेपद मिळालेल्या नानासाहेबांनी केला. त्यांचे शिक्षण, संगोपन, लग्ने नानासाहेबांनी करून दिली. वयात येताच समशेरना खाशांचा सरदार बनवून त्यांना पेशवे कुटुंबातील एक मानण्यात आले. बाजीरावांना मस्तानीचे पिता छत्रसाल ह्यांनी दिलेल्या बुंदेलखंडातील प्रांतापैकी ३३ लाख उत्पन्नाचा प्रदेश समशेरबहादुराना सरंजामासाठी देण्यात आला. बांदा हे ह्या जहागीरीतील मुख्य गाव होते.
समशेरबहादुरांनी आपल्या जहागिरीचा बंदोबस्त तर केलाच शिवाय ते मराठ्यांच्या विविध मोहिमात सामील होऊन आपल्या पराक्रमाने ख्याती पावले.
१७५१ च्या हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या लढाईत समशेरबहादूर लढले. १७५३
च्या रघुनाथरावांच्या पहिल्या उत्तर भारतातील मोहिमेत समशेरबहादूर सामील होते. १७५५ मध्ये मारवाडचा राजा बिजेसिंग याने जयाप्पा शिंदेंचा मारेकरी घालून खून केला. ह्यावेळी पेशव्यांनी दहा हजाराच्या फौजेसह समशेर बहादुरांना दत्ताजी शिंदेंच्या मदतीला पाठवले. मारवाडात जाऊन समशेर बहादूरांनी बिजेसिंगाचा प्रदेश उध्वस्त केला. अखेर बिजेसिंग
शरण आला. रूपनगरच्या किल्ल्याच्या वेढ्यात समशेरबहादूर सामील होते. तिथल्या बहादुरसिंगाला शरण आणून कोटा मराठ्यांनी काबीज केले (१७५६). इथून महाराष्ट्रात परत येऊन समशेरबहादूर पेशवे व इंग्रजांच्या तुळाजी आंग्रेंविरुद्धच्या मोहिमेत सामील झाले. यावेळी ऐन
पावसाळ्यात दोन महिने वेढा घालून समशेर बहादूरांनी रत्नागिरी किल्ला जिंकला.
१७५६ च्या दिल्ली मोहिमेत समशेर बहादूरांनी मराठा फौजेसह लढून जाटांनी बळकावलेला ग्वालेर किल्ला जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावली. ह्याचवेळी दिल्लीहून पळालेला मराठाविरोधी शहजादा अलिजा ह्याला समशेरनी कैद केले. १७५८ मध्ये ससैन्य जाऊन समशेरनी बुंदेलखंडातील अराजक नष्ट केले.
अब्दालीविरुद्ध मराठी फौजा महाराष्ट्रातून निघाल्या त्यावेळी समशेर बहादूर आपल्या ३००० घोडेस्वार सैनिकांसह हुजुरातीच्या फौजेत सदाशिवराव भाऊंबरोबर होते. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या मुख्य लढाईत समशेरबहादूर हुजुरातीच्या फौजेच्या उजव्या फळीत लढत होते. दुपारपर्यंत विजयी होत असलेले मराठा सैन्य विश्वासराव(नानासाहेबांचे पुत्र) मारले जाताच व सदाशिवरावभाऊ रणधुमाळीत दिसेनासे होताच कच खाऊ लागले. समशेर बहादूरांनी मात्र सदाशिवराव भाऊंबरोबर शत्रूंवर त्वेषाने हल्ला केला. ह्यावेळी समशेर बहादूर रणांगणातून
बाहेर पडू शकले असते पण त्यांनी भाऊसोबत लढण्याचा शूरांचा मार्ग पत्करला.अनेक अफगाणांना मारून सदाशिवराव भाऊ धारातीर्थी पडले. समशेर बहादूर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत पराभवानंतरच्या पळापळीत कसेबसे भरतपूरला जाटांच्या आश्रयास आले. सूरजमल जाटाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण प्राणांतिक जखमांनी समशेरबहादूर
भरतपूर येथेच मरण पावले.
समशेर बहादूर हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्म मानत असत. त्यांच्या पत्रावर ते स्वहस्ते 'पांडुरंगा' असे लिहित असत. समशेर बहादूरांचा विवाह लक्षधीर दलपतराय यांची कन्या राजकुवर उर्फ मेहेरबाई यांच्याशी झाला होता. मेहेरबाईंच्या पोटी जन्मलेले अलीबहादूर हे समशेर बहादूरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचे अधिकारी झाले. अलीबहादूरांनी पराक्रमात
आपल्या पित्याचाच वारसा चालविला. १८०२ साली कलींजरचा किल्ला जिंकताना अलीबहादूर रणांगणावर धारातीर्थी पडले.
अलीबहादूराना समशेरबहादूर व झुल्फिकारअली असे दोन पुत्र होते. १८५७ च्या उठावानंतर बांदा इंग्रजांनी आपल्या अधिकारात घेऊन अलीबहादूरांच्या वंशजांना तनखा देऊन इंदोर येथे ठेवले. तिथून नंतर ते बांदा येथे जहागिरीवर वास्तव्यास आले. पराक्रमी पहिल्या बाजीरावांच्या रक्ताचा हा मुस्लीम वंश बांद्यात कायम राहिला.
"श्री बल्लाळ चेरणी तत्पर । समशेर बाहादर निरंतर ।।" ही समशेर बहादूर यांची मुद्रा होती.
२००६ साली भरतपूरला गेल्यावर अगोदर मी भरतपूरच्या किल्ल्यात गेलो.पानिपतच्या युध्दानंतर जीव बचाऊन दक्षिणेकडे निघालेल्या मराठ्यांना मोठी मदत केली ती सूरजमल जाट यांनी. भरतपूर हा सूरजमल जाटांचा राजधानीचा किल्ला.इथेच सूरजमल्लांनी प्राणांतिक जखमी झालेल्या समशेर बहादूरांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.जो वैद्य समशेरना वाचवेल त्याला समशेर बहादूरांच्या वजनाइतके सोने बक्षीस द्यायचे सूरजमल्लांनी जाहीर केले. कारण समशेर बहादूर हे प्रत्यक्ष पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र आणि नानासाहेब पेशव्यांचे सावत्र बंधू होते.पण इतके प्रयत्न करुनही अखेर समशेर बहादूर पानिपतच्या युध्दातील जखमांनी भरतपूरमधे निधन पावले.त्यांचा अंत्यसंस्कार मुस्लिम पध्दतीप्रमाणे करण्याची व्यवस्था सूरजमल्लांनी केली.ही सर्व सविस्तर माहिती किल्ल्यातील पुरातत्व खात्याच्या कार्यालयातून व भरतपूर संस्थानच्या ट्रस्टमधून मला मिळाली. मात्र समशेर बहादूरांची कबर कुठे आहे याबद्दलची कसलीही माहिती अथवा नोंद या दोन्ही कार्यालयात नव्हती.इथे ज्यांना ज्यांना मी कबरीबद्दल विचारले,त्यांचे एकच उत्तर होते " समशेर बहादूर भरतपूरमधे मरण पावले हे बरोबर आहे, पण त्यांची कबर कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही."
आता मला दुसरे मार्ग शोधावे लागले.भरतपूरचे पक्षी अभयारण्य भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध आहे.मी तिथल्या पर्यटक माहिती केंद्रात आणि शिवाय वनखात्याच्या कार्यालयातही चौकशी केली, पण कबरीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. स्थानिक वर्तमानपत्रांच्या कार्यालयात गेलो.पण तिथेही नन्नाचा पाढा ऐकायला मिळाला. आता मलाच शंका येऊ लागली की "समशेर बहादूरांची कबर भरतपूरऐवजी दुसऱ्या कुठल्या गावात असेल कि काय ?"
आता शेवटचा पर्याय म्हणून भरतपूरमधील मशीदींच्या मौलाना (धर्मपंडित) आणि मुजावरांकडे(पुजारी) जायचे ठरवले.भरतपूरमधील जामी मशीद ही सर्वात मोठी आणि मुख्य मशीद आहे.जामी मशीदीच्या मुख्य दारापाशी असलेल्या चौकीदाराला मी कोण आणि कशासाठी आलोय हे सांगताच त्याने मला आत नेऊन थेट मुख्य मौलानांची गाठ घालून दिली.
त्याचा पहिला प्रश्न होता,"आप हिंदू होते हूए भी एक मुसलमान की कबर क्यूं तलाश कर रहे है?"
मी त्यांना थोडक्यात समशेर बहादूर कोण होते आणि त्याच्या मृत्यूची माहिती सांगितली आणि विचारले,"भरतपूरमे इनकी कबरके बारेमें आपको कुछ जानकारी है?"
मौलाना म्हणाले,"भरतपूरमे मथुरा गेटके पास एक छोटी और पुरानी मस्जीद है जिसका नाम समशेर बहादूर मस्जीद है। लेकिन आप जिस मराठा सरदार समशेर बहादूर की बात कर रहे हो उसका कोई ताल्लुक उस मस्जीदसे मेरी जानकारीमे तो नही है।"
एवढी माहिती मला पुरेशी होती.मी त्यांना म्हणालो,"शुक्रीया मौलानासाब,मै खुद वहां जाके जानकारी लूंगा।"
जामी मशीदीतून निघून मी थेट मथुरा गेट गाठले.चौकशी करताच एका लहान रस्त्यावर ही मशीद सापडली.
मशीदींच्या प्रवेशद्वारावर बोर्ड होता.'समशेर बहादूर मस्जीद.तामीर १७६१'. हा बोर्ड दिसताच मी आनंदाश्चर्याच्या धक्क्याने क्षणभर स्तब्ध झालो. हा बोर्ड खूप काही सांगत होता.
बाहेर असलेल्या फुलवाल्याकडून एक हार घेतला.आत जाऊन मुजावरांना भेटलो.कबरीचे दर्शन घेतले.कबरीपाशी बसून,डोक्यावर रुमाल बांधून,कबरीवर हार घालून मी मनोमन समशेर बहादूरांच्या वीरमृत्यूला नमन केले.मातृभूमीपासून खूप दूरच्या प्रदेशात परकीय आक्रमकांशी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लढताना ज्याने प्राणार्पण केले असा एक पानिपतवीर इथे चिरविश्रांती घेत होता.आणि हा "बाजीरावका बेटा" होता.समशेर बहादूरांचा देह या कबरीखाली आहे या वास्तवाने मी थरारुन गेलो होतो.
मी हे सर्व करीत असताना मुजावर माझ्याकडे आश्चर्याने पहात होते.माझ्या कानाच्या टोचलेल्या पाळ्या पाहूनच त्याने मी हिंदू आहे हे ओळखले होते.
दर्शन झाल्यावर मी मुजावरांशी बोलू लागलो.मी कोण व कुठून आलो आहे हे सांगितले.आता प्रथम हे मुजावर समशेर बहादूरांबद्दल काय सांगतात ते जाणून घ्यायचे ठरवून मी त्यांना माहिती विचारली.मुजावरांच्या माहितीचा सारांश असा होता.' समशेर बहादूर हे भरतपूरमधील एक दैवी शक्ती प्राप्त झालेले अवलिया होते.त्यांनी अनेकांचे जटिल प्रश्न, संकटे, अडचणी चमत्काराने सोडविल्या होत्या.ते १७६१ मधे मरण पावले.आणि आजही त्यांना कुणी नवस केला,मागणे मागितले तर ते भक्तांना पावतात.'
आता माहिती सांगायची माझी पाळी होती.हे समशेर बहादूर कुणी अवलिया नसून पेशवे बाजीरावांचे पुत्र आहेत असे मी सांगताच मुजावरांनी मला थांबविले. हाक मारून त्यांनी एका मुलाला बोलावले आणि मशीदीजवळच्या आणखी काही मुस्लिम व्यक्तींना लगेचच बोलावून आणायला सांगितले.दहापंधरा मिनिटात पाचसहा मुस्लिम व्यक्ती मशीदीत दाखल झाल्या. मुजावर मला म्हणाले " अब आपके पास जो जानकारी है,वो हम सबको एकसाथ पूरी बताईये। समशेर बहादूर बाजीरावके बेटे थे ये आज हम पहली बार सुन रहे है।ये क्या हकीकत है?"
कबरीशेजारच्या मशीदीत बसून मी त्यांना समशेर बहादूरांचा चरित्रेतिहास आणि त्याच्या मृत्यूप्रसंगाची तारीखवार माहिती सांगितली.मशीदीच्या दारावरील बोर्डवर जे लिहिले होते ती माहिती तुम्हाला कुठून मिळाली असा प्रश्न मी मुजावरांना विचारला.ते म्हणाले "ही माहिती त्याच बोर्डाच्या मागील भिंतीतील शिलालेखावर कोरली आहे.आम्ही मशीदीची डागडुजी करताना शिलालेखावर टाईल्स बसविल्या.त्यापूर्वी आम्ही त्यावरील माहितीचा बोर्ड बनवून घेतला व टाईलवर लावला. आजही तो शिलालेख भिंतीवर आहे.पण तो आता टाईलखाली झाकला गेला आहे."
मग मी त्यांना सांगितले की "पानिपतची लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी झाली. जखमी झालेले समशेर बहादूर भरतपूरमधे आले व काही दिवसातच इथेच निधन पावले.सूरजमल जाटांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था इस्लामच्या रिवाजाप्रमाणे केली. १७६१ साली भरतपूरमधे मरण पावलेले समशेर बहादूर नावाचे एकच व्यक्तीमत्व भारताच्या इतिहासात पुराव्यासह नमूद आहे. आणि हे कबर बांधण्याइतके महत्वाचे सरदार नक्कीच होते कारण ते पेशवे बाजीरावांचे ते पुत्र होते. त्यामुळे तुम्ही ज्यांना अवलिया मानता ते अवलिया नसून मराठ्यांचे मोठे सरदार बाजीरावपुत्र समशेर बहादूर आहेत.आणि शिलालेखाचा पुरावा सांगतोय की ही त्याच समशेर बहादूरांची कबर आहे.' तामीर १७६१ समशेर बहादूर मशीद' म्हणजे १७६१ मधे बांधलेली(उर्दू तामीरचा अर्थ 'बांधलेली/निर्माण केलेली') समशेर बहादूर मशीद.मशीदीतील कबर समशेर बहादूरांची आहे.या कबरीमुळे आणि कबरीबरोबरच नमाजासाठी शेजारी मशीद बांधली आहे व 'वजू'साठी छोटी विहिरदेखील त्याचवेळी बांधलेली आहे.(वजू म्हणजे नमाजाआधी गुडघ्यापासून खाली पाय, कोपरापासून खाली हात व चेहरा पाण्याने धुणे)."
मी इतकं सविस्तर व नीटपणे समजावून सांगताच सर्व मंडळी अवाक झाली.पण त्यांना हे सर्व पटले.त्यांच्या विनंतीवरून मी समशेर बहादूरांची माहिती त्यांना कागदावर सविस्तर लिहून दिली.ही माहिती इथे येणाऱ्यांना आवर्जून सांगावी ही माझी विनंती त्यांनी मान्य केली.त्यांना आता ऐतिहासिक पुराव्यांसह समशेर बहादूर कोण हे पक्के कळले होते.
मग मी त्यांना "आजवर कुणी ही पानिपतवीर समशेर बहादूरांची कबर आहे म्हणून त्यांचे वंशज अथवा इतर कुणी आले होते का ?" असा प्रश्न करताच मुजावर म्हणाले "नाही. कारण ही माहिती आम्हाला तुमच्याकडूनच प्रथम मिळाली. आणि तुम्ही म्हणता तसे कुणीही आजवर इथे आलेले नाही."
यानंतर त्यांना मी बांद्याचे नबाब हे समशेर बहादूरांचे वंशज आहेत हे सांगितले आणि तुम्ही बांद्याला जाऊन त्यांना भेटावे,त्यांना ही सविस्तर माहिती द्यावी व त्यांना त्यांच्या या पराक्रमी पूर्वजाच्या कबरीच्या दर्शनासाठी आमंत्रित करावे असे सुचविले. ते त्यांनी आनंदाने मान्य केले.
हे सर्व झाल्यावर मी कबर,मशीद, विहीर, बोर्ड यांचे फोटो घेतले आणि एका महत्त्वाच्या वीराची समाधी शोधल्याच्या,उजेडात आणल्याच्या समाधानात त्या मंडळींचा निरोप घेऊन तिथून निघालो.
पानिपतानंतरच्या अंदाधुंदीच्या,विस्कळीत परिस्थितीमुळे ही कबर २००६ सालापर्यंत,माझ्या भेटीपर्यंत अंधारात ,अज्ञात अवस्थेत राहिली होती.२००६ साली माझ्या ' मराठ्यांची धारातीर्थे ' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत या कबरीची फोटोसह माहिती मी सर्वप्रथम प्रकाशित केली. मराठा साम्राज्याच्या एका मोठ्या सरदाराची,बाजीरावपुत्र समशेर बहादूरांची समाधी शोधून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे समाधान आणि श्रेय मला लाभले हे मी माझे मोठे भाग्य समजतो.पुस्तक प्रकशित झाल्यानंतर लगेचच सकाळ, पुढारी,तरुण भारत अशा दैनिकात मी यावर फोटोंसह सविस्तर लेख लिहून ही माहिती सर्व लोकांसाठी प्रसिद्ध केली.(माझ्या माहितीनुसार २००६ पूर्वी या कबरीची माहिती फोटोसह कुठेही प्रकाशित झालेली नाही. वाचकांपैकी कुणाकडे याबाबत माहिती असेल तर जरुर कळवा.)
'बाजीरावका बेटा' हा हिंदीतील आणि 'तू काय बाजीरावाचा बेटा लागून गेलास काय ?' हा मराठीतील शब्दप्रयोग ज्यांच्यामुळे रुढ झाला तेच हे समशेर बहादूर. या दोन्ही शब्दप्रयोगामागे एक आख्यायिका आहे.तत्कालीन उत्तर भारतीय स्त्रीवर्गामधे पुरुषी सौंदर्य आणि धडाडीचे उत्तम उदाहरण म्हणून बाजीरावांकडे पाहिले जायचे.समशेर बहादूर हेही रुपाने देखणे आणि त्यात बाजीरावांचे पुत्र.यांना तोडच नाही अशा अर्थाने ' बाजीरावका बेटा ' शब्दप्रयोग हिंदीत रुढ झाला.तसेच पेशवे पहिले बाजीराव आपल्या पराक्रमाने,धडाडीने इतके प्रसिद्ध झाले होते की अचाट,अवघड कर्मे करावीत तर बाजीरावांनीच अशी त्यांची प्रसिद्धी होती.मनात येईल ते बेधडक करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून ' हा बाजीरावाचा बेटा दिसतोय ' किंवा 'काहीपण करायला तू काय बाजीरावाचा बेटा लागून गेलास काय?' असे मराठीत म्हटले जाते.
पण ज्यांची प्रसिद्धी अशा वाक्यप्रयोगातून महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर भारतात देखील पसरली,त्याच समशेर बहादूरांची समाधी इतकी वर्षे अज्ञात रहावी याला काय म्हणायचे? आम्ही आमच्या मराठी वीरांच्या पराक्रमाचे फक्त पोवाडेच गात राहणार की काय ?
मराठा स्वराज्य आणि साम्राज्य घडविणाऱ्या पराक्रमी, कर्तबगार मराठी वीरांची समाधीस्थळे शोधून, जीर्णोद्धार करून त्यांची स्मृती,इतिहास आणि शौर्यगाथा आपल्या पुढच्या पिढीला नीट अवस्थेत सोपवणे हे कामदेखील आपणच करायला पाहिजे. नाही का?
प्रवीण भोसले
लेखक - मराठ्यांची धारातीर्थे
9422619791
* फोटोमधील माहिती ओळी आवर्जून वाचाव्यात.
* माहिती आवडली तर जरूर शेअर करावी.
* सर्व छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत.नेटवरुन घेतलेली नाहीत.
* आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
* शंका,प्रश्न बिनधास्त विचारा.
एक सूचना- फेसबुकवरील माझी मित्रयादी मर्यादा संपल्याने मी नवीन मित्रविनंती स्वीकारू शकत नाही.आपण मला किंवा ' मराठ्यांची धारातीर्थे' या माझ्या पेजला फॉलो करु शकता.
*यापूर्वीचे लेख
१. प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा.
२.होय ! आम्ही प्रतापगड पुन्हा चुन्यात बांधलाय.
३. गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांच्या समाधीचा जीर्णोद्धार.
४.सेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार.
५. शिवछत्रपतींचे पहिले मंदिर कर्नाटकात.
Comments
Post a Comment